स्वागत, अभिनंदन आणि अपेक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |




पूर्वी गोव्यात झालेले नृशंस अत्याचार आणि आज कुमारी ख्रिस्ती जोगिणी, लहान मुले यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणे बाहेर आली आहेत. हे सगळे मानवतेच्या मूल्याला काळिमा फासणारे आहे. पुरोगामित्वाचे व्यासपीठ असलेल्या साहित्य संमेलनाचे पावित्र्य राखायचे असेल आणि इथे बुलंद केला जाणारा विवेकाचा स्वर उंचवायचा असेल, तर नव्या साहित्य संमेलनाध्यक्षांनी हे केलेच पाहिजे.

 

फादर दिब्रिटो यांची ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सर्वात आधी त्यांचे अभिनंदन! आपली संस्कृती सर्वसमावेशक असल्याने अशाप्रकारे एखाद्या धर्मगुरूलाही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होता येते, हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने संतसाहित्याविषयी लिखाण करणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर करून फादर दिब्रिटोंना सन्मानित केले आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संतसाहित्यावर उत्कृष्ट लिखाण करणार्‍या आणि मानवतावादी भूमिका घेणार्‍यांना हा पुरस्कार देण्यात येतो. फादर दिब्रिटोंनी बायबलचे मराठीत भाषांतर केले असून त्यासाठी त्यांना राष्ट्रीय साहित्य पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. एकंदरीतच सहिष्णुतेच्या आपल्या सांस्कृतिक मूल्याला साजेशी अशीच ही निवड आहे.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही काही केवळ भोजनभाऊंची गर्दी नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गेल्या काही वर्षांत त्यातल्या निवडणुकीच्या राजकारणामुळे आपली प्रभा गमावून बसले असले तरी साहित्य परिषदेने त्यात गेल्या वर्षापासून एक नवा पायंडा पाडला आणि साहित्यप्रेमींना दिलासा दिला. गेल्या साहित्य संमेलनात डॉ. अरुणा ढेरे यांना संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून साहित्य परिषदेने जे काही चांगले पाऊल उचलले, त्यामुळे साहित्य संमेलनाबाबतची आस्था पुनर्स्थापित व्हायलाच मदत झाली. विवेकाचा आवाज बुलंद करणारे व्यासपीठ म्हणून साहित्य संमेलनाचा लौकिक त्यांनी कायम राखला होता.

 

फादर दिब्रिटोंनीही आता तशीच भूमिका घेतली पाहिजे. फादर एका धर्माचे प्रतिनिधी आहेत. ते धर्मगुरूही आहेत आणि आता ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही असतील. पुढील वर्षभराच्या काळात मराठी मुलखात त्यांचे जोरदार कार्यक्रम साजरे केले जातील. फादर ख्रिस्ती असूनही त्यांच्या या सोहळ्यात सर्वच धर्माचे लोक सहभागी होतीलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याला 'शारदीय महोत्सव' असेही म्हटले जाते. आता सरस्वतीची ही वीणा फादर दिब्रिटोंच्या हाती असेल. फादर दिब्रिटोंनी यापूर्वी केलेल्या लिखाणाचे उतारे आता मुक्तमाध्यमांवर फिरु लागले आहेत. मात्र, त्यामुळे साहित्यिक म्हणून त्यांच्या अभिव्यक्तीबाबत कुठल्याही प्रकारे अडथळा आणला जावा, असे आम्हाला वाटत नाही. नयनतारा सेहगल यांच्या बाबतीतही आमचे तसेच मत होते. साहित्य परिषदेच्या कचखाऊ भूमिकेमुळे त्या साहित्य संमेलनाला पोहोचू शकल्या नव्हत्या. खुद्द साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनीही साहित्यबाह्य शक्तींविषयी आपल्या भाषणात परखडपणे भाष्य केले होते.

 

फादर दिब्रिटोंनी आता एवढेच करावे, सर्वधर्म समानतेचे जे सूत्र आपल्याकडचे सहिष्णू लोक मांडत असतात, तेच त्यांनीही मांडले पाहिजे. धार्मिक संवाद घडला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. असा संवाद तेव्हाच फलदायी होऊ शकतो, जेव्हा ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे, त्यांच्या ऐवजावर आपला डोळा नसतो. संस्कृतीचा प्रवाह बरीच वर्ष वाहत राहिला की, त्यातून धर्म आकाराला यायला लागतो. यात श्रद्धा असतात, मिथके असतात, त्याची सत्यासत्यता तपासता येत नाही. संवाद आणि समन्वय मात्र वास्तवावर आधारित असतात. दिब्रिटोंनी देव्हार्‍यातल्या धर्मावर टीका केलेली आहे. आता त्यांनी सर्वधर्म समान आहेत, हे सहिष्णूतेचे मूल्य आपल्या व्यासपीठावरून मांडावे, तसे आव्हानही त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले पाहिजे.

 

दिब्रिटोंच्या निवडीमागे आपल्या समाजाची सहिष्णू व सर्वसमावेशक अशी नैसर्गिक वृत्ती आहे. आता फादरनीही या भूमिकेच्या पोषक अशी भूमिका घ्यायला हवी. अनुसूचित जातीजमातींच्या मंडळींबाबत या देशात जे झाले, त्याचे परिमार्जन करण्याची एकही संधी हिंदू समाजाने सोडलेली नाही. आरक्षणापासून ते या देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी त्यांचे पाद्यपूजन करण्यापर्यंतचे सर्व प्रयत्न केले आहेत आणि ते यापुढेही सुरूच राहतील. ब्रिटनच्या राणीनेही जालियनवाला बाग येथील नृशंस हत्याकांडाबाबत क्षमायाचना केली आहे. त्यापुढे जाऊन क्षमायाचनेचा वस्तुपाठ मानावा, असे कृत्य कँटरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेलबाय यांनी केले. याच महिन्यात त्यांनी जालियनवाला बाग येथे जाऊन जमिनीवर आडवे पडून आपल्या भावना मोकळ्या केल्या. माणूस म्हणून आपल्याला या कृत्याची घृणा व लाज वाटते, असेही त्यांनी सांगितले. 

 

एखाद्या धर्मगुरूने अशा प्रकारे भूमिका घेणे विरळाच. त्यांच्या या कृतीचे स्वागतच केले पाहिजे. तत्वज्ञांकडून ज्या अपेक्षा ठेवल्या जातात, त्याच प्रकारच्या अपेक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून ठेवल्या गेल्या आहेत. पुलं, दुर्गाबाई, स्वातंत्र्यवीर सावरकर व अन्य किती तरी साहित्यिकांनी या बाबतीत आपले नाणे खणखणीतपणे वाजवूनही दाखविले आहे. फादर दिब्रिटोंकडूनही आता अशाच अपेक्षा आहेत. या देशात धर्मांतरणाच्या अत्यंत क्रूर अशा घटना घडलेल्या आहेत. गोव्यातला धर्मांतरणाचा इतिहास तर अत्यंत रक्तरंजित आहे. सेंट फ्रान्सिस चर्चपासून हाकेच्या अंतरावर आजही इन्क्विजिशन खांब उभा आहे. त्याकाळी झालेल्या भयंकर अत्याचाराची साक्ष हा खांब देत असतो. अजून एक मुद्दा या देशात चर्चच्या माध्यमातून निर्माण झालेल्या लैंगिक शोषणाचा. कुमारी ख्रिस्ती जोगिणी, लहान मुले यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणे बाहेर आली आहेत. हे सगळे मानवतेच्या मूल्याला काळिमा फासणारे आहे. आपल्या नव्या संमेलनाध्यक्षांनी याबाबत भूमिका घ्यावी व कोरडेही ओढावे. पुरागामित्वाचे व्यासपीठ असलेल्या साहित्य संमेलनाचे पावित्र्य राखायचे असेल आणि इथे बुलंद केला जाणारा विवेकाचा स्वर उंचवायचा असेल, तर नव्या साहित्य संमेलनाध्यक्षांनी हे केलेच पाहिजे!

@@AUTHORINFO_V1@@