संघाने रुजवलेले सेवाव्रत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019   
Total Views |



अतिशय ग्रामीण भागातून, 'नाही रे' परिस्थितीवर मात करत कृष्णा महाडिक हे मुंबईसारख्या शहरामध्ये सेवाकार्यातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांचा हा अल्पपरिचय...


मुंबईमध्ये उपचारासाठी येणारा कर्करोगग्रस्त पालकर स्मृती सदनामध्ये येतोच येतो. त्यावेळी नियमांची चौकट पाळणे जिकिरीचे काम. कित्येकदा तर आम्ही या पक्षाचा नेता, त्या पक्षाचा नेता आणि तू आम्ही सांगितलेल्या रुग्णाला प्रवेश देत नाहीस का? असे म्हणत कितीतरी नेतेमंडळींनी यापूर्वी कृष्णा महाडिक यांना अक्षरक्ष: भयंकर ताप दिला होता. या पार्श्वभूमीवर एकदा त्यांना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या बहिणीचा फोन आला. अर्थात, त्यांनी आपण सरसंघचालकांच्या बहीण आहोत, हे सांगितले नव्हतेच. त्या म्हणाल्या, "मी रक्षा पांडे. भोपाळहून एक कर्करोगग्रस्त आला आहे. नाना पालकर स्मृती सदनामध्ये त्याची निवासाची व्यवस्था होईल का?" त्यावेळी नाना पालकर स्मृती सदनामध्ये निवास व्यवस्था व्हावी म्हणून अगोदरच अनेक रुग्ण प्रतीक्षेत होते. कृष्णा महाडिक यांनी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगत स्पष्ट शब्दात नकार दिला. पण हाडाचे आणि मनापासूनचे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या महाडिक यांना वाईट वाटले की, तांत्रिक अडचणीमुळे आपण त्या रुग्णाला प्रवेश देऊ शकत नाही. महाडिक यांनी काही बोलण्याआधीच रक्षा पांडे म्हणाल्या, "हे पाहा, तुम्ही योग्य ते करता. नियम सगळ्यांना सारखा." हे ऐकून महाडिक यांचे मन आणि डोळेही भरून आले. हा प्रसंग त्यांच्या मनाला प्रचंड उभारी देऊन गेला.

 

नाना पालकर स्मृती सदनामध्ये २३ वर्षे व्यवस्थापकीय पदावर काम करणाऱ्या कृष्णा महाडिक यांनी आरोग्यातल्या समस्या जवळून पाहिलेल्या. नुकताच त्यांना 'रायगड समाजभूषण पुरस्कार' मिळाला. मूळ रायगडमधील तळा तालुक्यातील बोरीचा माळ गावच्या तुकाराम आणि सरस्वती महाडिक यांचे सुपुत्र कृष्णा. सरस्वती बाई शेती करायच्या आणि तुकाराम मुंबईला कचऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर. गावी संयुक्त कुटुंब. त्यातही कचऱ्याच्या गाडीवर काम करायचे. वास आणि त्रास असाहाय्य व्हायचा म्हणून दारू प्यायला लागले. मुंबईतून गावी मनीऑर्डर येईनाशी झाली. कृष्णा पहिली ते चौथी शिकताना गुरे वळायला न्यायचे. उपाशीतापाशी शाळेत जायचे हा त्यांचा दिनक्रम. मुलाने शिकावे म्हणून सरस्वतीबाईंनी कृष्णा यांना बहिणीकडे गोरेगावला शिकायला पाठवले. तुकाराम तेव्हा महानगरपालिकेच्या कचेरीबाहेरच झोपायचे. त्यांची दारू सुटावी म्हणून सरस्वतीबाई तुकाराम यांना घेऊन पंढरपूरला गेल्या. तिथे तुकारामांना तुळशी माळेची दीक्षा दिली. चमत्कार म्हणा, श्रद्धा म्हणा, माळकरी झाल्यावर तुकाराम निर्व्यसनी झाले. त्यांनी गोरेगावलाच एक छोटी खोली घेतली. आईही मुंबईतच आली. पण तिथे पाण्याची प्रचंड टंचाई. एक हंडा पाण्यासाठी कृष्णा पहाटे उठून मैलोनमैल चालत जात. त्यातच कृष्णा यांना कबड्डीची गोडी लागली. राज्य पातळीवर ते कबड्डी खेळू लागले. पुढे महाविद्यालयात शिकत असताना कृष्णा यांना अभाविपचे कार्यकर्ते मंगेश देशपांडे भेटले. अभाविपच्या एका कार्यक्रमात कृष्णा यांनी 'पुनित काश्मीर' हा विषय ऐकला. देश, समाज, दहशतवाद आपला इतिहास त्यांना नव्याने समजला.देशासाठी सीमेवर जाऊन लढणे शक्य नसेल तर जिथे राहता तिथे आपल्या समाजाची सेवा करा हा संदेश मिळाला. पुढे नाना पालकर स्मृती समितीमध्ये काम करताना हा सेवाभाव त्यांच्यात सदैव जागृत राहिला. कामानिमित्त त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क झाला. या संपर्काचा उपयोग गरजूंसाठी करायला हवा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यातच त्यांचा रा. स्व. संघाशी परिचय झाला व त्याचे जीवन संघ विचारमय झाले. या विचारांतूनच रायगडमधील जिल्हा परिषद आणि इतर खाजगी अशा २७ शाळांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून दिले.

 

रायगडमधील शाळांमध्ये ते शालेय साहित्याचे वाटपही करतात. रायगडमध्ये अशाच एका टेकडीखालच्या शाळेमध्ये ते शालेय साहित्याचे वाटप करत होते. तेव्हा त्यांना नखशिखांत भिजलेली वृद्ध स्त्री दिसली. तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा. ती घामाने भिजलेली. तिला पाहून दया येत होती. तिची चौकशी केली असता कळले की, डोंगरमाथ्यावरच्या खैरावाडी गावामध्ये विहीर नाही वा नळ नाही. गावातले तरुण शहरात कामाला. सोबत त्यांच्या पत्नीही शहरात. पाणी नाही म्हणून सुनाही या गावात कधीच पाऊल ठेवत नाहीत. या वृद्ध मातापित्यांची स्थिती वाईटच. यावर उपाय म्हणजे खैरावाडी गावात खाली बांधलेल्या विहिरीचे पाणी पंपाने वर चढवणे. हे मोठे खर्चिक काम. बरे, गावात मतदार म्हणून केवळ ३०-३५ जणच. बाकी सगळे शहरात. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांसाठी हे गाव काही 'कामाचे' नव्हते. कृष्णा यांनी संपर्कातून पैसे जमवले. गावात विहीर, जलवाहिनी बांधली आणि स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनतर त्या गावात पाणी आले. आणखीन एक घटना. एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गावात गेले असता, लक्षात आले की, पाऊस पडतो आहे म्हणून मृतदेह घरातून बाहेर काढत नव्हते. कारण विचारल्यावर लोक म्हणाले, स्मशानाचा रस्ता खराब तर आहेच, पण जिथे मृतदेह जाळतात तिथे छप्पर नाही. मग मृतदेहाचे दहन कसे करायचे? ही समस्या वरवर गंभीर वाटली नाही तरी खऱ्या अर्थाने गंभीर होती. कृष्णा यांनी मुंबईत परतल्यावर लोकसंपर्कातून निधी जमवून या स्मशानाचे नुसते नूतनीकरणच नव्हे, तर आधुनिकीकरण केले. या गावातले सगळ्यात प्रेक्षणीय स्थळ कोणते? असे विचारले तर लोक या स्मशानाचे नाव घेतात, यातच सर्व आले. एक संघ स्वयंसेवक असल्याचा त्यांना अभिमान आहे. समाजातले सगळे आपलेच आहेत. त्यांच्या समस्या दूर करणे हे आपले कर्तव्यच आहे, असे त्यांचे म्हणणे. त्यामुळेच उर्दू माध्यमाच्या मुलींच्या शाळेत शौचालय नाही म्हणून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, हे पाहून त्यांनी या शाळेमध्ये शौचालय बांधले. लोकसेवेसाठी चंदनासारखे झिजणारे कृष्णा महाडिक म्हणजे 'साधी राहणी उच्च विचार आणि आचारसरणी' आहे. ते म्हणतात, "आज मी जे काही करू शकतो ते रा. स्व.संघाचा परिसस्पर्श झाला म्हणूनच. संघानेच सेवाव्रत रुजवले."

@@AUTHORINFO_V1@@