गणपती नंतर आता सरकार बसवूया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |

 
 
काय म्हणता? तर आता बघता बघता गणपती आले अन् गेलेही. त्यांना निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या, असे आवतन त्यांना आपण देऊनही टाकले आहे. ‘चैन पडेना आम्हाला’ असेही आपण त्याला म्हणजे बाप्पाला सांगत असतो. नंतर मात्र नवरात्र येते. दिवाळी येते अन् ‘चैन पडेना’ म्हणणारे चैन करत असतात. बाप्पाचा उत्सव गेला असला, सरला असला तरीही उत्साह मात्र संपलेला नसतो. तो कधी संपतही नाही. तसा बाप्पाचाही ‘सीझन-टू’ येतोच. म्हणजे या दहा दिवसांत गणपतीची प्रतिष्ठापना करता आली नाही, तर लोक अखरपक्या गणपती मांडतात. आता पितृपक्ष पंधरवडा सुरू होईल. म्हणजे बाप्पा गेल्यावर पक्षाची आठवण. हेही खरेच की लोक आपल्या पक्षाला आपल्या बापाचा पक्ष समजतात. तशीच वागणूक ठेवतात. म्हणून मग ते नेहमीच पितृपक्ष घेतात. म्हणजे आपल्या बापाची बाजू घेतात अन् बाप राजकारणांत प्रतिष्ठापित झाला की तो मग आपल्या पक्षाला पोराचा पक्ष करून टाकत असतो. म्हणजे बाप विसर्जित होण्याची वेळ आली की त्या आधीच तो आपल्या मुलाला आपल्या मतदारसंघात आमदार- खासदार करत असतो. दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले असतील तर त्यांना पंचायत समितीपासून विधानसभेपर्यंत अॅडजेस्ट करत असतो. मुलं नसतील तर पुतणे असतात... त्यामुळे राजकारणात पितृपंधरवडा सतत सुरू असतोच... तर आता पितृपक्षात अखरपक्या गणपती मांडण्याची पद्धत आहे. विदर्भात ‘हाडपक्या’ असेही बोलीभाषेत म्हणतात. मात्र, या पितृपक्षात आता आचारसंहिता लागत आहे. सगळ्यांचे भले करणारे सरकार आपल्याला निवडायचे आहे. त्यामुळे अनेकजण त्यांचा पितृपक्ष सोडून शेजारच्या काकांचा असलेल्या भाजपात जात आहेत.
त्यानंतर दुर्गादेवी येते. नवरात्र यंदा प्रचाराच्या धडाक्यात असणार असल्याने भाऊ, दादा, ताईंचा सढळ हाताने पाठिंबा यंदा राहणार नाही. भाऊंना आरतीचा मान देता येणार नाही अन् ‘भाविकवक्तां’चे स्वागत, असे देवीचा लहान अन् भाऊंचा मोठा फोटो असलेले फ्लेक्स लावता येणार नाही. आता मतदान होत आले असताना मग कोजागिरीच्या नवरात्रात सरस्वती स्थापनेचे दिवस येतील. त्यानंतर लक्ष्मीची स्थापना नाही; पण घरी मूर्ती आणून तिची पूजा करण्याची पद्धत आहेच. गणपती विसर्जित केला जातो; दुर्गाही विसर्जित केली जाते, सरस्वतीचेही विसर्जन होते, मात्र लक्ष्मीचे विसर्जन होत नाही. ती मग भादव्यात येणारी महालक्ष्मी असो की दिवाळीला पूजन केली जाणारी लक्ष्मी असो. तिचे विसर्जन केले जात नाही. त्या मूर्ती किंवा तिचे सामान नीट सांभाळून ठेवून दिले जाते. लक्ष्मी नाराज होऊ नये यासाठी खास काळजी आपण घेतच असतो. ती मग गृहलक्ष्मी का असेना... म्हणून लक्ष्मीचे विसर्जन करत नाही. उलट तिचा पाय मुडपून ती घराबाहेर पडू नये, याची काळजी घेतो. म्हणून बुद्धिची देवता असलेल्या गणपतीचे विसर्जन करतो. पुढच्या वर्षी या, असे म्हणतो. बुद्धिची गरज अशी कधीकधीच पडत असते. पैशांची गरज रोजच असते. पैसा असला की बुद्धी खरेदीही करता येत असते. मतेही... मात्र यंदा बुद्धी वापरून लक्ष्मीसाठी मते देणार्यांनी तसे करू नये.
तर माणसं बुद्धी अन् बुद्धिदाता यांना विसर्जित करतो. आक्रमकता, कर्मशूरता, कर्म यांनाही विसर्जित करतो, म्हणूनच पराक्रम गाजवायला निघालेल्या दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन करत असतो. विद्येची देवता, कलांची जननी, विवेक बुद्धिची दात्री असलेल्या माता सरस्वतीची स्थापना करतो अन् मग तिचेही विसर्जन करतो. मात्र, लक्ष्मीची नाही करत. तिचे विसर्जन झाले की आपल्याला आपणच डुबलो, असे वाटते. त्यावरूनच हा वाक्प्रयोग आला असेल. कुणाचे पैसे हातचे गेले किंवा आर्थिक नुकसान झाले तर ‘बुडालो यार आरपार’ असे म्हणतात लोक. किंवा कुणाला र्ेंटका बसला आर्थिक तर लोकही अत्यंत कनवाळूपणे, अरेरे! बिचार्याने मोठ्या आशेने दुकान टाकले अन् बुडाला बेटा त्यात... असे म्हणतो. माणसं धंद्यात बुडतात, नोकरीत बुडतात, व्यवसायात बुडतात म्हणजे काय? तर त्यांच्या हातची लक्ष्मी जात असते. त्यांच्याकडे पैसा राहत नाही. म्हणून त्यांना बुडणे म्हणतात. याचा अर्थ लक्ष्मी गेली की माणसं विसर्जित होतात अन् जेव्हा त्यांच्याकडे लक्ष्मी असते तेव्हा ते बुद्धी, कर्म, विवेक यांचे विसर्जन करीत असतात. जगातल्या सार्या गोष्टी विकत घेता येतात, असे माणसांना वाटते. असे वाटणारा जो कुणी असतो त्यालाच माणूस म्हणतात. त्या अर्थाने आपण सारीच ‘माणसे’ आहोत!
आता लक्ष्मीचे हे महत्त्व म्हणा किंवा स्तोम म्हणा, आपण मांडले आहे असे अजिबात नाही. तिचा महिमा अपरंपार आहेच. सत्तेलाही लक्ष्मी म्हणतात. ती कुणाच्या गळ्यात माळ घालील हे सांगता येत नाही. मात्र काही लोकांनी सत्तेची दुकानदारी केली होती. विवेक सोडला म्हणून जनतेने त्यांना बुडविले. दुकानदारीच ती. बारशाचे सामान विकण्याचे दुकान असो किंवा मयताचे सामान विकण्याचे... धंदा हा धंदा असतो. आता निवडणुकीच्या काळात जो-तो आपले भजन जमविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणजे गणपती, दुर्गोत्सवात भजन म्हटले जाते अन् निवडणुकीत ते जमविले जाते. कार्यकर्त्यापासून नेत्यांपर्यंत सगळेच भजन जमवित असतात या काळात. म्हणून वर्हाडी भाषेत ‘भजन जमविणे’ हा वाक्प्रचार आहे. म्हणजे कुणी आपला मतलब साधून घेतला किंवा अनेकांना हवी असलेली गोष्ट ज्याने अडचणीतही साध्य करून घेतली, चलाखीने आपला मतलब साध्य करून घेतला त्याला लोक ‘हं, मस्त भजन जमविलं ना तू’ असं म्हणतात. आजकाल लोक भजनही ऐकत नाही अन् गजलही. आजकाल बेसिकली लोक काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे चांगलं म्हणणारे, सांगणारेही आता बोलत नाहीत. कुणीच कुणाचंच काहीही ऐकून घेत नसल्याने आता लोक केवळ ‘तू बघितलंस माझ्याकडं अन् मला आमदार झाल्यावानी वाटतं’, अशीच गाणी ऐकतात. पोपट उडाला भुरर्र्र्रऽऽ या पलिकडे आमची कल्पनाशक्तिच जात नाही...
आता अशा माहोल मध्ये भजन गायकाचे दिवस बसणे साहजिकच आहे. त्याने भजने कुणासाठी म्हणावीत? लोक भजन ऐकत नाहीत.
सकाळी म्हणावी भूपाळी, दुपारी म्हणावी गजल
संध्याकाळी म्हणावे स्तोत्र... पण, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र... सारेच कसे दुपारच्या जेवणाची (पुढच्या तीन पिढ्यांची) सोय लावण्यात मग्न आहेत. त्यांना भजन ऐकण्याचा भाव नाही अन् गजल ऐकण्याची भावना नाही. त्यामुळे गजल अन् भजनवाले गायक बसले आहेत. अशावेळी त्यांनी काय कराव? बरं भजन गाताना भाव मात्र भक्तीचा असला पाहिजे. ‘जिगर का खून भी चाहिये असर के लिए’ असे म्हणतात. भजन गाताना कबिराचा किंवा तुक्याचा, मिरेचा भाव मनात नसेल तर त्या भजनात ‘असर’ कुठून येणार? तोच नाही आला तर ते चिरंतन कसे टिकणार? भजन गाणे हाही धंदा झाल्यावर त्याचे पैसे किती मिळतात, हाच उद्देश. त्यामुळे या पवार साहेबांच्या भजनाचा असरही लवकरच ओसरला. त्यामुळे त्यांना आता दुसरा धंदा बघावा लागणार आहे. सध्याचे राजकारण हे बिग बॉसचा रीअॅलिटी शो झालेले आहे. इतरांना त्यातून बाहेर घालविणे हेच कौशल्य ठरत असते. आता हे आपल्या स्नेह्यांना, आप्तांना घराबाहेर काढणे हेच आजकालचे कौशल्य झाले आहे. राजकारणातल्या ‘बिग बॉस’ने आपल्या पक्षाच्या घरातून इतरांना रस्त्यावर आणण्याचे कौशल्य पणाला लावले आहे. अशा घरांमध्ये गणपती बसत नाही अन् अशांच्या समाजात गणपती बसविला तरीही त्यातून देशनिष्ठेची सामूहिक भावना निर्माण होत नाही.
@@AUTHORINFO_V1@@