विधानसभेचे बिगुल वाजले ; महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला होणार निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र तसेच हरियाणामधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तसेच, दोन्ही राज्यांमधील मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी दिल्लीत याबाबत घोषणा केली.

 

राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये २८८ जागांवर निवडणूक होणार असून ८.९४ कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. निवडणुक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा वापर होणार आहे. हरियाणामध्ये ९० जागांवर निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या खर्चावरील देखरेखीसाठी पर्यवेक्षक अधिकारी पाठवणार आहेत.

 

"महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग विशेष व्यवस्था करणार, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही विशेष व्यवस्था असणार आहे." अशी माहितीदेखील त्यांनी दिली. तसेच, "२८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे निवडणुकीचा अर्ज भरताना एकही रकाना रिकामा ठेवला गेला तर उमेदवाराचा निवडणूक अर्ज बाद ठरवला जाणार आहे." असेदेखील त्यांच्याकडून सांगण्यात आले. साताऱ्यातील निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता महाराष्ट्रातील सातारा लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 
 

असा असेल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

 

- अर्ज भरण्याची तारीख : २७ सप्टेंबर

- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ४ ऑक्टोबर

- अर्ज छाननी : ५ ऑक्टोबर

- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ७ ऑक्टोबर

- मतदानाची तारीख : २१ ऑक्टोबर

- निकाल : २४ ऑक्टोबर

 
या राज्यात होणार पोटनिवडणुका –
अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ , मध्यप्रदेश, मेघालय , ओडिसा ,पॉण्डचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश 
 

@@AUTHORINFO_V1@@