आठवलेंनी दत्तक घेतलेल्या बिबट्याचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |
 
 


'भीम'च्या मृत्यूमुळे 'अर्जुन' एकटा !




मुंबई : 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील बिबट्या बचाव केंद्रात गेल्या नऊ वर्षांपासून नांदणाऱ्या 'भीम' नामक नर बिबट्याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गेल्या दोन वर्षांपासून या बिबट्याला दत्तक घेतले होते. 'भीम'च्या मृत्यूमुळे 'अर्जुन' नामक त्याचा भाऊ आता एकटा पडला आहे.

 

मुंबईतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील बिबट्या बचाव केंद्रातील 'भीम' नामक बिबट्याचा सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. गेल्या नऊ वर्षांपासून भीमचे वास्तव्य राष्ट्रीय उद्यानातील या केंद्रात होते. २०१० मध्ये शहापूरमध्ये बिबट्याची दोन पिल्ले बेवारस अवस्थेत सापडली होती. त्यांच्या आईचा कुठेच पत्ता न लागल्याने वन विभागाने अखेरीस त्यांची रवानगी बिबट्या बचाव केंद्रात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाअंतर्गत त्यांना मुंबईतील 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या ताब्यात देण्यात आले. या ठिकाणी दाखल झाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्यांचे नामकरण 'भीम' आणि 'अर्जुन' असे केले. तेव्हापासून हे दोन्ही बिबटे येथील बिबट्या केंद्राचे आकर्षण बनले होते. मात्र, सोमवारी यामधील 'भीम' बिबट्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी त्याचे वय नऊ वर्ष होते.

 

'भीम' आणि 'अर्जुन' या बंधूना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. त्यांना विरंगुळा म्हणून पिंजऱ्यामध्ये एक मोठा चेंडू, लाकडी मचाण आणि झाडाची भली मोठी फांदी ठेवण्यात आली होती. दिवसभर या दोघांचा पिंजऱ्यामध्ये वावर असायचा. परंतु, 'भीम'च्या मृत्यूमुळे 'अर्जुन' आता एकटा पडला आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या 'दत्तक प्राणी योजने'अंतर्गत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी भीमला दत्तक घेतले होते.

गेल्या दोन वर्षांपासून आठवलेंनी त्याचे पालकत्व स्वीकारले होते. तीव्र हद्यविकाराच्या झटक्याने 'भीम'चा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक शवविच्छेदन अहवालाच्या माध्यमातून समोर आल्याचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रोगनिदानतज्ज्ञांकडून सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता या बिबट्याचे शवविच्छेदन केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच स्टोपाथोलॉजिकल विश्लेषणाकरिता त्याच्या पेशीचा काही भाग पुशवैद्यकीय महाविद्यालयाला दिल्याचे, ते म्हणाले.  
@@AUTHORINFO_V1@@