ओंजळ फाऊंडेशन : आधार मैत्रीचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019   
Total Views |





‘ओंजळ भासते छोटी, पण असते खूप मोठी’ हे वाक्य आपण खूप वेळा ऐकले असेल. मात्र, या वाक्यातील भावार्थ आपल्याला आयुष्यातील एका पायरीवर नक्कीच उमगतो. मात्र, ही ओंजळ जर माणुसकीची असेल, तर त्याचा गंध काही औरच असतो. अशीच माणुसकीने भरलेली ‘ओंजळ’ अरविंद बिरमोळे यांनी डोंबिवलीकरांना व आजूबाजूच्या परिसराला दिली.



अरविंद रमोळे यांनी दि
. १७ जानेवारी, २०१६ रोजी ‘ओंजळ फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. गेली तीन वर्षे वनवासी पाडे, बालकाश्रम, वृद्धाश्रम, जिल्हापरिषद शाळा, बालसंगोपन केंद्र अशा अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवित या संस्थेचे काम चालू आहे. ‘नौकानयन महामंडळ’ या निमसरकारी उपक्रमात उपप्रबंधक पदावर कार्यरत असलेले बिरमोळे यांनी समाजसेवेच्या आवडीतून ‘ओंजळ’ची निर्मिती केली. ही ‘ओंजळ’ चार वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. वनवासी पाडा, वृद्धाश्रम, बालकाश्रम, जिल्हापरिषदेच्या शाळा अशा ठिकाणी, मैत्रीचा आधार देण्याचा त्यांचा कायमच प्रयत्न असतो. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ही धारणा पक्की मनात होती. समाजात वावरताना सतत जाणीव होत होती की, कितीतरी लोक अजूनही मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. बरेच लोक आणि संस्था त्यांना मदत करतात. आपणही त्यांच्या या कार्याला हातभार लावावा. हा विचार त्यांनी जवळच्या सहकार्‍यांना सांगितला. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यातूनच ‘ओंजळ’चा जन्म झाला. पेशाने नोकरदार, गृहिणी, शिक्षक, मार्केटिंग क्षेत्र अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्‍यांनी ‘ओंजळ’शी नाते जोडले. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ही संस्था हळूहळू समाजमनात पोहोचू लागली. भरलेली ‘ओंजळ’ ज्यांना ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचावी, हा शुद्ध निर्मळ हेतू आणि उद्दिष्ट आहे. याला अनुसरूनच संस्थेने मदतीचा पहिला हात दिला तो नेरेपाडा या पनवेलजवळच्या वनवासी पाड्याला. तिथे साड्या वाटप, दिवाळीचा फराळ, कधी फराळाचे साहित्य, मुलांसाठी कपडे, फटाकेवाटप, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवले. ‘सत्कर्म बालकाश्रम’ (बदलापूर) येथे मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, समुपदेशन, कपडे, घड्याळ वाटप, वृक्षारोपण असे उपक्रम आयोजित केले. ‘दहा बोटांचा मिळून होतो जसा पसा, तसाच आमचा दातृत्वरुपी वसा’ तयार करण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले. त्यानंतर संस्थेने डोंबिवलीच्या स. वा. जोशी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले. मैत्री फाऊंडेशन, डोंबिवली येथील वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम केला.



सर्वात मैलाचा दगड ठरलेला उपक्रम म्हणजे तांबडमाळ येथे जिल्हापरिषद शाळा
. तिथे मुलांना बसण्यासाठी संस्थेने पक्की जमीन करून दिली. शिवाय पुस्तके, खेळाचे साहित्य, वॉटर फिल्टर या उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या. या वर्षी संस्थेने ‘अंकुर बालविकास केंद्र, टिटवाळा’ या संस्थेच्या २५ मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी घेऊन त्या शुल्काचे धनादेश सुपूर्द केले. सामाजिक बांधिलकी जपताना निसर्गाचा समतोल राखून गेल्या तीन वर्षांचे सातत्य राखत या वर्षीसुद्धा संस्थेने वृक्षारोपणाचाही संकल्प सोडला. तांबडमाळ, शहापूर, नेरेपाडा, पनवेल, नंदिवली छोटी टेकडी, डोंबिवली येथे वृक्षारोपणाचे काम ‘ओंजळ’च्या माध्यमातून सातत्याने केले जाते. ‘ओंजळीत आकाशही सामवते व सप्त सागरही सामावतो’ असे म्हणत त्यांचे हे काम सुरू आहे. वनवासी विभागातील बांधवांना रोजगार उपलब्ध करून देणे, सरकारी योजनांचा पाठपुरावा करून वस्त्यांचा सर्वांगीण विकास करणे, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे, अंधश्रद्धेविरुद्ध जागृती करणे, लहान मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांची वैचारिक क्षमता वाढवणे असे काही उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत. याचप्रमाणे दुर्लक्षित, उपेक्षित वृद्धाश्रम, बालकाश्रम, अनाथाश्रम अशा ठिकाणीही उपयोगी काम केले जाते. ‘अंकुर बालविकास केंद्रा’त अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो.



या बालविकास केंद्रातील मुलांची शैक्षणिक जबाबदारी या वर्षीपासून
‘ओंजळ’ने घेतली आहे. ‘अंकुर’मधील २५ मुलांच्या पूर्ण वर्षाच्या शिक्षणाची जबाबदारी दरवर्षी ही जबाबदारी संस्था घेणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षी निसर्गाचा कोप झाला आणि सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणात पूर आला. लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सर्व होत्याचे नव्हते झाले. त्यावेळीही या संस्थेने पूरग्रस्त बांधवांसाठी तांदूळ, पीठ, साखर, रवा, तेल, मसाले, बिस्किटांचे पुडे, साबण, टूथपेस्ट अशा जीवनावश्यक वस्तूंची ५० पाकिटे (५० कुटुंबासाठी) कोकणात मदत पोहोचवायची जबाबदारी घेतलेल्या भगिनींकडे सुपूर्द केली. तसेच दि. २५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी संस्थेने शहापूर जिल्ह्यातीत तळवडे येथील जिल्हापरिषदेच्या शाळेतील ११७ मुलांना स्कूल बॅग्ज भेट दिल्या. अशाप्रकारे संस्था गेली तीन वर्षे वनवासी पाडे, जिल्हापरिषद शाळा, अनाथाश्रम, बालसंगोपन केंद्र, वृद्धाश्रम, महापालिका शाळा अशा विविध ठिकाणी अविरत कार्य करत आहे. संस्थेची ही भरलेली ओंजळ सांडण्याअगोदर गरजवंतांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. भविष्यात संस्थेच्या माध्यमातून वनवासी मुलांसाठी एखादे वसतिगृह उभे करावे, असा मानस आहे. कोणत्याही राजकीय पक्षांची आर्थिक मदत संस्था घेत नाही. संस्थेचे सदस्य स्वतः आर्थिक सहभाग देऊन आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यामार्फत संस्थेला निधी उपलब्ध करून देतात. आज संस्थेचे सर्वसाधारण आणि आजीव सदस्य मिळून ३५ सदस्य आहेत. एकूण नऊ विश्वस्त आहेत. लवकरच संस्थेचे संकेतस्थळ उपलब्ध होईल.



या संस्थेचे पदाधिकारी नोकरी
-व्यवसाय करून संस्थेचे काम तन-मन-धन अर्पून करत आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष आर. एस. अय्यर यांची स्वतःची कंपनी आहे. आर. एस. अय्यर शिकत असतानाच काही वर्तमानपत्रात जाहिरात विभागात काम केले. त्यानंतर १९७९ मध्ये स्वतःचीजाहिरात आणि विक्री या विषयाचा सल्ला देणारी स्वतःची कंपनी सुरू केली. ते म्हणतात की, “मी आणि माझे कुटुंब नेहमीच गरजवंताना मदत करण्यासाठी तयार असते. आता माझे वय ७३ असूनही मी ‘ओंजळ फाऊंडेशन’मध्ये काम करण्यास उत्सुक असतो. कारण, ही आमची संस्था नसून एक कुटुंबच आहे.” तर संस्थेच्या सचिव वर्षा अय्यर ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मधून स्वेच्छा निवृत्त झाल्या आहेत. सामाजिक कार्य करण्याच्या इच्छेमुळे गेल्या तीन वर्षांपासून ‘ओंजळ’च्या सभासद आहेत. ‘ओंजळ’च्या माध्यमातून वनवासी तसेच मागास विभागातील समाजासाठी कार्य करण्याचे ध्येय जोपासले आहे. दीपिका कोळंबे, उपाध्यक्षा आहेत त्या गेली २५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, विविध खाजगी शिकवणी वर्गांमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत विषयाच्या शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करतात. रवी रामचंद्र गवारे, विश्वस्त असून मुंबईत वास्तव्याला आहेत. ते एका खाजगी कंपनीमध्ये ‘लॉजिस्टिक एक्झिक्युटिव्ह’ म्हणून काम करतात. राकेश रमेश भानुशाली, विश्वस्त असून शहापूर येथे वास्तव्याला आहेत. ते एका खाजगी कंपनीमध्ये अकाऊंटंट म्हणून काम करतात. जयंत चव्हाण (ओंजळ विश्वस्त) सांगतात की, “मी विज्ञान स्नातक असून IDFC FIRST BANK येथे वरिष्ठ प्रबंधक म्हणून काम करतो. गरजवंतांच्या चेहर्‍यावर हसू फुलवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी ‘ओंजळ फाऊंडेशन’मध्ये आलो. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि गरजेनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करतो, प्राथमिक शिक्षण गरजेचे आहे याचे समाजात प्रबोधन करणे, मूलभूत साधनांची कमतरता असेल तर ती पुरविणे. मला वाचनाची तसेच व्यक्तिमत्त्व विकास करणार्‍या संस्थेचे सभासद होण्यास आवडते.”



संस्थेचे समाजकार्य वाढत आहे
. समाजातील तरुणांकडून या कामाला चांगले सहकार्यही मिळत आहे. समाजातील प्रश्न सोडवताना संस्थेचे पदाधिकारी एकत्र येऊन चर्चा-संवाद करतात. त्यातून जे निष्पन्न होते, त्यानुसार कोणते कार्य करायचे याची दिशा ठरवली जाते. सर्वजण त्या ठरवलेल्या कामाच्या पूर्तीसाठी स्वत:ला झोकून देतात. त्यामुळे ‘ओंजळ’ने ठरवलेले सेवाकार्य कोणताही अडथळा न येता पूर्णत्वास येतेच येते. हातांची ओंजळ देवाला अर्घ्य देते. भावभक्तीची ज्योत तेवते. इथे ‘ओंजळ’ संस्था समाजकार्याला आपल्या निष्ठा कर्तृत्वाचे अर्घ्य देते. तेव्हा समाजकल्याणाचा सूर्य उगवतो.

@@AUTHORINFO_V1@@