दातृत्व : एक नि:स्वार्थी भावना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2019
Total Views |




आपण अनेक वेळा आपत्कालीन प्रसंगात काय पाहतो? अनेक संस्थांचे लोक आपापल्या संस्थांचे टीशर्ट छापून, बॅनर्स लावून काम करत असतात. ते तात्त्विकदृष्ट्या चूक आहे, असे म्हणता येत नाही. पण, आजकाल ते फोटो घ्यायचे वा सेल्फी घेत बसायचे आणि सोशल मीडियावर ते फोटो टाकायचे. कधीकधी केवळ फोटो घ्यायचे इथपर्यंतच या अरिष्टात काम करून मग निघून जायचे, असा अनेकांचा प्रयत्न असतो. किती केविलवाणा प्रयत्न आहे हा! माणुसकीचे प्रदर्शन करत वर दातृत्वाचा बोभाटा करत काम करणार्‍या या व्यक्तींच्या दातृत्वाला 'दातृत्व' म्हणावे का विकृती म्हणावी, हे कळत नाही.

आपण एक वैयक्तिक अस्तित्व घेऊन या जगात प्रवेश करतो. आपण एक संवाद नेहमी ऐकतो. तो म्हणजे, 'आपण एकटेच आलो आहोत आणि जातानाही एकटेच जाणार आहोत.' तेव्हा आपल्याला सुखाबद्दल, ऐश्वर्याबद्दल इतकी हाव कशाला हवी? जे हवे आहे ते वा जे कमावले ते आपण काय आपल्याबरोबर घेऊन जाणार आहोत? तेव्हा नि:स्वार्थ भावनेने आपण का जगू नये? खरे तर आपण तसे ऐहिक आकर्षणातून सहजासहजी सुटका करून घेऊ शकत नाही. किंबहुना, या जगात जितकी ऐहिक सुखे आपल्याला दिसून येतात, ती या सुखाच्या मोहातूनच निर्माण झाली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपण दैनंदिन जीवनात विरक्त असतो, तर आज मिक्सर वा वॉशिंग मशीन आपल्याला दिसलीच नसती. आपल्याला स्त्रिया तशाच वाट्यावर वाटण वाटत असताना वा कंबर मोडेस्तोवर आपटून घासून कपडे धुताना दिसल्या असत्या. म्हणजे ऐहिक सुखाच्या लोभातून आयुष्य सुसह्य करण्यासाठी शास्त्राने प्रगती म्हणजे ऐहिकतेच्या वाटेने प्रगती केली आहे, हे निश्चितच!

पण हे सगळे जरी सुखाचे असले तरी समाधानाचे आहे का, हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही. मानवी मूल्यांचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा तो विचार स्वयंकेंद्रित परिघाच्या पुढे जातो. त्या अर्थाने 'स्व'च्या मर्यादेपलीकडे जाऊन वैश्विक माणुसकीच्या वलयात शिरायचे तर स्वयंकेंद्रित प्रवृत्तीच्या चक्रव्यूहातून बाहेर यायलाच पाहिजे. देण्यामध्ये वा दानामध्ये एक चित्तवेधक संपन्नता आहे. जे काही जे आपण देऊ शकतो, ते दिल्याने केवळ ज्याला लाभ झाला, त्यालाच 'सुख' वाटते असे नाही. पण, ज्याने दिले त्यालाही संतोष वाटतो हे खरे. पण केव्हा? जेव्हा काही व्यक्ती दान देतात, पण त्या दान देण्याचा पूर्ण हेतू हा स्वकेंद्रित असतो, त्या औदार्यामागचा हेतू हा स्वतःचा उदो उदो करण्यासाठी असतो. त्या दानाचे एकप्रकारे प्रदर्शन केले जाते आणि त्यामुळे त्या समर्पणामागचा उदात्तपणा नष्ट होतो. ती एक करुणास्पद घटना होते. दातृत्वाच्या महान उद्देशाचे ते विडंबन होऊन जाते.

आपण अनेक वेळा आपत्कालीन प्रसंगात काय पाहतो? अनेक संस्थांचे लोक आपापल्या संस्थांचे टीशर्ट छापून, बॅनर्स लावून काम करत असतात. ते तात्त्विकदृष्ट्या चूक आहे, असे म्हणता येत नाही. पण, आजकाल ते फोटो घ्यायचे वा सेल्फी घेत बसायचे आणि सोशल मीडियावर ते फोटो टाकायचे. कधीकधी केवळ फोटो घ्यायचे इथपर्यंतच या अरिष्टात काम करून मग निघून जायचे, असा अनेकांचा प्रयत्न असतो. किती केविलवाणा प्रयत्न आहे हा! माणुसकीचे प्रदर्शन करत वर दातृत्वाचा बोभाटा करत काम करणार्‍या या व्यक्तींच्या दातृत्वाला 'दातृत्व' म्हणावे का विकृती म्हणावी, हे कळत नाही.

यामुळेच अनेक लोकांना आपण खरेच दान करावे का, याबद्दल मनात शंका वाटते. निराशाही वाटते. पण, तरीही आपण घनदाट अरण्यात राहणारी गरीब माणसे स्वकष्टाने घाम गाळून गावात रस्ते बनवतात. विहिरी बांधतात. यातून ते आपल्या गावासाठी काहीतरी उपयोगी घडावे, यासाठी अथक प्रयत्न करतात. तेव्हा दातृत्वाचा खरा अर्थ व माणुसकीचे महत्त्व आपल्याला कळू लागते. दया, भावना ही वैश्विक भावना आहे. ती एका व्यक्तीसाठी वा कुटुंबासाठी मर्यादित नाही. याच दयेतून येणारे दातृत्व वा परोपकार हा एक जातीजमातीपुरता, समाजापुरता वा राष्ट्रापुरता मर्यादित न राहता, ते खर्‍या अर्थाने याचकात मानवजातीसाठी विशाल होत जाते. अशा दातृत्वात सफल झालेल्या लोकांमध्ये आपण एक भाबडी आणि विशुद्ध अशी संपन्न मानवी प्रवृत्ती पाहतो. त्यात दिमाख नसतो, पण अलौकिक संतोष असतो.


- डॉ. शुभांगी पारकर

 

@@AUTHORINFO_V1@@