ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लांबला मान्सूनचा परतीचा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |




पुणे : सलग बरसणार्‍या पावसाने आता मात्र काहीशी विश्रांती घेतली पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा असली तरी यंदा पावसाचे अजून समाधान झालेले नाही. महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. मुख्यत: १८ सप्टेंबरनंतर राज्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, या हंगामातील हा शेवटचा मोठा पाऊस असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुमप कश्यपी यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुढील आठवड्यातही राज्यातील जनतेला मुसळधार पावसाचा अनुभव मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात १७ सप्टेंबरनंतर राजस्थानमध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार होईल, असे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत.

 

वातावरणातील बदलांमुळे सलग तिसर्‍या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला यंदा विलंब झाला आहे. अजून राजस्थानमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. इतर राज्यांमध्येही पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, साधारणत: १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीच्या मान्सूनला सुरुवात होते. १५ सप्टेंबरपर्यंत राजस्थान, पंजाब, कच्छच्या काही भागातून मान्सून बाहेर पडतो. यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रातील पाऊस थांबतो. देशभरातून ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून माघारी फिरतो. यंदा अनुकूल वातावरणामुळे पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही.

 

या वर्षी हवामान विभागाने दिलेले अंदाज अचूक ठरवून मान्सून यंदा उशिरा दाखल झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात, जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी वर्षभराची पावसाची सरासरी गाठली. सप्टेंबर महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी पावसाची दररोज कमी-अधिक प्रमाणात हजेरी सुरूच आहे. राज्यात गणेशोत्सवातही पाऊस सक्रिय होता. राजस्थानमध्ये सध्या पावसाच्या सरी पडत आहेत. साधारणत: १७ सप्टेंबरनंतर तेथील पाऊस थांबेल आणि वातावरण कोरडे होईल. याच काळात परतीच्या मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र पुढच्या आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे, असे डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

 

हवामान विभागाच्या निकषांनुसार परतीच्या मान्सूनचे काही संकेत असतात. राजस्थानच्या पश्चिम भागात सलग पाच दिवस कोरडे हवामान राहिले आणि हवेतील आर्द्रता कमी झाली आणि वार्‍याचा वेग या तीन घटनांवर मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा निष्कर्ष काढला जातो. साधारणत: १ सप्टेंबरला राजस्थानच्या पश्चिम भागातून हा प्रवास सुरू होतो आणि ३० सप्टेंबरपर्यंत देशातून मान्सून परततो. 

 

महामुंबईला पुन्हा पावसाने झोडपले

 

मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल आणि रायगडला मुसळधार पावसाने रविवारी सकाळी पुन्हा एकदा झोडपून काढले. शनिवारी रात्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. मुंबई उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रविवारी पहाटे वाहतुकीवरही याचा परिणाम जाणवला. यावेळी मध्य मुंबईतील काही उपनगरे, भिवंडी, मीरारोड, भाईंदर, वसई-विरार, नालासोपारा, ऐरोली आदी भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@