फुटलेल्या हौदाचा आलाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |



पवारांचे अनुयायी पक्षातली सध्याची ओहोटी पाहून
, “किनार्‍यावर घर बांधू नका, साहेब समुद्र आहेत,” अशा फुशारक्या मारतानाही दिसतात. परंतु, ते समुद्र वगैरे नाहीत तर ठिकठिकाणचे सुभेदार, सरंजामदार गोळा करून उभारलेल्या हौदाचीच भूमिका शरद पवारांनी वठवली. आता तोच हौद चारही बाजूंनी बेफान फुटलाय, तुटलाय, त्याला पडलेले भगदाड कसे बुजवायचे, ही पवारांपुढची मुख्य समस्या आहे आणि त्यासाठीच त्यांचा सारा आलाप-विलाप सुरू आहे.



पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांचे प्रेम आटल्याने सैरभैर झालेल्या शरद पवारांना नुकतेच पाकप्रेमाचे उमाळे दाटून आल्याचे सर्वांनी पाहिले. पाकिस्तानी जनता गुणी बाळे असून केवळ राजकीय कारणांनी त्यांना वाईट ठरवले जात असल्याचे पवारांनी म्हटले. अर्थात ९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटावेळीही पवारांना असेच प्रेमाचे भरते आले होते व स्वदेशवासियांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू नये म्हणून जो झालाच नाही त्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख त्यांनी केला होता. पवारांनी ही थाप नेमकी कोणावरील प्रेमामुळे मारली, हेही जगजाहीर आहे, त्यामुळे त्यांच्या पाकप्रेमावर आश्चर्य व्यक्त करण्याजोगेही काहीच नाही. असल्या राजकारणावरच त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचेही भवितव्य अवलंबून होते व आहे. पण आता त्यांच्या याच राजकारणाला सुरुंग लागण्याची वेळ आली असून शरद पवारांना अस्तित्वाची चिंतादेखील भेडसावू लागली. म्हणूनच त्यांनी पाकिस्तानवरील प्रेमोल्लेखाबरोबरच भाजपच्या फायद्यासाठीच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा उदय झाल्याचे विधानही नुकतेच केले. त्यामागेही काही कारणे आहेतच जी राष्ट्रवादी काँग्रेसला पार रसातळाला नेऊ शकतात.


गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसींच्या हातमिळवणीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच झटका बसल्याचे पाहायला मिळाले. वंचितने मिळवलेल्या सात टक्के मतांमुळे धर्मनिरपेक्ष पक्षांच्या उमेदवारांना कमी मते मिळाली व त्यांचा पराभव झाला आणि हाच समज पवारांच्याही मनात आहे. परंतु, इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी भाजप युतीच्या उमेदवारांना ५० टक्क्यांहूनही अधिक मते मिळालेली आहेत. म्हणजे मतांची ही बेरीज काँग्रेस-राष्ट्रवादी वा धर्मनिरपेक्ष मतांपेक्षाही अधिक असल्याचे समजते. तिथे वंचित आघाडीचा उमेदवार नसता तरीही भाजप युतीचाच विजय झाला असता व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसींचा पराजय. पण त्यातली मेख अशी की, इथे ज्यांना भाजप युती नको होती, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळण्याऐवजी वंचित आघाडीला पसंती दिली. त्यात जुन्यापुराण्या किंवा नामशेष झालेल्या डाव्या, शेतकरी-कामगार, समाजवादी वगैरे चळवळींतल्या उरल्यासुरल्यांचाही भरणा होता. भाजप युतीवर आक्रमकपणे हल्लाबोल करणारा-प्रसंगी गरळ ओकणारा-समोरासमोरचे आव्हान देणारा नेता त्यांना हवा होता. हे काम काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्याने शक्य नव्हते व तेच काम प्रकाश आंबेडकरांनी केले.



येत्या विधानसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकर त्याच आवेशात सत्ताधार्‍यांविरोधात आघाडी उघडू शकतात
. अशाने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस निष्प्रभावी होण्याचीच शक्यता अधिक. कदाचित त्यातून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल्याप्रमाणे पुढचा विरोधी पक्ष वंचित आघाडीही होऊ शकते. शरद पवारांना तेच तर नको आहे, कारण एकदा विरोधी पक्षाची जागा निसटली की, शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे राजकारण संपल्यातच जमा होईल. अशा परिस्थितीत पुढे काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिल आणि हेच टाळण्यासाठी ते आज वंचित बहुजन आघाडीचा भाजपला फायदा होत असल्याचे व जनतेने त्यापासून सावध राहण्याचा सल्ला देताना दिसतात
दुसरीकडे शरद पवारांनी आपल्या अर्धशतकी राजकीय कारकीर्दीत जमवलेले एक-एक शिलेदारही त्यांना सोडून चालल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसला जवळपास गळती लागल्याचे चित्र निर्माण झाल्याचेही पाहायला मिळते. पक्षातली सध्याची ओहोटी पाहून पवारांचे अनुयायी, “किनार्‍यावर घर बांधू नका, साहेब समुद्र आहेत,” अशा फुशारक्या मारतानाही दिसतात. परंतु, ते समुद्र वगैरे नाहीत तर ठिकठिकाणचे सुभेदार, सरंजामदार गोळा करून उभारलेल्या हौदाचीच भूमिका शरद पवारांनी वठवल्याचे अनुयायांनी-कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आता तोच हौद चारही बाजूंनी बेफान फुटलाय, तुटलाय, त्याला पडलेले भगदाड कसे बुजवायचे, ही पवारांपुढची मुख्य समस्या आहे आणि त्यासाठीच त्यांचा सारा आलाप-विलाप सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे या आलाप-विलापांत पाकप्रेमापासून वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणण्यापर्यंतच्या सगळ्याच मुद्द्यांचा समावेश होतो.



सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील महागळतीमुळे सर्वसामान्य कार्यकर्तेच नव्हे तर त्या पक्षाची नेतेमंडळीही कमालीची विचलित झाल्याचे दिसते
. नुकताच सातार्‍याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला व लगोलग राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वाचाळवीरांच्या बेतालपणाला ऊत आला. मुंबईतील कुर्ल्यात पडून असलेल्या नवाब मलिक यांनी टोकाची पातळी गाठत उदयनराजेंवर टीका केली तर मुंब्र्याच्या गल्लीबोळात उनाडक्या करणार्‍या जितेंद्र आव्हाडांनीही जीभ चालवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भाजपमध्ये गेल्याचा दावा मलिक यांनी केला तर उदयनराजेंच्या आचरट-बालिश चाळ्यांना शरद पवारांनी नेहमीच पाठीशी घातल्याचे आव्हाड म्हणाले. वस्तुतः नवाब मलिक असोत वा जितेंद्र आव्हाड, दोघांचाही हा दुटप्पीपणाच म्हणायला हवा. कारण, उदयनराजे जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तोपर्यंत नवाब मलिक वा जितेंद्र आव्हाड त्यांना राजे-महाराज, गादीचे वारसदारच म्हणत असत. तेव्हा या दोघांनाही उदयनराजेंचे कौतुक केल्याबिगर चैन पडत नसे. पण आता उदयनराजेंनी पक्ष सोडून दोन दिवस होत नाहीत, तोच हे दोन्हीही नेते उलटले आणि तथ्यहीन आरोप करू लागले. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचीच संस्कृती भूखंडाचे श्रीखंड कसे ताटात ओढून घेता येईलसा विचार आणि त्यानुसार कृती करणारी आहे. अगदी छगन भुजबळांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून त्याची सुरुवात केल्यास लवासापर्यंत हेच दिसते. १५ वर्षे सत्तेत असताना आघाडी सरकारने कोणकोणत्या जमिनीवर कशाप्रकारे डल्ला मारला, त्याच्या कथा आणि कहाण्या आजही गावच्या पारापासून सोशल मीडियावर चघळल्या जातात. म्हणूनच उदयनराजेंनी पक्ष कशासाठी बदलला, हे सांगायचे धाडस नवाब मलिक यांना झालेसत्तेत का, कसे आणि कशाला यायचे, याचा दांडगा अनुभव नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहे. तोच अनुभव आणि केलेले उद्योग मलिक यांना आता आठवले. जे आपण केले, तेच आताचे सत्ताधारीही करत असतील, असा विचार त्यांनी केला. विद्यमान सत्ताधारी म्हणजेच भाजपमधील पक्षप्रवेश हे त्यासाठीच सुरू असल्याचे त्यांच्या मनाने ठरवले व ते बरळत सुटले. पण या फुकाच्या आरोपांतून साध्य काहीही होणार नाही, उलट राष्ट्रवादीची आणखी वाताहतच होत जाईल. कारण, ज्या पश्चिम महाराष्ट्रातील ताकदीच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस उपजली-निपजली, ती ताकद होत्याची नव्हती करण्यात भरघोस अनुयायी आणि कार्यकर्ते असलेले उदयनराजे मोठी भूमिका बजावतील, यात कोणतीही शंका नाही.



नवाब मलिक यांच्याआधी सदान्कदा उडत्या घोड्यावर की गाढवावर स्वार झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी उदयनराजेंना बालिश म्हणत त्यांनी शरद पवारांना दुखावल्याचे ट्विट केले
. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मुळात फोडाफोडीतून उगवलेला आहे. त्याला कसलेही वैचारिक, तात्त्विक वा नैतिक अधिष्ठान नाही तर तो बांडगुळासारखा अस्तित्वात आला आणि सत्तेचे खतपाणी बंद होताच संपू लागला. खुद्द शरद पवारांनीही आपल्या जवळच्यांना म्हणजेच वसंतदादा पाटलांना दगा देऊन राजकीय वाटचाल केली होती. तेव्हा आपल्यावर विश्वास टाकलेल्यांना काय वाटेल याचा जराही विचार पवारांनी केला नव्हता. आज तसेच जर त्यांनी इकडून-तिकडून जमवलेली मंडळी त्यांना सोडून जाण्यातून होत असेल तर त्यावर टीका करणे निरर्थकच म्हटले पाहिजे. दुसरा मुद्दा बालिश व आचरट चाळ्यांचा आहे. उदयनराजेंनी काय केले किंवा काय केले नाही, हे सातार्‍याची जनता चांगलीच जाणते. परंतु, जितेंद्र आव्हाडांच्या अचकट-विचकट उचापत्या महाराष्ट्राने नेहमीच पाहिल्या व अनुभवल्या. त्यात दहीहंडीच्या बाजारीकरणापासून दहशतवादी इशरत जहाँबद्दलच्या कळवळ्याचाही समावेश होतो आणि तो महाराष्ट्रातल्या जनतेने खपवूनही घेतला. म्हणूनच आव्हाडांनी इतरांना नावे ठेवण्याआधी आत्मपरीक्षण करावे, तिथे त्यांना स्वतःची योग्यता आणि पात्रता दोन्ही समजेल.

@@AUTHORINFO_V1@@