निकाल निवडणुकीचा वाटे असाच असावा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2019
Total Views |

 
एखादी कहाणी मग ती कुठल्याही रूपात तुमच्यासमोर येणार असो (नाटक, चित्रपट, कादंबरी) तिची सुरुवात, मध्य आणि शेवटही रसिकांना माहिती असावा अन् तरीही एकुणातच मांडणार्याची शैली इतकी छान असावी की तरीही ती कहाणी रोमांचक वाटावी. पुढे काय होणार हे माहिती असतानाही कुठेही कंटाळा येणार नाही... राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची पूर्ण कथाच अगदी सामान्य मतदारांना माहिती आहे. केवळ निकालासाठी सारे उत्सुक आहेत. या कथानकात विविध भूमिका निभावणार्या सर्वच पात्रांना आणि पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञांनाही निकाल काय लागणार आहे, हे माहिती आहे. असे असूनही आजपासून 24 ऑक्टोबर पर्यंत एक खेळ रंगणार आहे. कथानक खेळविले जाणार आहे. ते सारेच लोकशाही केवळ जिवंत ठेवण्यासाठीच नाही तर सशक्त करण्यासाठी होणार आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचेच सरकार पुन्हा येणार, अधिक मताधिक्याने येणार हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची किंवा ज्योतिषाची गरज नाही. ते अगदी स्पष्ट आहे. आता युतीचा उल्लेख केल्यावर काही वाचकांच्या भुवया उंचावतील. मात्र तेही अगदी स्पष्ट आहे. आचारसंहितेची घोषणा होण्याच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरचित्रवाणी वाहिनीला मलाखत झाली त्यात त्यांनी स्पष्टच सांगितले की, युती होणार. नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचा मुख्यमंत्री म्हणून आशीर्वादही दिलेत. ही निवडणूक म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीसारखी आहे. सगळे अगदी ठरलेले आहे. कथा, पटकथा, संवाद अगदी तयार आहेत आणि त्यानुसार सगळे नीट घडवत न्यायचे आहे. या आधी कधीच असे झाले नाही. आणिबाणीनंतर पुन्हा इंदिरा गांधींचा उदय झाला तेव्हाही आणि त्यांची हत्या झाल्यानंतरच्या निवडणुकीतही निकाल बर्यापैकी दिसत असला तरीही आजच्या इतका हतोत्साहित, थकलेला आणि पराभूत मानसिकतेचा विरोधीपक्ष या आधी कधीच नव्हता. आता विरोधी नेतेच खासगीत युतीला 175 च्या वर जागा नक्कीच मिळतील, असे सांगत असतात. सत्तापक्षाचा तो अंदाज 220 च्या आसपासचा आहे. हा अंदाज ओलांडणारे बुहमत युतीला मिळणार, हे दिसते आहे. हा अतिआत्मविश्वास नाही.
विरोधी पक्षांत गळती झाली म्हणूनही नाही. निवडणुकीच्या आधी सत्ताधारी पक्षात आणि ज्यांची सत्ता येण्याचे स्पष्ट संकेत आहेत, अशा पक्षात जाणार्यांची संख्या मोठीच असते, मात्र यावेळी जे पक्षांतर झाले ते नेत्यांच्या आपल्या परंपरागत पक्षाकडून झालेल्या घोर निराशेतून झालेले आहे. मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेसकडे केडर नाही, नेता नाही अन् पैसाही नाही... मुळात त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही. विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आणि जी उर्मी असावी लागते तीही त्यांच्याकडे नव्हती आणि आताही नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना आपल्या नियमांनी खेळवत नेले. अगदी कधीकाळी कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेतेच आता सत्तापक्षात आहेत...
पुन्हा देवेंद्रच... यात ‘च’ इतक्या आत्मविश्वासाने जनतेनेच जोडून टाकला आहे. त्याला कारण कुठलीच लायकी नसलेला विरोधी पक्ष, गेली पाच वर्षे राज्य सरकारची स्वच्छ आणि दमदार कामगिरी, सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा दांडगा जनसंपर्क, गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची वाढलेली लोकप्रियता आणि रालोआ-दोन सरकारची 100 दिवसांतली कामगिरी, हेच आहे. फडणवीस सरकारचा कारभार अगदी निष्कलंक राहिला. कुठलाच डाग नाही. त्यात प्रत्येक आघाडीवर मुख्यमंत्री पुरून उरले. त्यांच्या सत्ताकाळात दुष्काळाचा सामना करावा लागला, आरक्षणाच्या मुद्यावर जातीयवादाचा आधार घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, शेतीचा प्रश्न उग्र होता, सिंचनाच्या सोयी नव्हत्या आणि औद्योगिक महाराष्ट्र खूप मागे होता... या सार्या आघाड्यांवर मुख्यमंत्री अधिक दमदारपणे उजळून निघाले. आता ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ या उक्तीला एकच चेहरा आहे आणि तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यांनी एक सुसंस्कृत आणि अभिजात अशा शैलीच्या राजकारणाची रुजवात केलेली आहे. विरोधक त्यांच्यामागे फरेंटत गेले आहेत, जावे लागले आहे. अगदी आता आचारसंहिता लागण्याच्या आधीच त्यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. कुरखेडा ते कोकण आणि मुंबई ते बीड- परभणी असा त्यांचा प्रवास झाला. जनसंपर्क झाला. त्यानंतर विरोधकांनी कसल्या कसल्या यात्रा काढल्या, मात्र त्या निष्प्रभ ठरल्या. म्हणजे विरोधकांचा प्रचार सुरू व्हायचा तर भाजपाचा प्रचार खर्या अर्थाने पूर्ण झालेला आहे.
विरोधकांच्या हाती या निवडणुकीला सामोरे जाताना एकही मुद्दा नाही. अगदी केंद्र सरकारच्या विरोधात नाही आणि राज्य सरकारच्या विरोधात तर नाहीच नाही. आता केंद्र सरकारच्या 100 दिवसांतल्या दमदार वाटचालीचा फायदाही महाराष्ट्रातील निवडणुकीत सत्ताधार्यांना होणार आहे. 370 कलम हटविणे असो की त्रिवार तलाकचा मुद्दा असो... या राष्ट्रभावनेच्या मुद्यांसह या सरकारने आर्थिक क्षेत्रात घेतलेले निर्णय आणि अर्थकारणाला आलेल्या कथित मंदगतीला चालना देण्यासाठी गेल्या पंधरवड्यात घेण्यात आलेले निर्णय असोत, त्यामुळे सामान्य भारतीयांचा ऊर अभिमानाने भरूनच आलेला आहे. 2014 मध्ये केलेले परिवर्तन इतके परिणामकारक असेल याचा विचारही जनतेने केलेला नव्हता. त्यामुळे आता ‘दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र’ हे सूत्र मतदारांनीच ठरवून टाकले आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्यातल्या सरकारनेही दमदारच कामगिरी केली आहे. या आधी केवळ आणि केवळ राजकारण, ही महाराष्ट्रातली व्यवस्था होती. कुठल्याही मुद्याकडे, समस्येकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात होते. त्याचा परिणाम अक्षम प्रशासन अधिक सुस्त होण्यात झाला होता. गेल्या पाच वर्षांत प्रशासन गतिमान झाले. या आधी म्हटले जायचे की, ‘सत्ता राबवायची कशी आणि टिकवायची कशी ते कॉंग्रेसलाच कळते.’ गेल्या पाच वर्षांत राजकारणाची दिशाच नव्हे तर नीती, संस्कृतीच बदलली आहे. सत्ता कशी राबवायची नाही तर कशासाठी राबवायची, हे या सरकारने दाखवून दिले. हा नवा पायंडा होता. त्यामुळे कुणाची सत्ता टिकवायची, ते जनताच ठरविते. ते आता तसे जनतेने ठरविले आहे. पुन्हा देवेंद्रच, हे जनतेनेच ठरवून टाकले आहे... हे इतके स्पष्ट असतानाही एक रोमांच या निवडणुकीच्या कथानकात आहे, ते यासाठी की आपण ठरविलेले कथानक कसे दिग्दर्शिक केले जाते आणि मांडले जाते, ते पाहणे जनतेला रोमहर्षक वाटणार आहे. क्रिकेट सामन्याचे पुन:प्रक्षेपण पाहताना होऊन गेलेले सचिनचे शतक पाहतानाही एक रोमांच दाटून येतो, तसेच आताही झालेले आहे. दिवाळीच्या पर्वावर नवे सरकार येईल. पाच वर्षांपूर्वी प्रकाशपर्वावर आलेल्या या सरकारने महाराष्ट्र उजळण्याची सुरुवात केलेली आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी ‘पुन्हा एकदा देवेंद्र’ हा जनतेने घेतलेला मौन ठराव वास्तवात साकारण्याचा हा महिनाभराचा कालखंड आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात येणार्या सरकारचे अभिनंदन आणि शुभेच्छा देताना एका सुप्रसिद्ध मराठी गज़लचा मुखडा थोडा वेगळा करत पेश करावासा वाटतो-
निकाल निवडणुकीचा वाटे असाच असावा
नक्कीच नवा सीएम फडणवीसच असावा!
@@AUTHORINFO_V1@@