शेअर बाजाराचा वारू चौखूर : गुंतवणूकदारांची १० लाख कोटींची कमाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |



मुंबई  : एका मोठ्या अवकाशानंतर शेअर बाजारात सलग दोन दिवस उसळलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे. शुक्रवार दि. २० आणि सोमवारी निर्देशांकांनी घोडदौड कायम ठेवल्यामुळे १० लाख ३५ हजार कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेतील मरगळ झटकण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळीच फूंकर मारण्यात आल्याचे थेट पडसाद सोमवारीही बाजारात दिसत होते.

सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ७५ अंशांनी उसळी घेत ३९ हजार ९० इतक्या स्तरावर बंद झाला. शुक्रवारी तो १ हजार ९२१ अंशांनी वधारत ३८ हजार १४ इतक्या स्तरावर बंद झाला. गेल्या दशकभरातील ही सर्वात मोठी तेजी नोंदवण्यात आली होती. शेअर बाजारात सलग दोन दिवस खरेदीचा उत्साह पाहता मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातील मिडकॅप कंपन्यांचे भागभांडवल १० लाख ३५ हजार २१३ कोटींनी वधारले. मिडकॅप कंपन्यांचे सध्याचे भागभांडवल हे १ कोटी ४८ लाख ८९ हजार ६५२ कोटी इतके होते.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठ्या कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर बाजारात तेजी दिसून आली होती. कॉर्पोरेट टॅक्सचा दर ३० टक्क्यांवरून २२ टक्के इतका केला. नव्या उत्पादक कंपन्यांचा कर २५ वरून १५ टक्क्यांवर आणण्यात आला. परिणामी शेअर बाजारात खरेदीचा ओघ सुरू झाला. दरम्यान हीच घोडदौड सोमवारीही सुरू राहीली.

 

सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी उसळी घेतली. सकाळी बाजार उघडताच निर्देशांक ११११.२१ अंकांनी वधारला. निफ्टीमध्येही तिनशे अंकांची वाढ झाली. 'आयटीसी', 'एलअँडटी', 'इंडसइंड बँक', 'एशियन पेंट्स' आदी शेअर पाच ते सात टक्क्यांनी वधारले. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. दरम्यान इन्फोसिसमध्ये सर्वाधिक ४.९७ टक्के इतकी घसरण नोंदवण्यात आली. टाटा मोटार्स, पावर ग्रीड, एनटीपीसी, टेक महिंद्रा, टीसीएस आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@