'वह घडी आ गई...?'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |





दिग्गज वरिष्ठ खेळाडू आणि त्यांची निवृत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. केवळ क्रिकेटच नव्हे, तर हॉकी, कबड्डी आणि अन्य खेळांमधील वरिष्ठ खेळाडूंसाठीही निवृत्तीचा काळ पचवणे काहीसे अवघड गेल्याचेच आत्तापर्यंत दिसून आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही सध्या याच आव्हानांचा सामना करत असल्याचे चित्र आहे. महेंद्रसिंग धोनीची क्रिकेटमधील कामगिरी, मैदानावरील त्याची वर्तणूक आणि शांत, संयमी असा त्याचा स्वभाव पाहता अशी अपेक्षा होती की, निवृत्ती घेताना धोनीला तशा अडचणी येणार नाहीत, ज्या आधीच्या दिग्गज खेळाडूंना निवृत्तीदरम्यान आल्या. मात्र, भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी धोनीला 'आता बस कर' असा थेट सल्ला दिल्याने धोनीच्या निवृत्तीबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क सुरू झाले आहेत. धोनी हा सध्या ३८ वर्षीय खेळाडू असून पुढील वर्षीच्या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेदरम्यान तो ३९ वर्षांचा होईल. त्यासाठी भारतीय संघाने पर्यायाच्या दृष्टीने विचार करायला हवा. तसेच याबाबत धोनीनेही विचार करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी नोंदवले. क्रिकेटमध्ये चाळीशीचे वय हे निवृत्तीचे वय मानले जाते. तसेच टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांसाठी तंदुरुस्ती हा सर्वात महत्त्वाचा भाग असून चाळीशी गाठण्यानजीक असलेल्या खेळाडूपेक्षा तारुण्यातील एका खेळाडूला संघात संधी मिळावी, असे सल्ले अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी दिले. त्यांचे हे म्हणणे योग्यच आहे. धोनीचा भविष्यातील पर्याय म्हणून भारतीय संघाने अनेक खेळाडूंना याआधी टप्प्याटप्याने संधी देऊन पाहिली. ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, अंबाती रायुडू, वृद्धिमान साहा या यष्टीरक्षक फलंदाजांना भारतीय संघात अनेकदा संधी मिळाल्या. हे धोनीपेक्षा उत्तम फलंदाजी करतील, अशी आशा अनेकांना होती. निवडक सामने वगळता कोणालाही विशेष कामगिरी करता आली नाही. धोनीच्या तुलनेत वयाने कमी असणार्‍या या खेळाडूंची यष्टीरक्षकामध्येही साजेशी कामगिरी झाली नाही. याउलट यष्टीमागे धोनीचाच खेळ चपळाईचा असल्याचे मत देश-विदेशांतील माजी क्रिकेट खेळाडूंनी नोंदवले. चाळीशीच्या जवळ असतानाही मैदानात धोनी जी तंदुरुस्ती दाखवतो, ती या पर्यायी खेळाडूंपैकी कोणाकडेही नसल्याचे प्रक्षिक्षकच दाखले देतात. त्यामुळे धोनीवर खरेच निवृत्तीची वेळ आली आहे का, हा विचार करणेही महत्त्वाचे आहे.

 

'ती' वेळ धोनीवर येऊ नये...

 

महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट विश्वात 'कॅप्टन कुल' म्हणून ओळखला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे सामन्यांमधील दडपणाच्या स्थितीतही त्याचा संयम सहसा सुटत नाही. अगदी शांतपणे तो परिस्थितीचा विचार करतो आणि संघाला तारून नेतो. त्याचे अंदाज सहसा चुकत नाहीत. अनेक सामन्यांत त्याने भारताला अशाच प्रकारे विजय मिळवून दिला आणि 'कॅप्टन कुल' म्हणून धोनीकडे पाहण्यात येऊ लागले. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीचा विषय अनेकांकडून चघळला जात आहे. चुरशीच्या आणि दडपणात्मक स्थितीतही संघाला विजय मिळवून देण्याचे कौशल्य असणारा धोनी निवृत्तीच्या आव्हानावरही मात करेल, अशी अपेक्षा अनेकांना आहे. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंना मनी नसतानाही बोर्डाच्या सख्तीमुळे निवृत्ती घ्यावी लागल्याचे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ही वेळ धोनीवर येऊ नये, म्हणजे झाले. माजी कर्णधार कपिल देव हेदेखील एक दिग्गज खेळाडू. मात्र, रिचर्ड हेडलीचा विक्रम मोडण्याच्या मोहापायी ते आपल्या गोलंदाजीचा वेग मंदावल्यानंतरही खेळत राहिले. परिणामी, भारताला प्रथम विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार असतानाही त्यांना निवृत्तीच्या काळात टीकेचे धनी व्हावे लागले. पाकिस्तानच्या वसिम अक्रमनेही तोच कित्ता गिरवला. अपेक्षित सन्मानासह त्यालाही निवृत्ती घेता आली नाही. 'क्रिकेटचा देव' मानल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरच्या बाबतीतही तेच घडले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०११चा विश्वचषक जिंकल्यानंतर सचिनकडेही फॉर्मात असतानाच निवृत्ती घेण्याची संधी होती. मात्र, शतकांचे शतक करण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. अर्थातच तो सचिनच्या नावलौकिकाप्रमाणे खेळ नसल्याने सचिनच्या उतारवयात निवृत्तीवरून वादळ उठले होते. सचिनप्रमाणेच माजी कर्णधार सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीदरम्यानही असाच गोंधळ कायम होता. अपेक्षित सन्मानासह या मातब्बर खेळाडूंना निवृत्ती घेता आली नाही. माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांचा अपवाद वगळता अन्य ज्येष्ठ खेळाडूंना निवृत्तीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे धोनीने वेळीच शहाणे व्हावे, अशी अपेक्षा आहे.

- रामचंद्र नाईक 

 

@@AUTHORINFO_V1@@