देवेगौडांचे शहाणपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |




येडियुरप्पांच्या शपथविधीआधी तेव्हाच्या सत्ताधार्यांतल्या धुसफुसीत सत्ता गेल्यानंतर अधिकच बेबनाव निर्माण झाल्याचे दिसते. नुकतीच त्याची साक्ष देवेगौडांनी आपल्या विधानांतून दिली व काँग्रेसबरोबरची आघाडी ही आपली चूक असल्याचे म्हटले.



सत्ता गमावलेल्या राजकारण्यांना नेहमीच मध्यावधी निवडणुकांचे वेध लागलेले असतात
. कारण, सत्ता गमावल्याचे मनात दाटलेले वैषम्य आणि ती लवकरात लवकर मिळण्याची आशा त्यातून सदोदित जागी राहते. विशेष म्हणजे, राजकारणात मध्यावधीच्या मृगजळाकडे टपून बसलेल्यांची कमतरताही कधी नसते. नजीकच्या काळात देशातल्या विविध राज्यांमध्ये झालेल्या निवडणुका आणि त्याच्या निकालानंतरच्या प्रतिक्रियांतूनही हे पाहायला मिळते. पण, आताचे प्रकरण निराळे असून मध्यावधीच्या मृगजळाकडे आसुसलेल्या नजरेने पाहणारी व्यक्ती आहे, माजी पंतप्रधान व निधर्मी जनता दलाचे (निजद) सर्वेसर्वाएच. डी. देवेगौडा. कर्नाटकातले निजद आणि काँग्रेस आघाडीचे सरकार जुलै महिन्यात आपल्याच कर्माने कोसळले व तिथे भाजपचे बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. परंतु, येडियुरप्पांच्या शपथविधीआधी तेव्हाच्या सत्ताधार्‍यांतल्या धुसफुसीत सत्ता गेल्यानंतर अधिकच बेबनाव निर्माण झाल्याचे दिसते. नुकतीच त्याची साक्ष देवेगौडांनी आपल्या विधानांतून दिली व काँग्रेसबरोबरची आघाडी ही आपली चूक असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, “राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसे जर झाले तर आम्ही कोणासोबतही आघाडी न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू. परंतु, काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची चूक आम्ही पुन्हा करणार नाही.” वस्तुतः कर्नाटकातल्या जनतेने विधानसभा निवडणुकीतून आपला मताधिकार भाजपच्या पारड्यात टाकत सर्वाधिक १०४ जागा बहाल केल्या होत्या, तर काँग्रेसला ८० आणि निजदला ३७ जागा मिळाल्या होत्या. असे असूनही तत्कालीन काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्यापेक्षा कमी जागा जिंकलेल्या पक्षाच्या नेत्याला म्हणजेच एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा डाव खेळला. अर्थातच, हिंदुत्ववादी किंवा जातीयवादी भाजपला सत्तेपासून रोखण्याचा हा पुरोगामी-धर्मनिरपेक्षी चाणाक्षपणा असल्याचे गोडवेही त्यावेळी गांधी घराण्याच्या झिलकर्‍यांनी गायले होते. कुमारस्वामींच्या शपथविधीला हात उंचावून दाखवण्यासाठी जमलेल्या गोतावळ्याकडे पाहून तर राजकीय अभ्यासक व निरीक्षकांना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा फडशा पाडण्याचेही डोहाळे लागले होते.



काँग्रेसशी आघाडी करण्यातून व मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेण्यातून देवेगौडांनीही स्वतःला
‘धुरंधर राजकारणी’ म्हणून समजले होते. परंतु, राहुल गांधींनी टाकलेले फासे उत्तरोत्तर उलटेच फिरत गेले आणि कर्नाटकी नाट्यातली रंगत अधिकाधिक वाढू लागली. पुढे त्याचीच परिणती कुमारस्वामींचे सरकार पडण्यात झाली. मात्र, काँग्रेसशी आघाडी करतेवेळी किंवा स्वतःच्या मूठभर आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रिपद बळकावण्याचा निर्णय घेतेवेळी देवेगौडांना त्यातला धोका समजला नव्हता का? की राहुल गांधींच्या उदारपणाने देवेगौडांची विचारशक्तीही निस्तेज झाली व त्यांनी काँग्रेसच्या हातावर आपल्या कुमाराला ठेवलेे? काँग्रेसने आतापर्यंत ज्यांना ज्यांना स्वतःच्या ताटातले काढून देण्याचा बहाणा केला, त्यांना त्याचा आस्वाद कधीही घेता आला नाही, हा इतिहास देवेगौडांना ठाऊक नव्हता का? सोबतच आघाडीतील काँग्रेसकडे सर्वाधिक जागा असूनही मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्यांऐवजी कुमारस्वामींना बसवणे औटघटकेचे ठरू शकते, याचे भान त्यांना नव्हते का? कारण, कोणत्याही आघाडी सरकारात ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री व दुसर्‍याचा उपमुख्यमंत्री वा गृहमंत्री असे सर्वसाधारण गणित जमवलेले असते. कर्नाटकात मात्र त्या गणितालाच वार्‍यावर सोडले गेले व त्यातूनच तेथील काँग्रेस पक्ष तसेच सिद्धरामय्यादेखील दुखावले गेले. कुमारस्वामींच्या शपथविधीवेळीदेखील इतर सर्वच नेते मंचावर उपस्थित असताना सिद्धरामय्यांना मात्र खालीच बसवण्यात आले होते. कदाचित त्याचवेळी ‘मला नाही तर तुला नाही’च्या विचाराने सिद्धरामय्यांनी वचपा काढायचेही पक्के केले असावे. म्हणजेच राहुल गांधींच्या कथित चाणक्यनीतीला सुरुंग लावण्याची योजना कुमारस्वामींच्या शपथविधीवेळीच तयार झाल्याचे म्हणता येते. मात्र, राजकारणात वर्षानुवर्षे खपवलेल्या देवेगौडांना पुत्रप्रेमातून म्हणा वा सत्तेच्या मेव्यामुळे ते उमजू शकले नाही. म्हणूनच आताचा देवेगौडांचा आघाडी न करण्याचा शहाणपणा नेमका राहुलचे ऐकण्याच्या की कुमारस्वामींना खुर्चीत बसवण्याच्या चुकीतून आला, हाही एक प्रश्नच!



देवेगौडांनी काँग्रेसशी संग न करण्याचा निर्णय जाहीर करताच कर्नाटक काँग्रेसने मात्र आनंद व्यक्त केला आहे
. येत्या काही काळात बंडखोरी केलेल्या १७ आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्यावेळी काँग्रेसला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरता येईल, असेही तेथील नेत्यांना वाटते. सोबतच फारसा जनाधार न उरलेल्या निजदचे लोढणे गळून पडल्याने पोटनिवडणुका जिंकण्याची, तसेच कुमारस्वामींच्या पक्षाला धूळ चारण्याची इच्छाही तेथील काँग्रेस नेतृत्व राखून आहे. अशा परिस्थितीत देवेगौडांच्या मालकीच्या निजदची आणखी वाताहत होण्याचीच शक्यता अधिक. दुसरीकडे विद्यमान सत्ताधारी भाजपला मात्र निजद आणि काँग्रेसमधील सुंदोपसुंदीचा चांगलाच फायदा होऊ शकतो. तसेच ज्या १७ जागांवर पोटनिवडणूक व्हायची आहे, तिथेही भाजपच दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता, तर विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या लोकसभेच्या मतदानातही भाजपने कर्नाटकातल्या २७ पैकी २५ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. अशा परिस्थितीत स्वतःचे १०४ आमदार व पोटनिवडणुकीतही यशस्वी झाल्यास भाजपचे संख्याबळ कमालीचे वाढू शकते. त्यावेळी भाजपला स्वबळावरील सरकारचा भक्कमपणाही शाबूत राखता येईल. परंतु, देवेगौडांच्या मध्यावधीच्या दिवास्वप्नांना मात्र यामुळे चांगलीच काडी लागेल. सोबतच पुरेसे पाठबळ असल्याने येडियुरप्पा विधानसभेची मुदतही पूर्ण करतील. पण, यातून देवेगौडांवर एक मेहेरबानीही होईल. ती म्हणजे राहुल गांधी वा सोनिया गांधी वा काँग्रेस निवडणुकाच नसल्याने त्यांना इतक्यात तरी आघाडीसाठी भरीस पाडू शकणार नाहीत. अर्थात देवेगौडांनी काँग्रेसशी आघाडी करण्याची चूक पुन्हा करू नये म्हणून येडियुरप्पांच्या कार्यकाळपूर्ततेची चांगलीच मदत होईल. तेव्हा देवेगौडांनी आपल्याला चूक करण्याची संधी न देणार्‍या भाजपचे व येडियुरप्पांचेही आभार मानायला हवे.

@@AUTHORINFO_V1@@