साहित्य पंढरीतील विठोबा : सावाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019   
Total Views |



नाशिक सार्वजनिक वाचनालय भारतातील सर्वात जुने असे तिसर्‍या क्रमांकाचे वाचनालय आहे
. भारतातील कोलकाता येथील आणि मुंबई येथील एशियाटिक लायब्ररीनंतर ‘सावाना’चा भारतात असणारा तिसरा क्रमांक ही नाशिककर नागरिकांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.



सन १८४० साली स्थापन झालेले म्हणजे १७९ वर्षांपासून नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील वाचकांना विविध ग्रंथांची ज्ञानकवाडे खुली करून देण्याचे कार्य सार्वजनिक वाचनालय
, नाशिक अर्थात नाशिककरांच्या ‘सावाना’मार्फत केले जात आहे. तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍यांनी ‘सिटी लायब्ररी’ नावाने ‘सावाना’ची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी ही पहिली संस्था होती आणि तेव्हापासून असणारा संस्थेचा अव्व्वल क्रमांक आजही तसाच टिकून आहे, हे विशेष. भारतास स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यावर या वाचनालयात भारतीय नागरिकांचे प्रभुत्व वाढत गेले. १९२१ सालापासून वाचनालयाची माहिती उपलब्ध असून आजवर नीलकंठ पाटणकर, कृष्णाजी वझे, वि. ग. केळकर, गो. वा. प्रधान, भा. ल. पाटणकर, महादेव जानोरकर, प्र. वा. देवलंकार, चिंतामण पाटणकर, पु. ना. पंडित, रा. वि. रहाळकर, डॉ द. ब. खाडिलकर, वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, वि.मा.दी. पटवर्धन, ग. ज. म्हात्रे, डॉ. वि. म. गोगटे, डॉ. अ. वा. वर्टी, डॉ. बा. वा. दातार, प.पू. वैशंपायन, मु. शं. औरंगाबादकर, शं. सराफ, मधुकर झेंडे आणि आताचे विलास औरंगाबादकर आदी अध्यक्षांनी ‘सावाना’ची यशस्वी धुरा सांभाळली आहे.



नाशिक सार्वजनिक वाचनालय भारतातील सर्वात जुने असे तिसर्‍या क्रमांकाचे वाचनालय आहे
. भारतातील कोलकाता येथील आणि मुंबई येथील एशियाटिक लायब्ररीनंतर ‘सावाना’चा भारतात असणारा तिसरा क्रमांक ही नाशिककर नागरिकांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. सुरुवातीच्या काळात ‘सावाना’ हे येथील पेशवेवाडा म्हणजेच सरकारवाड्यात भरत असे. १ मे, १९६०ला महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर १९६०च्याच दशकात यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली. त्यांचे साहित्य आणि संस्कृती यावर प्रेम असल्याने त्यांनी त्याकाळी राज्याचा सांस्कृतिक आणि साहित्यिक आलेख उंचावत जावा, याकरिता अनेक संस्थांना मदत केली. त्यात ‘सावाना’चादेखील समावेश आहे. ‘सावाना’ची वास्तू ज्या भूखंडावर दिमाखात उभी आहे, त्या वास्तूचा भूखंड त्यांनीच उपलब्ध करून दिला. तसेच, या भूखंडावर वास्तू उभारण्याकरिता शासनाने त्या काळात मदत देऊ केली. शहराचे सांस्कृतिक केंद्र उभे राहात असताना आपलेही योगदान असावे, या भावनेतून फ्रेनीभाई दस्तुर कुटुंबीयांनी टाऊन हॉल उपलब्ध करून दिला. भूखंड, वास्तू आणि टाऊन हॉल यांची रचना जरी उभी राहिली तरी, भविष्यात वाचनालय सुस्थितीत चालणे आवश्यक होते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी नाट्यगृह उभारण्याची संकल्पना वाचनालयासमोर विशद केली. त्यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज आणि ज्येष्ठ नाटककार आणि लेखक वसंत कानेटकर या नाशिकच्या सुपुत्रांनी प. सा. नाट्यमंदिराची स्थापना केली.



१९७० मध्ये लेखक पु
. ल. देशपांडे यांच्या हस्ते प. सा. चे उद्घाटन झाले. कुसुमाग्रज यांनी ‘सावाना’चे सुमारे नऊ वर्ष अध्यक्षपद भूषविले. या काळात ‘सावाना’चा प्रवास ‘वाचकाभिमुख ते लोकाभिमुख’ या दिशेने होण्यास सुरुवात झाली. ग्रंथालयाच्या कपाटात असणारी पुस्तके जर वाचकांना मिळाली तर, साहित्याचा विस्तार होण्यास मदत होते आणि त्यातूनच समाजात मूल्याधिष्ठीत व्यवस्था रुजविणे सहजसाध्य होऊ शकते, याची कल्पना असल्याने सावानाच्या वतीने लोकांसाठी विविध उपक्रम राबविण्यास कुसुमाग्रज यांनी सुरुवात केली. त्यात उत्तमोत्तम पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाऊ लागली, साने गुरुजी कथामाला या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वाचनालयाकडे कल वाढला. सध्या आपले ५१ वे वर्ष साजरे करत असलेला जिल्हा साहित्यिक मेळावा नवरात्रीतील पहिल्या शनिवार व रविवारी साजरा होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्यिक एकत्र येतात व साहित्य या विषयावर संवाद घडून येतो. कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने ‘सावाना नागरिक शिक्षक गौरव’ समारंभ सुरू झाला. यावर्षी त्यास ५० वर्ष पूर्ण होत आहेत. नागरिकांनी शिक्षकांचा गौरव करावा, त्यासाठी समितीने निधी गोळा करावा आणि आयोजन ‘सावना’ने करावे, अशी उदात्त कल्पना यामागे आजही राबविली जात आहे. आजही ‘पुस्तक मित्रमंडळ’ या उपक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला विविध विषयांवरील व्याख्यान आयोजित करून पुस्तकांवर चर्चा केली जाते. गेल्या १८ वर्षांपासून माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रतिवर्षी सावानाच्या वतीने देण्यात येतो.



वाचनालयात एक लाख
, ८० हजार पुस्तके, त्यात ४० हजार संदर्भ ग्रंथ, पोथी विभागात १० हजार दुर्मीळ पोथ्या, जेष्टरामभाई बटाविया, प्रकाश वैशंपायन, शिवाजी पाटील, ललित बापट आदी देणगीदारांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या वस्तूसंग्रहालयात दुर्मीळ मूर्ती, वस्तू, चित्र उपलब्ध आहेत. जिज्ञासू नागरिक नियमित याचा लाभ घेत आहेत. वाचनालयाने शहराचा वाढत विस्तार लक्षात घेत सन २०१० पासून गंगापूर रोड आकाशवाणी केंद्रासमोर स्व. गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालय सुरू केले आहे. वाचनालयाच्या पुस्तक देवघेव विभागाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच, नाशिकचे वाढणारे नागरिकीकरण लक्षात घेता वाचकांच्या अधिकाधिक जवळ पोहोचता यावे, यासाठी लायब्ररी ऑन व्हील सुरू करण्यात येणार आहे. नाशिकच्या विविध चौकांत हे वाहन उपलब्ध होणार असून यात मोबाईल अ‍ॅपवर ग्राहकांनी पसंती दर्शविलेली पुस्तके त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रंथालय सप्ताहाच्या माध्यमातून साहित्यनिष्ठांची मांदियाळी उपलब्ध करून देण्यात येत असते. सावानाचे माजी अध्यक्ष शं. सराफ यांच्याच शब्दांत सावाना हे संस्कृतीची आरोग्यशाळा असून ‘सावाना’ हे महाराष्ट्रातील वाचनालयांची गंगोत्री आहे. “आपल्या वाचनालयाने तर एक इतिहास घडविला आहे. दीडशे वर्षांचा आपल्या वाचनालयाचा इतिहास एक अभूतपूर्व घटना आहे.” अशा शब्दांत अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘सावाना’चा गौरव केला आहे. तर, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विं. दा. करंदीकर, वि. स. खांडेकर, शांता शेळके, दुर्गा भागवत अशा कितीतरी मान्यवर साहित्यिकांनी ‘सावाना’स भेट देत या वाचक चळवळीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@