पावसाळ्यातील श्वसनाचे आजार आणि ‘होम नेब्युलायझेशन’

    23-Sep-2019
Total Views |


पावसाळा त्याच्या अंतीम टप्प्यात असला तरी सध्या सर्वत्र सर्दी-खोकल्याने डोके वर काढलेले दिसते. विशेषत्वाने लहान मुले, शाळकरी मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशावेळी डॉक्टरांच्या उपचारांबरोबरच ‘नेब्युलायझर’चा प्रयोगही फायदेशीर ठरु शकतो. तेव्हा, नेमका कोणी आणि कसा या नेब्युलायझर्सचा वापर करावा, त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...

पावसाळा आणि त्यामुळे होणार्‍या प्रादुर्भावांनी-आजारांनी कळस गाठला आहे. एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या वैद्यकीय गरजांची काळजी घेण्यासाठी तयार व सुसज्ज असले पाहिजे, मग तो आजार म्हणजे सौम्य स्वरूपाची सर्दी असो किंवा ताप. प्रदूषण, परागकण आणि वातावरणातील परिस्थिती यामुळे सध्या श्वसनाचे विकार वाढले आहेत. घरघर, खोकला, जलद श्वसन आणि न्युमोनिया व ब्राँकायटिससारखे फुप्फुसाला होणारे प्रादुर्भाव या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. नेब्युलायझरचा (वाफ देणारे यंत्र) योग्य वापर करणे या परिस्थितीत फायद्याचे ठरू शकते. इनहेलर्स आणि द्रवरूपातील औषधांच्या तुलनेत नेब्युलायझरचे अनेक फायदे आहेत. अर्भकांना, लहान मुलांना आणि अस्थमा इनहेलर्स वापरणे कठीण वाटणार्‍या कोणालाही अस्थमाची औषधे देण्यात नेब्युलायझर विशेष प्रभावी आहेत.

 

असे हे नेब्युलायझर लहान मुलांसाठी सर्वोत्तम ठरतात आणि याचे परिणाम तत्काळ दिसून येतात. श्वसनाच्या आजारांवरील अन्य उपायांमध्ये हे फायदे दिसून येत नाहीत. शिवाय, लहान मुलाला नेब्युलायझरशी जुळवून घ्यावे लागत नाही. मुलाला श्वास घेण्यात अडचण असेल तरीही नेब्युलायझरमार्फत औषध देता येते. डॉक्टरांना दाखवेपर्यंत एखादा ‘रेस्क्यू नेब्युलायझर’ दिल्यास मुलाला जाणवणारी लक्षणे कमी करण्यात मदत होऊ शकते. मात्र, एक किंवा दोन ‘रेस्क्यू नेब्युलायझर्स’ देऊन काही उपयोग होत नसेल, तर तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाणे आवश्यक असते. नेब्युलायझेशन किंवा वाफ देण्याची सर्वोत्तमपद्धत पल्मोनोलॉजिस्ट किंवा स्थानिक फिजिशिअनकडून समजून घेणे उत्तम. या चर्चेमुळे पालकांना त्यांच्या मुलाच्या उपचारांतील महत्त्वाचे अंग समजून घेता येईल आणि त्यांना अचूक माहिती मिळेल.

 

घरी नेब्युलायझेशन देणे

तुमच्या मुलाच्या चेहर्‍यावर मास्क ठेवा. स्थिरपणे वाफ देता यावी म्हणून तुमच्या मुलाला कोणत्यातरी गोष्टीत गुंतवा. कार्टून मुव्ही दाखवल्यास किंवा त्यांच्या आवडीचे खेळणे त्यांना दिल्यास ती मास्क लावून घेण्यास नकार देणार नाहीत किंवा तो सारखा काढून टाकणार नाहीत. मुलाचे दात आणि ओठांच्या मध्ये योग्य ठिकाणी माऊथपीस ठेवा, त्यांना तोंडावाटे संथगतीने श्वास घेऊ-सोडू द्या, सर्व औषध जाईपर्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवा. यंत्र ऑन करा आणि उपचार पूर्ण करा. यासाठी साधारण 8-10 मिनिटे लागतात. सुरुवातीला यासाठी अधिक कालावधी लागू शकतो, पण हळूहळू तुमचे मूल या उपचाराशी जुळवून घेईल आणि सहकार्य करतील.

 

नेब्युलायझर सुरळीत वापरता यावा यासाठी या काही टिप्स

हा तुमच्या मुलाच्या दिनक्रमाचा भाग करा. नेब्युलायझर दररोज ठराविक वेळी लावणे चांगले असते. म्हणजे तुमच्या मुलाला नेमके काय करायचे ते समजते. तुमच्या मुलांना नेब्युलायझर मशीनवर स्टिकर्स वगैरे चिकटवून ते सजवू द्या म्हणजे त्यांना ते आपलेसे वाटेल. तुमच्या मुलाला मांडीवर बसवून नेब्युलाइझ करा. यामुळे त्यांना सुरक्षित वाटेल. अस्वस्थ बाळांना ती झोपलेली असताना नेब्युलाइझ करण्याचा प्रयत्न करा. मुलाचे कौतुक करा. तुम्ही त्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल त्यांना छोटेसे बक्षीस देऊ शकता.

डॉ. प्रेयस वैद्य 

(लेखक फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, येथील कन्सल्टण्ट पल्मोनोलॉजिस्ट आहेत.)