आरे सुनावणी : कांजूरच्या जागेसंदर्भात स्पष्टतेसाठी श्रीहरी अणे न्यायालयात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : आरे कारशेडसंदर्भात अनेक प्रश्नांवर उच्च न्यायालयात वाद-प्रतिवाद सुरू आहेत. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी आरेसंबंधी मुख्य न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग व न्या. भारती डांगरे या न्यायद्वयींसमोर सुनावणी सुरू आहे.

 

बुधवारी संध्याकाळी न्यायालयाचे कामकाज संपत असताना कांजुरमार्गच्या जागेचा उल्लेख याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. कांजुरमार्गच्या जागेसदंर्भात सरकार व खाजगी व्यक्तीत खटला सुरू आहे. कांजुरच्या जागेसंदर्भातील खटल्यात सरकारी पक्षाचे वकील श्रीहरी अणे आहेत. गुरुवारी प्रत्यक्षात श्रीहरी अणेच उच्च न्यायालयात दाखल झाले. श्रीहरी अणेंनी कांजुरच्या जागेविषयी उच्च न्यायालयात दीर्घ स्पष्टीकरण दिले. समाजमाध्यमात मात्र कांजुरच्या जागेविषयी अणेंनी प्रत्यक्षात म्हटलेच नसलेली वाक्ये पसरवली जात आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तिवाद मांडला. आरेची जागा वनजमीन आहे का, यासंदर्भाने सरकारची बाजू आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. आजचा संपूर्ण दिवस उच्च न्यायालयात दीर्घ युक्तिवाद चालला. आरे वनजमीन आहे किंवा व्हावी या दाव्यासंबंधीचा युक्तीवाद निष्कर्षाप्रत आला आहे.

 

कांजुरच्या जागेसंदर्भातील वाद अजून न्यायप्रलंबित आहे, ही बाब श्रीहरी अणेंनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यासोबतच अणेंच्या युक्तीवादात अनेक तांत्रिक मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला. ‘मेट्रो-६’ प्रकल्पाचा उल्लेख झाला. ‘मेट्रो-६’ व ‘मेट्रो-३’ या दोन वेगवेगळ्या प्रकल्पात गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न समाज माध्यमांतून कथित पर्यावरणवाद्यांनी केला आहे. आरेतील झाडे तोडणीसंदर्भातील सुनावणी दि. ३० सप्टेंबर रोजी होईल. तोपर्यंत मुंबई मेट्रोच्यावतीने पूरस्थिती व आरेतील जागेसंदर्भात प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

 

अमिताभ यांच्या घराबाहेर हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक

 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर मेट्रोच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. त्यावरून अनेकांनी मोठा गदारोळ माजवला. अमिताभ बच्चन यांना समाजमाध्यमात शिवीगाळ करण्याचा प्रकारही छद्म पर्यावरणवाद्यांकडून झाला होता. त्यानंतर गुरुवारी अमिताभ यांच्या घराबाहेर मनसेसह काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, कथित संघटनाचे प्रतिनिधी यांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने कोणताही गैरप्रकार झाला नाही. सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते.

 

मनसे मेट्रोच्या विरोधात?

 

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून रुईया महाविद्यालयाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मोहिमेला विद्यार्थ्यांनी तुरळक प्रतिसाद दिला असून मनसेची भूमिका नेमकी काय आहे, यावर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ व संदिग्धता आहे.

 
 

आर्चबिशपच्या विरोधात तक्रार दाखल

 

वांद्रे पूर्व येथील सेंट स्टॅनिस्लौस या शाळेच्या प्राचार्या व आर्चबिशप यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे येथील शाळेने विद्यार्थ्यांना 'आरे वाचवा' या मोहिमेत सहभागी होण्यास सांगितले होते. काही वृत्तपत्रांनीही हे वृत्त प्रसिद्ध केले होते. वस्तुतः शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होण्यास प्रवृत्त करणे, त्यांच्यावर दबाव आणणे हा गुन्हा आहे. तसेच हा प्रकार बालहक्कांचे उल्लंघन करणारा ठरतो. 'लीगल राईट्स ऑब्झर्व्हेटरी'ने बालहक्क आयोगाकडे यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. मुंबईत 'आरे वाचवा'च्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी काही कॉन्व्हेंट शाळांनी दबाव टाकल्याची चर्चा आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने एकंदर प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल.

 
@@AUTHORINFO_V1@@