डबक्यातल्या बेडकाच्या धमक्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |


 


आपल्या युद्धाच्या इशाऱ्यात काडीचाही दम नसल्याचा साक्षात्कार इमरान खान यांना नुकताच झाला व त्यांनी स्वतःच आपल्या देशाची, लष्कराची व शस्त्रास्त्रांची लक्तरे काढली. भारताविरोधात पारंपरिक किंवा समोरासमोरच्या युद्धात आपला निभाव लागणार नाही तर आपण तोंडावरच आपटू, असे सांगत त्या डबक्यातल्या बेडकाच्या धमक्या असल्याची कबुलीच इमरान खान यांनी दिली.


भारताने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतरची पाकिस्तानी बेचैनी लपून राहिलेली नाही. मिळेल त्या मंचावर आणि वाट्टेल त्या भाषेत पाकिस्तानने भारताच्या कृतीचा निषेध-विरोध करण्याचे चाळे केले. इतकेच नव्हे तर डबक्यातल्या बेडकाने स्वतःला किती फुगवावे, याचे भान नसलेल्या पाकिस्तानने भारताला अण्वस्त्रहल्ल्याच्या धमक्यादेखील दिल्या. परंतु, भारताच्या निर्णयक्षमतेवर व सक्षम नेतृत्वावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट जम्मू-काश्मीरचा विषय सोडूनच द्या-आता आम्ही पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ, असे भारताने ठणकावले. तरीही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशी पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी अधूनमधून येतच असते. नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ‘अल जझिरा’ला मुलाखत दिली व त्यात भारताशी यापुढे चर्चा नाहीच, असे जाहीर केले. इमरान खान एवढे बोलूनच थांबले नाही तर, आता दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता असून त्याची व्याप्ती उपखंडापलीकडे असेल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली. परंतु, आपल्या इशाऱ्यात काडीचाही दम नसल्याचा साक्षात्कारही त्यांना याच मुलाखतीत झाला व इमरान खान यांनी स्वतःच आपल्या देशाची, लष्कराची व शस्त्रास्त्रांची लक्तरे काढली. भारताविरोधात पारंपरिक किंवा समोरासमोरच्या युद्धात आपला निभाव लागणार नाही तर आपण तोंडावरच आपटू, याची कबुली इमरान खान यांनी यावेळी दिली. सोबतच युद्धाच्या वल्गना करणाऱ्या आणि लष्कराच्या-आयएसआयच्या हातातील या बाहुल्याने स्वतःला शांततेचा पुजारी व युद्धविरोधीही म्हटले. इमरान खान यांचा दुटप्पीपणा यातूनच दिसतो. कारण, भारताने उचललेल्या पावलानंतर शांतीभंगाची व युद्धाची भाषा इमरान खान यांनीच सुरू केली होती. आताही इमरान खान यांनी नेहमीच्या युद्धात टिकणार नाही, असे म्हटले, याचाच अर्थ पाकिस्तानचा डाव दहशतवादी, आत्मघाती, फिदायीन, जिहादी हल्ले करण्याचाच आहे, हे स्पष्ट होते. परंतु, तसे काही झालेच तर इमरानना स्वतःचा दिवाळखोर देश वाचवता वाचवता नाकी नऊ येतील, हे नक्की!

 

इमरान खान यांनी या मुलाखतीत काश्मिरींवरील कथित अत्याचारांचे चऱ्हाटदेखील लावले. भारत सरकार व लष्कर-पोलीस प्रशासन जम्मू-काश्मीरमधील लाखो लोकांचा आवाज दडपण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, काश्मिरींवरील अन्यायाच्या खोट्या कहाण्या रंगवणाऱ्या इमरान खान यांनी स्वतःच्या देशात कोणता नवा पाकिस्तान जन्माला घातलाय, त्याचाही अभ्यास करावा. स्वतःला मुस्लीम व मानवाधिकाराचे सहानुभूतीदार सिद्ध करू पाहणाऱ्या इमरान खान यांच्या सोंगाने बलुचिस्तान, पख्तूनिस्तान व सिंधमध्येही जरा डोकावून पाहावे. बलुचिस्तानच्या केच नामक जिल्ह्यात फेब्रुवारी २०१७ पासून इंटरनेट-मोबाईल बंदी लावण्यात आली असून त्याविरोधात तोंड उघडणाऱ्यांचा पाकिस्तानकडून चांगलाच बंदोबस्त केला जातो. इथल्या नऊ लाख लोकांच्या आयुष्यावर पाकिस्तान सरकारने विविध निर्बंधांचा वरवंटा फिरवला असून शेकडो लोकांचा बळीही घेतला. ७२ वर्षांपूर्वी मोहम्मद अली जिना यांनी इस्लामच्या नावावर बलुच नेते-खान ऑफ कलात यांचा छळ केला. तद्नंतर पाकिस्तानी नेतृत्वाने बलुच नेत्यांना कुराणाची शपथ घेऊ घेऊ ठकवले आणि तेव्हापासूनच बलुचींचे दमन आजही सुरूच आहे. इमरान खान यांनीही कधी त्याला अटकाव केला नाही. हे झाले घरातले, पण बाहेरचे म्हणजे चीनमधील उईगुर मुस्लिमांचे उदाहरणही तसेच. काश्मिरींची काळजी वाहणाऱ्या इमरान खान यांना उईगुर मुस्लीम कोण आणि चीनने त्यांच्यावर काय काय अत्याचार चालवलेत त्याची जराही माहिती नाही! चिनी सरकारच्या जुलूमजबरदस्तीने श्वास कोंडलेल्या उईगुरांच्या बातम्या वृत्तपत्रांत छापून येत नाहीत व त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नाही, असे इमरान खान म्हणाले. इथे इमरान खान यांचा मूर्खपणाही झगझगीतपणे दिसून येतो. कारण, इमरान खान केवळ वृत्तपत्रांतील बातम्यांवरच विसंबून असतात का? गुप्तचर यंत्रणा, हेरखाते, विविध यंत्रणा या पंतप्रधानाकडे नाहीत का? परंतु, हे सगळे असूनही इमरान खान यांना इस्लामी उम्मा किंवा विश्वबंधुत्वाऐवजी चीनची मैत्री प्रिय आहे. दहशतवादाचा आश्रयदाता म्हणून ओळख निर्माण झालेल्या पाकिस्तानला आपलेसे करणारा आणि वाडग्यात चिल्लर टाकणारा चीनव्यतिरिक्त अन्य कोणताही देश नाही. पाक-चीनची ही मैत्री मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय बंदीपासून वाचवण्यात जशी भूमिका घेते, तशीच संयुक्त राष्ट्रांत भारताला चुकीचे ठरवण्यासाठीही प्रयत्न करते. त्यामुळे इमरान खान यांना असा निकटचा साथीदार गमावण्याची इच्छा नाही, मग तिथे इस्लाम खतरे में का येत असेना!

 

काश्मिरींची चिंता करणाऱ्यांत इमरान खान, शाहिद आफ्रिदी वगैरेंचा जसा समावेश होतो, तसाच नोबेल इतिहासातील सर्वात मोठा ‘फ्रॉड’ असा उल्लेख केल्या जाणाऱ्या मलाला युसुफजाई हिलाही जिव्हाळ्याच्या उकळ्या फुटल्या. काश्मिरातल्या कोणत्या तरी मुलीच्या हवाल्याने मलाला बोलू लागली की, तिथे भारतीय लष्कराच्या पायरवाने भीतीचे वातावरण आहे. हजारो मुले-मुली शाळेत जाण्यापासून वंचित आहेत तर अनेकांना डांबून ठेवले गेले. परंतु, मलालाने या थापा कोणत्या आधारावर मारल्या, याचे स्पष्टीकरण दिले नाही. संबंधित मुलीचे नाव काय, ती जम्मू-काश्मीरमध्ये कुठे राहते, तसेच अशा किती मुलींशी चर्चा केली व त्यानंतर मत तयार केले, हे मलालाने सांगितले नाही. म्हणजेच ही भारतीय लष्कराच्या टापांनी घाबरगुंडी उडालेली मुलगी जम्मू-काश्मिरातली नसून पाकिस्तानातलीच असेल आणि तिचे नाव मलालाव्यतिरिक्त दुसरे असूही शकत नाही. कारण आपल्या नापाक देशाने काही आगळीक केलीच तर त्याचे अस्तित्वही धोक्यात येईलसा घोर मलालाला लागला असावा व त्यामुळेच तिची बोबडी वळली असावी. परंतु, हे सांगणार कसे? तर ते सांगता येत नाही म्हणून काश्मिरींच्या नावाने गळे काढायचा धंदा! काश्मिरींच्या नावाने अश्रू ढाळणाऱ्या व कथित मानवाधिकार कार्यकर्ती म्हणून मिरवणाऱ्या मलालाने कधी सिंधमधील अल्पसंख्य हिंदू, शीख व ख्रिस्ती समुदायातील मुलींच्या अपहरणावर, धर्मांतरावर, बळजोरीने केल्या जाणाऱ्या निकाहवर तोंड उघडले नाही. त्यांच्या किंकाळ्या नि आक्रोश तिच्या कानाचे पडदे फाडत नाही, पण काश्मिरींबद्दलच्या भ्रामक कथांनी त्रास होतो! वाह रे मानवाधिकार कार्यकर्ती! सोबतच जम्मू-काश्मिरातील जनतेला भारतीय लष्कराच्या कवायतींची नव्हे तर सीमेपलीकडील गोळीबाराची चिंता सतावते. आकडेवारीतूनही हेच समोर येते. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने दोन हजारपेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले व त्याचाच त्रास स्थानिकांना झाला. भारतीय लष्कराचे सैनिक तर माणसाचा जीव गेला वा तो संकटात सापडला, पाळीव प्राणी दगावले वा पूर-नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी काश्मिरींच्या मदतीसाठी उभे ठाकतात. म्हणूनच मलालाने पाकिस्तान्यांना जरा मानवाधिकाराची अक्कल शिकवावी, त्यांनाच त्याची जास्त गरज आहे.

@@AUTHORINFO_V1@@