विषय एक - महाकवी दोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |



योगी अरविंदांची बाजीप्रभूंवरची कविता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते पुण्यात महाविद्यालयात शिकत असताना लिहिलेला बाजीप्रभूंवरचा पोवाडा, असे हे एकाच विषयावरील दोन महाकवींच्या कवितांचे रसग्रहण...


श्री अरविंदांचा वाङ्मयीन परिचय झाल्यानंतर अनेक वर्षांनी त्यांच्या लहान कवितांचा मराठीत अनुवाद करताना खूप आनंद मिळाला होता. त्यानंतर विमला कृष्ण गोखले या मैत्रिणीच्या आग्रहामुळे अरविंदांची बाजीप्रभूंवरची कविता घेऊन आले. दीर्घ कविता आहे. स्वतंत्र पुस्तिका. प्रथम कितीतरी दिवस तिला हात लावण्याचं धाडस करवेना! शेवटी एकदा पूर्ण वाचली आणि धारिष्ट्य केलं अनुवाद करण्याचं.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ते पुण्यात महाविद्यालयात शिकत असताना लिहिलेला पोवाडाही वाचला होता. बाजीप्रभूंवरचा. त्याचीही स्वतंत्र पुस्तिका निघाली होती. तिच्या प्रास्ताविकात त्या पोवाड्यावरच्या बंदीची तसंच सुटकेचीही हकिगत आली आहे. पोवाडा आहे लहान, दहा पृष्ठांचा. अरविंदांच्या दीर्घकवितेलाही पोवाडाच म्हणायला हवं खरंतर. कारण, ती आहे १८ पृष्ठांची. ती ब्लॅन्क व्हर्समध्ये लिहिलेली आहे, इंग्रजी भाषेतील. या दोन्ही कविता वाचल्यावर साहजिकच मनात तुलना सुरू झाली. कविताम्हणून नव्हे, परंतु, इतर तपशिलात. वाचकांना हा तपशील रंजक वाटेल. म्हणून तो त्यांच्यासमोर ठेवीत आहे.


अरविंदांची कविता आहे
१९०५ मध्ये लिहिलेली. त्यावेळी ते स्वतः राजकारणाच्या गदारोळात होते, तर सावरकरांची त्याआधीची, ते विद्यार्थी असतानाची. सावरकरांचा मुळात इतिहास हा विषय प्रेमाचा. त्यामुळे तिच्यात इतिहासाला फारसा धक्का लागत नाही. कविता इतिहासाला धरून आहे. अरविंदांना केवळ मध्यवर्ती घटना समजली. तीसुद्धा, सांगणाऱ्यानं ऐकीव माहितीवर आधारित आणि कदाचित अतिशयोक्ती करून सांगितली असावी. परंतु, ती घटना ऐकून त्या महाकवीची प्रतिमा अशी काही फुलरून आली की, तपशील समजून घेण्यासाठी ते थांबलेच नाहीत! पुस्तिकेच्या पहिल्याच पानावर त्यांची ऑथर्स नोटआहे. ती तीच अशीः



धिस पोएम इज फाऊंडेड ऑन द हिस्टॉरिकल इन्सिडेंट ऑफ द हीरॉइक सेल्फ-सॅक्रिफाइस ऑफ बाजीप्रभू देशपांडे, व्हू टू कव्हर शिवाजीज् रिट्रीट, हेल्ड द पास ऑफ रांगणा फॉर टू अवर्स विथ अ स्मॉल कंपनी ऑफ मेन अगेन्स्ट ट्वेल्ह थाऊजंड मोगल्स. बियॉण्ड द सिंगल फॅक्ट ऑफ धिस ग्रेट एक्सप्लॉइट (शुश्रिेळीं), देअर हॅज बीन नो अॅटेम्प्ट टू प्रिझर्व्ह हिस्टॉरिकल अॅक्युरसी.या प्रांजळ टीपेमुळे ऐतिहासिक वास्तवाचा प्रश्नच मिटला. तेव्हा तुम्हाला इच्छा झाली, तर कविता वाचायची ती केवळ कविता म्हणून. कवितेचाच आनंद घेण्यासाठी. मुख्य तथ्य जाणून घेण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची साक्ष काढली. राजा शिवछत्रपतिमध्ये ते सांगतात की, "तीन हजार शत्रूंशी बाजीप्रभू फक्त ३०० मावळ्यांनिशी जवळजवळ दोन प्रहर म्हणजे सहा तास खिंडीशी झुंजत होते." बाजी पडल्यानंतर उरलेल्या मावळ्यांनी सांभाळून माघार घेतली आणि ते जंगलात पसार झाले. कवितेला प्रारंभ करतानाच अरविंदांनी ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हात उष्ण झळांनी आसमंत जाळणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचं दृश्य उभं केलं आहे. शिवराय ज्या अंधाऱ्या अपरात्री थोड्या सैनिकांसह निसटले, त्यानंतरच्या त्यांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे, विशाळगडाच्या दिशेने असं चित्र त्यांनी रंगवलं आहे.



सावरकरांचा पोवाडा पारंपरिक चालीत बांधलेला. प्रारंभी
जयोऽस्तुते... यशोयुतां वन्दे ॥या त्यांच्याच ओळींनी चालू होतो. त्यानंतर देवीचा जागर. मग बाजींचा पराक्रम ऐकण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष शिवराय, राणा प्रताप ते तानाजी, धनाजी, संताजींपर्यंत साऱ्या वीरवरांना पाचारण केलं आहे. हे इतर कुणा कवीनेही केले असते. सावरकरांचे वेगळेपण म्हणजे वीरांबरोबर गडांनाही निमंत्रिले आहे त्यांच्याबरोबरच! यानंतर वाचकाला एक नवीच माहिती मिळते की, बाजीसुद्धा काही काळ मोगलांच्या सेवेत होते. शिवरायांनी हा मोहरा जोखला. आपला खास दूत त्यांच्याकडे पाठवला. मन वळवलं अन् मग हा नरवीर योग्य ठिकाणी म्हणजे शिवरायांकडे दाखल झाला. आदिलशाहीच्या बादशहाच्या आज्ञेने सिद्दीने पन्हाळगडाला प्रचंड फौजेचा वेढा घातला, जबरदस्त वेढा. तरी त्यातून त्यांची पालखी त्यांच्या शूर मावळ्यांनी वेढ्यातील एक फट शोधून तिच्यातून बाहेर काढली. अर्थातच, पहाटेस शत्रूच्या हे ध्यानी येताच पाठलाग सुरू झाला आणि मग "खिंडीत तटून राहून आम्ही शत्रूला अडवू. तोपर्यंत तुम्ही विशाळगडास सुखरूप पोहोचा," अशी गळ बाजींनी शिवरायांना घातली.



अरविंदांना हा तपशील माहिती नाही. त्यामुळे तिथे राजे बाजींना म्हणतात की
, "आम्ही गडावर पोहोचून ताजी कुमक आणतो. तोवर आपण लढवाल ना खिंड?" महाराजांपेक्षा बाजी १५ ते २० वर्षांनी त्यांच्याहून मोठे, अनुभवी महान लढवय्या. अरविंदांना हा वयातला फरकही माहिती नाही. सिद्दी मसूदची तीन हजारांची सेना पाठलागावर निघाली. पाऊस, अंधार, चिखल, निसरड्या वाटा, भयंकर अडथळे होते. महाराजांना विशाळगडाकडे आग्रहाने पाठवून बाजींनी ३०० मावळ्यांसह आपल्या प्राणांची बाजी लावली! तीन हजारांच्या सेनेशी लढा दिला. अरविंदांना या संख्या माहिती नव्हत्या. त्यांनी कवितेत ५० मावळ्यांनिशी खिंड लढवलीअसं लिहिलं आहे. दिल्लीहून मोगल बादशहानं पठाण, मोगल, अरब, गोंड, बक्सारी, उझबेक, रजपूत, बुंदेली आणि मराठेसुद्धा असलेली प्रचंड फौज राजांना पकडण्यासाठी शाहिस्तेखानाबरोबर पाठवली होतीच. परंतु, त्यांच्या योजना स्वतंत्रपणे चालल्या होत्या. आदिलशाहीबरोबर त्या काम करीत नव्हत्या. अरविंदांना हे माहिती नसल्याने त्यांनी वर्णिलेल्या लढाईत दिल्लीच्या मिश्रसेनेतील काही पथकं आली आहेत. उदाहरणार्थ पठाण, रजपूत वगैरे.सावरकरांच्या कवितेत शत्रू संख्येनं दुप्पट होता, असा उल्लेख येतो. परंतु, इतिहाससंशोधक बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनातून वस्तुस्थितीदर्शक आकडा आपल्याला कळतो. शत्रुसेना दसपट होती.




मराठ्यांनी प्रारंभी बंदुकांचा भरपूर वापर केल्याचं वर्णन अरविंदांनी केलं आहे. शेवटीसुद्धा विशाळगडावरून कुमक येते आणि ती शत्रुसेनेवर फैरी झाडून तिला सैरावैरा पळायला लावते
, असं दाखवलं आहे. अर्थात, वस्तुस्थिती अशी नाही. राजे गडावर सुखरूप पोहोचल्यावर करण्याची, तोफांच्या पाच बारांची खूण हीसुद्धा त्यांना माहिती नाही. लढवय्या हा कृतीतून जास्त बोलतो, मुखानं कमी. परंतु, अरविंदांचा तानाजी हा जरा जास्तच बोलघेवडा आहे! या झाल्या फरकांच्या गोष्टी. परंतु, एक साम्यबिंदू आपल्याला चकीत करून जातो. तो आहे माय भवानीचं दर्शन हा! जीवाच्या आकांताने लढणारे, जखमांनी घायाळ अवस्थेतील, लढाईच्या अंतिम क्षणाकडे चाललेले नि स्वतःच्या मृत्यूकडे क्षणाक्षणाने चाललेले बाजी... त्या प्रसंगाचे हे वर्णन मासल्यादाखल पाहा.

क्रुद्ध होऊन बाजी पुनश्च आत्मिक बळ उंचावून निकराने हात उचलतात तरी अचानक,

एकाएकी एक सुन्न शांतताच पसरली

त्यांच्या मनावर

जिंकण्याची ती दैवी स्फूर्ती पुसट होत होत

हृदयातून निघून जात असतानाच

एक विराट आकृती समूर्त झाली त्यांच्यापुढे

रक्तवस्त्रांकिता, विद्युत्गर्भ, कृष्ण मेघवर्णी

वाऱ्यावरती वाहणारे तिचे ते लांब केस

स्वर्गाला झाकून टाकणारे

जिच्या सर्वशक्तिमान हातांमध्ये

होतं एक खड्ग... एक कमळ, एक नररुंड

रक्तरंजित,

चौथा अभयहस्त-

माय भवानी!

... मग अंतर्धान पावली ती.

बाजी जाणत होते त्या विराट देवतेला.

ती भारतावर लक्ष ठेवून असते

अखंड, अखेरपर्यंत...


कवितेच्या शेवटी
, बाजींच्या निष्प्राण देहाजवळ शिवराय उभे आहेत, अशी कल्पना अरविंदांनी वर्णिली आहे. अर्थात, मुळात असं घडलेलं नाही. तेव्हा ते उभे असताना

"त्या देहाशेजारी भासमान झाला त्यांना

अस्पष्ट, धूसर, ढगासारखा प्रचंड आकार

एका हाती खड्ग, दुसऱ्या हाती नररुण्ड,

त्या हातानं उचलली पगडी बाजींची,

शिरपेचावरती रत्न चमकत होती अजूनही

त्यावरलं रक्त... रणयज्ञातली आहुती वीराची,

त्या हातानं उचलली ती पगडी

शिवरायांना घालण्यासाठी

अन् त्या क्षणी त्यांना दिसला

त्या रत्नांभोवती एक दिव्य सुवर्णमुकुट

झळाळणारा..."


शिवरायांना बाजींची पगडी घालणं हा. त्यापूर्वी कवीनं रंगवलेल्या एका प्रसंगाचा व्यत्यास आहे. त्यांनी (अरविंदांनी) असं दाखवलं आहे की, विशाळगडाकडे कूच करण्यापूर्वी शिवराय बाजींच्या मस्तकावर आपला जिरेटोप ठेवून त्यांना कडकडून मिठी मारतात. आता शिरपेचाभोवती महाराजांना दिसलेला दीप्तिमान सुवर्णमुकुट हा त्या आदिमायेने बाजींना कौतुकाने घातलेला सन्मानाचा मुकुट असावा! हे साहजिकच की, बंगालच्या महाकवीला ती दिसते ती कालीच्या रुपात! कालीपूजक आहे ना बंगाल! सावरकरांच्या कवितेला, खुणेचे पाच बार ऐकून मृत्योन्मुख, नव्हे मृत्युमुखी पडलेल्या बाजींच्या मुखावर क्षणभर हास्य प्रकटतं, तेवढा एक क्षण मृत्यू थांबतो! मग पुन्हा येतो. पण बाजींना मृत्यू नेतो? छे!

दिव्य द्युतिचा चकचकाट

आकाशी कोंदटला

रथ श्रीमती स्वतंत्रतेचा

भूवरती आला...

मग काय घडलं?

श्री स्वतंत्रता देवी

बाजिला नेती

आपुल्या रथीं

गंधर्व तनन तैं करिती

दुंदुभी नभीं दुमदुमती

श्री बाजी स्वर्गा जाती

करी चराचर विश्व

बाजीच्या जयजयकाराला

चला घालू स्वातंत्र्यसंगरी रिपूवरी घाला॥



अगदी साहजिकच की
, स्वातंत्र्यवीराची आदिमाया प्रकटते ती स्वतंत्रता भगवतीच्या रुपात. बाजींचा तो आत्मयज्ञ एवढा महान आहे की, त्यांच्या शेवटच्या क्षणी आदिशक्तीने स्वतः अवतरावे ही एकच कल्पना दोन्ही महाकवींच्या प्रतिभेला स्पर्शून शब्दात प्रकटली आहे. बाजींसमवेत रणांत पडलेले सारे वीरसुद्धा नभःपंथेस्वर्गारोहण करीत आहेत. तो सोहळा दिव्य आहे. नेहमी देव पुष्पवृष्टी करतात ना! महाकवीची विशेषता पाहा. देवतरू पुष्पवृष्टी करत आहेत आणि देव प्रत्यक्ष ताराफुलं वर्षावीत आहेत. सत्कीर्ति सुंदरीने बाजींना ओवाळले आहे. हे सावरकरकृत वर्णन! ऐतिहासिक तथ्यापासून दूर असली तरी अरविंदांची कविता वाचायची ती केवळ काव्यानंदासाठी आणि कवीची त्या वीरवराविषयीची आत्मीयता अनुभविण्यासाठी. या घटनेत त्यांनी ओतलेली नाट्यमयता आणि कल्पनाविलास यांचा आनंद घेण्यासाठी... सावरकरांचा पोवाडा तर स्फूर्तीने रसरसलेला आहेच. त्यातलाही कल्पनाविलास चिरतरुण! त्या वीराला अन् वीरांना मानवंदना. तसाच या दोन्ही कवींनाही हा रसिकाचा मानाचा मुजरा.

- अनुराधा खोत

@@AUTHORINFO_V1@@