...आणि बैल उधळला; शेअर बाजारातील त्सुनामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |



ही एका दिवसाची तेजी आहे पुन्हा शेअर बाजार खाली येईल इत्यादी इत्यादी. पण मित्रांनो या तेजीने हे सिद्ध केले की बाजाराची ताकद सिद्ध केली. आज खाली गेलेला बाजार उद्या वरती येणारच असतो, यावेळी मात्र शब्दशः तो दुसऱ्या दिवशीच वर आला हा मात्र योगायोग...


 

जोपर्यंत सरकार काही पावले उचलणार नाही तोपर्यंत या बाजाराचे काही खरे नाही. या पातळीवर राहणार आणि हळूहळू खाली सरकणार, सकारात्मक असे ना वातावरण होते, ना बाजारातील लोकांच्या गुंतवणूकीचा ओघ त्यात परदेशी गुंतवणूकदार तर सपाटून विक्रीचा मारा गेले काही दिवस, महिने करतच होतेआपल्या म्युचल फंडमधील ताकद हळूहळू कमी होत होती. काहीजणांनी गुंतवणूक थांबवली होती. ‘म्युचल फंड है सही है'ची जाहिरातदेखील गेले महिनाभर टेलिव्हिजनवरून गायब झालेली आणि हळूहळू शेअर बाजाराने आपली दिशा खालच्या दिशेने निश्चित केलेली आपण पाहिली. सप्टेंबर महिन्याचा इतिहास सांगतो की, या महिन्यात बाजार वर्षातील नीच्चांकी पातळी गाठतोच आणि अजून साधारण सहा सत्रे शिल्लक असल्याने सर्वच आणखी बाजार किती खाली जाईल ह्याचे आराखडे बांधत होते.

 

सर्व वित्तीय संस्थांनी पण आपल्या बाजाराला आणखी वाईट दिवस कसे येतील, याचे त्यांचे अंदाज वर्तवायला सुरुवात केलेली होतीच. कारण, खूप चांगले अर्थसंकल्प येऊनही त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यामुळे किंवा ती शक्य नसल्यामुळे बाजार निराश होता. सरकारने काही डोस पाजायचा प्रयत्न केला. इन्फ्रा फंडची स्थापना, टेक्सटाईल सेक्टरला सवलत, सरकारी बँकांचे विलीनीकरण, सरकारी बँकांना वित्तपुरवठा, रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्टर पण हे डोस तसे काही फारसे कामी आले नाहीत. तेवढ्या वेळेपुरता बाजार वर जाऊन तो पुन्हा कालांतराने म्हणजे कधी कधी तर त्याच दिवशी खाली येऊन बंद झालेला आपण सर्वांनी पाहिला.

 

बाजाराचा बैल जवळपास झोपला होता म्हणजे अगदी निपचित पडला होता म्हणा ना! फक्त कोमात जायचा बाकी होता.२० सप्टेंबरचा दिवस उजाडला. अगदी नेहमीप्रमाणे बाजार थोडा वर उघडला आणि मग सुरू झाली विक्री आणि अल्पावधीत बाजार (निफ्टी) सुमारे ५० पेक्षा अधिक अंकांनी खाली गेला. बँक निफ्टी २०० अंक खाली, सेन्सेक्स १५० अंकांनी खाली गेलाच होता. याच दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद सुरू झाली. एका मागून एक धडाकेबाज, धाडसी घोषणाचा पाऊस, कॉर्पोरेट टॅक्स २२ टक्के अर्थात कुठलीही सवलत न घेणाऱ्या कंपन्यांना, त्यानंतर उत्पादन क्षेत्रातल्या कंपन्यांना १५ टक्के जो पूर्वी २५ टक्के होता, मग सर्वात महत्त्वाची घोषणा परदेशी गुंतवणूकदारांना करामध्ये सवलत, मग त्यानंतर बऱ्याच प्रमाणात जीएसटीमध्ये पुन्हा भरघोस सवलत, काहींचा दर शून्य टक्के तर काहींचा १२ वरून पाच टक्के, तर काही १८ वरून १२ टक्के असे अनेक धाडसी आणि अनपेक्षित निर्णय अर्थमंत्र्यांनी घोषित केल्यानंतर मग काय शेअर बाजाराने या सर्व घोषणांना २१ तोफांची सलामी दिली, त्याच्या आवाजाने निपचित पडलेला शेअर बाजाराचा बैल उठून धावू लागला. नुसता धावू लागला नाही तर अक्षरशः तो उधळला आणि बाजारात एक अशी तेजी आली जणू एक त्सुनामी ज्यात शॉर्ट करणारे, मंदी करणारे वाहून गेले.

उधळलेला हा शेअर बाजाराचा बैल अखेरपर्यंत ‘न भूतो न भविष्यति’ अशा विक्रमी बढतीवर जाऊन थांबला.
शेअर बाजाराच्या सुमारे ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व निर्देशांकांनी विक्रमी वाढ नोंदवली. निफ्टी ५६९ अंक, सेन्सेक्स १९६२ अंक आणि बँक निफ्टी सुमारे २२६३ अंक तेही एका दिवसात! म्हणून म्हटले ‘आणि बैल उधळला!’ हे म्हणजे शेअर बाजारात त्सुनामी आल्यासारखे झाले.


या सर्व घोषणांचा परिणाम दूरगामी होणार यात तिळमात्र शंका नाही. काहीजण म्हणतील की, याने फक्त कंपन्यांना फायदा होईल, त्यांचा ‘कॅश फ्लो’ वाढेल, यात फक्त पुरवठा बाजूचा विचार केला गेला आहे. मागणीचा विचार झाला नाही. यामुळे आणखी १.५० लाख कोटी रुपयांचा सरकारवर बोजा पडेल. वित्तीय तूट वाढेल आणि प्रत्यक्ष जो उपभोक्ता आहे त्याला काहीच फरक पडणार नाही वगैरे... पण या घोषणांचा आवाका इतका मोठा आहे आणि त्याला ऐतिहासिक आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 

कारण, आजपर्यंत कुठल्याही सरकारने इतका धाडसी निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदी सरकार हे धाडसी निर्णय घेणारे सरकार म्हणून प्रचलित आहेच. मुळात आता देशात उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी अशा भक्कम ‘बुस्टर डोस’ची गरज होती, बर हे सरकार इतके हुशार आहे की, ते १.५० लाख कोटी रुपये कसे गोळा करणार याचा विचार त्यांनी आधीच करून ठेवला असेल. माझ्या मते, उर्वरित सहा महिन्यांत सरकार जास्तीत जास्त निर्गुंतवणुकीवर भर देईल आणि त्यातून जास्तीत जास्त रक्कम उभारण्याचा प्रयत्न करेल. कारण, या सर्वांचा परिणाम येणाऱ्या काळात दिसेलच. काहीजण असेही म्हणत आहेत की, ही एका दिवसाची तेजी आहे पुन्हा शेअर बाजार खाली येईल इत्यादी इत्यादी. पण मित्रांनो या तेजीने हे सिद्ध केले की बाजाराची ताकद सिद्ध केली. आज खाली गेलेला बाजार उद्या वरती येणारच असतो, यावेळी मात्र शब्दशः तो दुसऱ्या दिवशीच वर आला हा मात्र योगायोग

 

पुढे काय ?


सप्टेंबर महिन्याची एक्सपायरी पुढील आठवड्यात आहे
आणि साधारण हा आठवडा नेहमी परिवर्तनशील (वोलाटाइल) असतो. इथून आता मार्केट अशा जागी आलेले आहे आणि मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्याने आपली रेंजवरच्या दिशेने ब्रेक केल्यामुळे हा लगेच खाली जाईल असे वाटत नाही. कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने ‘ट्रेंड चेन्जर’ ठरला याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पितृपक्षात शेअर बाजाराने दिवाळी साजरी केली, आणखी काय पाहिजे. येणारा काळ बाजारासाठी चांगला असला तरी काळजी घेणे हे प्रत्येकाचे काम आहे. एक मात्र बरे झाले, अनेक घाबरलेले लोक आता शेअर बाजारात पुन्हा उतरतील किंवा नव्याने उतरतील. कारण, केव्हाही थेट गुंतवणूक जास्त फायदा देते आणि ‘तूच आहेस तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार’

- सीए निखिलेश सोमण

शेअर बाजार अभ्यासक

(डिस्क्लेमर : वरील लेखात कुठेही शेअर बाजारातील कुठल्याही गुंतवणुकीबद्दल अथवा ट्रेडिंगबद्दल कुठलाही सल्ला दिलेला नाही. हा लेख पूर्णपणे लोकांना शेअर बाजाराबद्दल सजग बनवण्याच्या दृष्टीने लिहिलेला आहे . आपण कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा. अर्धवट ज्ञानाने कधीही शेअर बाजारात उतरू नये.)

@@AUTHORINFO_V1@@