समाजातील स्त्रीत्वाचा शोध म्हणजे 'स्त्रीभान' : डॉ. अरुणा ढेरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |


 


ठाणे : "समाजाला असलेल्या स्त्रीत्वाचा शोध म्हणजे 'स्त्रीभान.' म्हणूनच स्त्रियांना असलेले वावराचे भान आणि समाजाला तिच्या वावराचे असलेले हे भान महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि संशोधिका-साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. त्यांच्या हस्ते लेखिका आणि 'भारतीय स्त्रीशक्ती' संघटनेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा नयना सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या 'स्त्रीभान' या लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सहयोग मंदिर, ठाणे (प) येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर या पुस्तकाला प्रस्तावना देणारे नाटककार आणि लेखक अभिराम भडकमकर, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की, "माणूस गेली कित्येक शतके स्त्रीची विविध रुपांत पूजा मांडत आलेला आहे. हा कित्येक शतकांचा धागा आहे. अशा शतकानुशतकांच्या परंपरांचा संदर्भ या पुस्तकात कौटुंबिक, व्यक्तिगत, सार्वजनिक जीवनातील स्त्रीजीवनातील अनुभवांवार आधारित आहे." त्या पुढे म्हणाल्या की, "स्त्रीच्या उत्थानात पुरुषांचेही योगदान मोलाचे आहे. ते नाकारता येणार नाही. पण, दुसर्‍या मातीतला स्त्रीवाद हा भारतात रुजला नाही आणि यापुढेही तो रुजणार नाही." लेखिका नयना सहस्रबुद्धे यांचे कौतुक करताना अरुणाताई म्हणाल्या की, "उत्तम कार्यकर्ती असल्यामुळेच त्या पुस्तक लिहू शकल्या. " आपल्या भाषणात भारतातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान स्त्रियांची उदाहरणेही अरुणाताईंनी दिली. त्याशिवाय स्त्रीजीवनाला माणूसपणाच्या पातळीवर आणून त्याला न्याय देणे अवघड असल्याचेही म्हणाल्या. कुटुंबातील स्त्रियांचे स्थान, राजकारणातील स्त्रियांचे योगदान, स्वातंत्र्यसेनानी स्त्रिया आणि त्यांनी कधीही न मागितलेले पेन्शन, कायद्याने स्त्रियांना दिलेले अधिकार आणि त्याचा परिघ, घरातील स्त्रियांच्या श्रमाची सकल राष्ट्रीय उत्पन्नात न होणारी गणना, वर्तमानपत्रातील भविष्याच्या ओळी कशा पुरुषांसाठीच असून शेवटची दोनच वाक्य फक्त महिलांसाठी असतात, अशा स्त्रीजीवनातील दैनंदिन विविधांगी अनुभवांवर अरुणाताईंनी आपल्या सखोल उदाहरणांतून आणि निरीक्षणांतून प्रकाश टाकला.

 

अंतत: स्त्रीविषयक मिथकांची पुनर्बांधणी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाटककार आणि लेखक अभिराम भडकमकर, ज्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनीही या पुस्तकाच्या आशयगर्भतेबरोबरच लेखिकेच्या समाजभानाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "या पुस्तकात कार्यकर्ती आणि चिंतनशील लेखिका यांचा संगम दिसून येतो. कारण, हे पुस्तक जगण्याविषयीचा सारांश सांगणारे आहे. त्यामध्ये कुठेही एकांगी लेखन नाही. समाजाचं पृथक्करण करणारा असे हे पुस्तक आहे." "रोजच्या जोडण्याशी सांधा जोडण्याचा या पुस्तकात प्रयत्न लेखिकेने केला आहे," असे सांगत भडकमकर यांनी 'स्त्रीभान' हे पुस्तक 'स्त्री विरुद्ध पुरुष' असा संघर्ष उभे करणारे नाही, तर पुरुषांच्याही मानसिकतेचा धांडोळा घेणारे असल्याचे त्यांनी अधोरेरेखित केले. संघर्षाचं नाही, तर सहअस्तित्वाचं पुस्तक असल्याचे सांगत 'स्त्रीभान' पुरुषभानचे नाही, तर माणूसपणाचे भान देणारे हे पुस्तक असल्याची स्तुती त्यांनी केली.

 

"लेखसंग्रहांवर आधारलेल्या या पुस्तकाला तात्कालिकतेच्या मर्यादा असल्या तरी तात्कालिकतेच्या शेरेबाजीत न अडकता त्याचा धागा पकडून सखोल सखोल अभ्यास, व्यापक मांडणी करणारे हे पुस्तक आहे. असे हे पुस्तक काळाचा संदर्भ ओलांडून पुढे जाते," असे स्पष्त मत भडकमकर यांनी मांडले. चिंतनशील लेखिका आणि चिंतनशील कार्यकर्तीचा हे पुस्तक म्हणजे अंत:स्वर असल्याचे सांगत अभिराम भडकमकर यांनी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे, असे उपस्थितांना आवाहन केले. 'स्त्रीभान' पुस्तकाच्या लेखिका नयना सहस्रबुद्धे यांनी या पुस्तकासाठी निमित्त ठरलेल्या सा. 'विवेक'मधील सदरलेखनाची संधी दिल्याबद्दल सा. 'विवेक'च्या कार्यकारी संपादिका अश्विनी मयेकर यांचे विशेषत्वाने आभार व्यक्त केले.

 

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना लेखिका म्हणाल्या की, "स्त्री समस्या सोडवणे ही कुणाची मक्तेदारी नाही. त्यासाठी लागते ते सहृदयता, प्रेम, संवेदनशीलता आणि या सर्वांना कृतिशीलतेची भक्कम जोड. म्हणून समानता ही जीवनाला लाभलेली मिती आहे. त्यासाठी परखडपणे स्वतच आत्मपरीक्षण करावे लागते, तर या समानतेकडे, स्त्रियांच्या प्रश्नांकडे सम्यक, तटस्थ वृत्तीने कसे पाहता येईल, ते या पुस्तकातून गवसते." त्या पुढे म्हणाल्या की, "समानतेबरोबर कुटुंबहिताची चौकट ही तितकीच महत्त्वाची. स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यामुळे इतरांची गळचेपी होणार नाही, याची काळजी घ्यावी. कारण, जर आपण परस्पर स्वातंत्र्याच्या पातळीवर आलो तरच आपल्याला मानवतेच्या कुंपणापलीकडे जाता येईल." अरुणाताईंचे ऋण व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, "स्त्रियांचे जीवन अरुणाताईंच्या लेखनातून प्रतिबिंबित होते. त्यांच्या हातून पुस्तकाचे प्रकाशन होणे, हे मी माझे भाग्य समजते." जाता जाता, मनाचं परीक्षण करणारी स्त्रीसन्मानाची भावना हे पुस्तक वाचून उमटावी, अशी अपेक्षा व्यक्त करत लेखिकेने उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेय प्रकाशनच्या उल्हास लाटकर यांनी, तर आभारप्रदर्शन सृजन संपदाचे सुजय पत्की यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा टिळक यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. यावेळी सदर पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारलेल्या जुई चितळे यांचाही अरुणाताईंच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@