'वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम'तर्फे सातव्या जागतिक परिषदेची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |

 हिंदू उद्योजकांना एकाच मंचावर आणणारा कार्यक्रम


मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि जगभरातील हिंदू उद्योजकांना एकत्रित आणण्याच्या हेतूने 'वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम'तर्फे सातव्या जागतिक परिषदेची घोषणा करण्यात आली आहे. सांताक्रुझ येथील हॉटेल 'ग्रॅण्ड हयात' येथे ही दि. २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान हा तीन दिवसीय कार्यक्रम सुरू राहणार आहे. या दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या कार्यक्रमासह एकूण १२ चर्चासत्र घेण्यात येणार आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पिरामल उद्योग समुहाचे अजय पिरामल, टाटा सन्स इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेंन्स अॅण्ड एरोस्पेसचे अध्यक्ष वनमाळी अग्रवाल, स्ट्रेटेजी अॅण्ड लॉखीड मार्टीन, युएसएचे उपाध्यक्ष डॉ. विवेक लाल आदी मान्यवर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, आसाम सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हिमंता बिसवा, महाराष्ट्र अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि नेदरलॅण्डहून श्रद्धानंद सिताई, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

 

तीन दिवस सुरू असणाऱ्या या परिषदेत उत्पादन, स्मार्ट गुंतवणूक, बॅंकींग आणि निधी व्यवस्थापन, कौटूंबिक व्यवसाय व्यवस्थापन, बांधकाम क्षेत्र, सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान आणि व्यवसायातील नाविन्यपूर्ण संकल्पना, आदी विषयांवर चर्चासत्र घेतले जाणार आहेत. स्टार्टअप्स, शेती, ई-कॉमर्स, सेवा आणि पर्यटन क्षेत्र याविषयांवर समांतर चर्चासत्रही आयोजित केले जाणार आहे. लार्नाका शहराचे नगराध्यक्ष अँड्रियास व्यारास, मलेशियातील मोनाश विद्यापीठातील प्राध्यापक महेंद्र नायर, आयआयएम बंगळूरूचे प्राध्यापक आर. वैद्यनाथन, राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी आदी मान्यवर सायंकाळच्या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या परिषदेत देशभरातील यशस्वी उद्योजक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार, आदित्य बिर्ला समुहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ अजित रानडे, वेलस्पून समुहाचे अध्यक्ष बी.के.गोयंका, दालमिया समुहाचे गौरव दालमिया, झी एंटरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत गोयंका, ट्रस्ट फॉर रिटेलर्स
अॅण्ड रिटेल असोसिएटस् इंडियाचे संस्थापक बी.एस.नागेश, फार्म इझीचे सहसंस्थापक डॉ. धवल बी. शाह, महिंद्र हॉलीडेजचे अध्यक्ष अरुण नंदा, हामस्टेड लिव्हींगचे व्यवस्थापकीय संचालक राहुल पंडीत, महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी, जीएमआर समुहाचे अध्यक्ष जी.ए.राव, श्रीराम प्रोपर्टीजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुरली मलयप्पन, इस्त्रोचे माजी अध्यक्ष किरण कुमार आदी मान्यवर या परिषदेत सहभागी होणार आहेत.

आयोजकांतर्फे सर्व हिंदू व्यावसायिक, व्यापारी, बॅंकर्स, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रात यशस्वीपणे व्यापाराची पाळेमुळे रोवू इच्छिणाऱ्या सर्वांना या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सहभाग घेण्यासाठी www.wheforum.org या संकेतस्थळावर किंवा http://whef2019.wheforum.org/registration/ या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.





@@AUTHORINFO_V1@@