९३ व्या अ.भा.म.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

    22-Sep-2019
Total Views |



लातूर : उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रविवार, दि. २२ सप्टेंबर रोजी साहित्य मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली जाईल. १० ते १२ जानेवारी २०२० दरम्यान ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचेही याच वेळी जाहीर करण्यात येणार आहे.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आगामी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होणार आहे. या संदर्भात उस्मानाबाद येथे बैठक घेण्यात आली. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो, भारत ससाणे, प्रविण दवणे, प्रतिभा रानडे आदी नावे महामंडळाच्या संलग्न संस्थांद्वारे समोर ठेवण्यात आली होती. दरम्यान यापैकी दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

 

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषद असल्याने त्यांच्याकडून नाव सुचवण्यात आले नाही. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या साहित्य आणि समाजकार्यातील योगदानामुळे त्यांची विशेष ओळख आहे.

 

'नवा करार' या भावानुवादाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन, बंधुता साहित्य संमेलन, साहित्य-कलावंत संमेलन आदींचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. 'परिवर्तनासाठी धर्म', 'पर्वतावरील प्रवचन', 'सुबोध बायबल,' 'तेजाची पावले', 'सृजनाचा मोहोर', 'सृजनाचा मळा', 'गोतावळा' आणि 'नाही मी एकला' हे आत्मचरित्र, अशी त्यांची साहित्य संपदा आहे.