पुरुषांनाही डोळसपणा देणारे स्त्रीभान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |



'भारतीय स्त्री शक्ति' संघटनेच्या उपाध्यक्षा आणि लेखिका नयना सहस्रबुद्धे यांच्या 'स्त्रीभान' या लेखसंग्रहाचे प्रकाशन उद्या १६ सप्टेंबरला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते ठाण्यात होत आहे. या निमित्ताने या पुस्तकाला नाटककार अभिराम भडकमकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित भाग...


'सा. विवेक,' 'लोकसत्ता,' 'महाराष्ट्र टाइम्स,' 'सकाळ' यामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. त्यामुळे त्यातील तात्कालिकता अटळ आहे. त्या त्या काळात आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चर्चा, वादविवाद, सदर लिहिणाऱ्या लेखकाचे आशयद्रव्य असणे हे स्वाभाविकच आहे. परंतु, नयना सहस्रबुद्धे यांनी एक लेखिका या नात्याने आपल्या आजूबाजूचा सामाजिक, राजकीय, धार्मिक, कौटुंबिक, आर्थिक परिसरच यातून मांडला आहे. या परिसरात घडणाऱ्या घटनांची जी रेंज यामध्ये दिसते, ती स्तिमित करून टाकणारी आहे. जगभरात घडणाऱ्या घटना, चळवळी आणि विचारयुद्धांचा त्यात समावेश आहे. स्त्रियांचे कुपोषण, कमर्शियल सरोगसी, जागतिक क्रीडा स्पर्धांमधील अन्याय, कर्तृत्वाच्या शिखरावर असूनही दुय्यमपणाचा अनुभव, धार्मिक स्थळातील भेदभाव, जेंडर बजेटिंग, मातृत्वासंदर्भातील कायदे, राजकीय संधी आणि सत्ता सहभाग, बारबाला, महिला उद्योजकता, मी टू चळवळ, थर्ड वेव्ह फेमिनिझम, एकटेपणा इत्यादी इत्यादी विविध स्तरांतील प्रश्न त्यांनी हाताळले आहेत. परंतु, या लेखनाचे वैशिष्ट्य हे आहे की, ते तात्कालिकतेच घुटमळत राहत नाही. विषयाचे वर्णन आणि अल्पशी शेरेबाजी इथवरच थांबत नाही, तर हा एका व्यापक चिंतनाचा आरंभबिंदू ठरतो आणि मग त्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याचा लेखिका प्रयत्न करताना दिसते. त्यासाठी देशीविदेशी विचारवंत, त्यांनी मांडलेल्या संकल्पना याचा ऊहापोह होतो.

 

विषयाच्या अनुषंगाने जागतिक घडामोडींचा आढावा घेतला जातो. त्याबरोबरच भारतीय मानसिकतेचे (विशेषतः पुरुषी) उत्खननच लेखिका करू पाहते. म्हणूनच तात्कालिकतेच्या पायावर एक सर्वव्यापी मांडणी केली गेलेली आपल्याला दिसते. या सगळ्याचे महत्त्वाचे कारण लेखिकेची विचारसृष्टी! जी खुली आहे, आपल्या पूर्वग्रहांना तपासण्याचा उमदेपणा असलेली आहे. प्रत्यक्ष चळवळीतल्या कामाचा दांडगा अनुभव हा त्या दृष्टीचा पाया आहे. त्यातला प्रत्येक विचार हा जगण्याशी घासून पुसून घेतलेला आहे आणि म्हणूनच हे लिखाण ना अतिआदर्शवादकडे झुकते ना अतिपुस्तकी होऊन बसते. याचा प्रत्येक सांधा हा रोजच्या जगण्याशी जोडला जातो. महाराष्ट्रात स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री चळवळीला मोठा इतिहास आहे. या चळवळीत 'स्त्रीमुक्ती'च्या पाश्चात्य विचारांचेही मोठे योगदान आहे. मुळात लेखिकेवर या दोहोंचा संस्कार आहे, पण यापैकी कुठल्याच प्रभावाखाली तिचा विचार आणि लेखन दबून गेलेले नाही. त्यांची वाट त्यांनी आपला व्यासंग आणि अनुभव यांच्या प्रकाशतच धुंडाळलेली आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य हे काळाचे तुकडे माणसाने आपल्या सोयीसाठी पाडले असले तरी काळ हा एकसंधच असतो. आजची मुळे ही कालपर्यंत गेलेली आहेत. कालचं सावट 'आज'वर असते, याचे पक्क भान या लेखांत दिसते. म्हणूनच परंपरा, नवता असे 'स्टिरिओटाईप' तुकडे न पाडता काळाच्या कसोटीवर घासून घेण्याची वृत्ती यामध्ये दिसते. आधुनिक जगण्याचे भान, त्यातून आकाराला येणारी नवी जीवनमूल्ये, जुन्याशी होणारा त्याचा झगडा त्यातून निर्माण होणारे ताणतणाव या सगळ्यातून जे हाताशी लागते, (मग ते डोळसपणे स्वीकारलेले आणि अपरिहार्यता म्हणूनही) त्याकडे पाहणारी लेखिकेची दृष्टी खूपच महत्त्वाची आहे. ती रूढार्थाने पारंपरिक नसलेल्या तरीही परंपरा मानणाऱ्या कुटुंबाचे संस्कार घेऊन आलेल्या स्त्रीची आहे. तत्त्वतः मोकळेपणा आणि स्वातंत्र्य मान्य असणाऱ्या, पण कळत-नकळत व्यवहारात बाईपण आड येणाऱ्या समाजात वावरणाऱ्या स्त्रीची आहे. चौकटीबाहेर पडणाऱ्या स्त्रीलाही नवनव्या चौकटीत बंदिस्त करणाऱ्या जगातल्या स्त्रीची आहे आणि म्हणून हताशा, वैफल्य आणि संघर्ष अटळ आहे. पण, इथे पुरुष आणि पुरुषप्रधान समाज खलनायकाच्या भूमिकेत नेऊन ठेवलेला नाही, तर संघर्ष आणि दावा मांडलाय तो मानसिकतेशी, विचारांवर असलेल्या पुरुषी पगड्याशी आणि म्हणून 'ते विरुद्ध आम्ही' असा सूर इथे नाही आणि लिखाणातला हा समजूतदारपणा हे या लिखणाचे सामर्थ्य आहे.

 

स्त्रियांवरचा अन्याय, तिच्या देहापलीकडे तिचे अस्तित्व अमान्य करण्याचा स्वभाव या सगळ्याबद्दल अत्यंत रोखठोक निषेध इथे व्यक्त होतो. स्त्रीचे श्रममूल्य, आर्थिक स्वातंत्र्य, मानवी जीवनाच्या उभारणीत तिचे आजवरचे योगदान या सर्वांची खणखणीत जाणीवही हे लेखन करून देते. त्यामुळे एकाच वेळी चिंतन, आत्मपरिक्षण, आवश्यक तिथे बेधडक संघर्ष आणि समंजस समन्वय या सगळ्यातून नव्या जगाची एक मांडणी आकाराला येताना दिसते. ती ठाम आणि खंबीर आहे, पण कर्कश्य नाही. इथला वाद आकलन वाढविण्यासाठी आहे, तो वितंडवादाकडे जात नाही. 'फॅक्ट्स आणि फिगर्स' यांचा विपर्यास करून मुद्दा पुढे रेटण्याची मानसिकता दिसत नाही. एक सोपा आणि खोटा शत्रू उभा न करता वृत्ती प्रवृत्तींच्या रूपाने ठिकठिकाणी दबा धरून बसलेले शत्रुत्व उजेडात आणण्याचा प्रयत्न दिसतो. माणसाच्या मर्यादांचे भान ठेवून त्यापलीकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रामाणिक खटाटोप या लेखात दिसतो. सर्व धर्मांचा स्त्रीकडे पाहण्याचा सारखा दृष्टिकोन पाहून त्या स्त्रियांच्या बाबतीतला सर्व धर्म समभाव दाखवून देतात. एकूणच एक स्त्री म्हणून याकडे पाहणारी दृष्टी ही तरतम भाव राखून आहे म्हणूनच ती खूप सकारात्मक आहे. अशाप्रकारे ती तात्कालिकतेच्या पलीकडे तर जातेच पण स्त्री, स्त्रीवाद, स्त्री समस्या हे ही भेदून पलीकडे जाते आणि मग हे 'स्त्रीभान' केवळ स्त्रियांपुरते मर्यादित राहत नाही तर ते एकूणच माणूसपणाला साद घालते. कुठल्याही माणसाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. त्याचे केवळ स्त्रीपुरते न उरणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे वाचताना स्त्रीला आत्मजाणीव आणि आत्मभान होऊ लागेलच, पण पुरुषांनाही आपल्याच विश्वात डोळसपणे डोकावण्याचे भान येईल. आपल्याच विश्वात अशासाठी की, आपले आणि स्त्रीचे विश्व काही फार वेगळे नसते, किंबहुना ते तसे नसलेच पाहिजे हे जाणवू लागेल. अपराधबोध आणि स्त्रीविषयक कृतज्ञतेची जाणीव होऊ लागेल. लिखाणाची भाषा सुबक आणि सुंदर आहे. कठीण 'टर्म्स' आणि 'टर्मिनोलॉजी' सोप्या भाषेत मांडली गेली आहे. त्यामुळे प्रत्येक लेख वेगळा असूनही सलग वाचण्याचा आनंद त्यातून मिळतो. कारण, अंतर्मनातील घुसमट, प्रत्यक्ष कामातला अनुभव यातून झालेल्या घुसळणीतून उमटलेला नयना सहस्रबुद्धे यांचा अंत:स्वर अतिशय अकृत्रिम आणि सच्चा आहे. 'स्त्रीभाना'च्या निमित्ताने अवघ्या माणूसपणाचे भान देणारी ही साहित्यकृती हा वैचारिक विश्वातला एक महत्त्वाचा दस्तावेजच म्हणावा लागेल. कारण, वैचारिक विश्वात अशा ठाम आणि समंजस स्वराची आज खूप आवश्यकता आहे. यापुढील लेखनासाठीही खूप खूप शुभेच्छा...!

 

सोमवारी ठाण्यात प्रकाशन सोहळा

 

सृजन संपदा, दिल्ली आणि अमेय प्रकाशन, पुणे आयोजित चिंतनशील लेखिका आणि 'भारतीय स्त्री शक्ती' संघटनेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा नयना सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या 'स्त्रीभान' या लेखसंग्रहाचा प्रकाशन समारंभ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि संशोधक-साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध नाटककार व विविधांगी लेखक अभिराम भडकमकर यांच्या विशेष उपस्थितीत सोमवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सहयोगमंदिर, घंटाळी, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ९८२१८१८८८२

 

- अभिराम भडकमकर

@@AUTHORINFO_V1@@