या रे या, सारे या...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2019
Total Views |


या रे या, सारे या. लगबग करा. पटापट या...! इतर कुठेही जाऊ नका! सध्या सत्तेत येण्याची शक्यता केवळ आणि केवळ भाजपा-सेनेचीच असल्याने, धरायचीच झाली तर फक्त त्याच पक्षांची कास धरा. निवडणूक तोंडावर असल्याने घाई करा. लवकरात लवकर निर्णय घ्या. नवीन पक्षात प्रवेश करून स्वत:ची उमेदवारी अन् आमदारकी आरक्षित करून घ्या. तसेही, विचारांचे लोढणे खांद्यावर वाहिले नव्हतेच तुम्ही कधी. त्यामुळे, कालपर्यंत ज्याला शिवीगाळ केली, ज्याच्या नावानं कडाकडा बोटं मोडली, ज्यांचं नाव निघालं तरी नाकं मुरडलीत, ज्यांच्यावर कायम जातीयवादाचा शिक्का मारला, त्यांच्या पक्षात प्रवेश करा. शेवटी काय, सत्ता महत्त्वाची! पक्ष अन् विचारधारेचं काय, अंगावरची वस्त्रं बदलण्याइतकं सोपं झालंय् आताशा या व्यवहारी जगात विचारधारा बदलणं. शिवाय त्याचे ओझे वाहायला सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत की, सर्वदूर! भल्या मोठ्या संख्येत. त्यांना भारी आकर्षण असतं बरं, त्या विचारांचं! वृथा अभिमानही असतो त्यांना, ते चालत असलेल्या कंटकाकीर्ण मार्गाचा. त्यांनी अनुसरलेल्या विचारांचा, नीती, तत्त्वांचा. त्यासाठी करावयाच्या त्याग, बलिदान, साधनेचा. पण, राजकारणात प्यादी केवळ लढण्या अन् मरण्याच्या कामाची असतात. नेत्यांचं मात्र तसं नसतं. त्यांना पदं भूषवायची असतात. राज्यकारभाराचा शकट हाकायचा असतो. त्यासाठी सत्ता आवश्यक असते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतली कितीतरी माणसं एव्हाना तरबेज झाली आहेत या कामात. काही नावं बघाना! सत्ता कुणाची, तिथली माणसं कोणती, कुठल्या विचारांशी त्यांची बांधिलकी आहे, वगैरे सारे प्रश्न केराच्या टोपलीत टाकून त्यांनी आजवर आपल्या राजकारणाचा डोलारा सांभाळला. दिल्ली-मुंबईत हुजरेगिरी केली अन् मंत्रिपदं मिळवलीत. त्यांना आता नव्याने सत्तेची हाव निर्माण झाली आहे. त्यामुळे, कालपर्यंत अंगावर पांघरलेली झूल झुगारून त्यांचा राजकीय प्रवास नव्या दिशेने सुरू झाला आहे.
 
वेगवेगळ्या घोटाळ्यांचे साक्षीदार सोबतीला घेऊन राबवलेल्या सत्तेचा दुष्परिणाम कॉंग्रेसने निवडणुकीतील पराजयाच्या रूपात पाच वर्षांपूर्वी भोगला. प्रचंड भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, सत्तेचा माज, अशी विविधांगी कारणंही त्याला साह्यभूत ठरली. लोकांनी राज्यकारभाराची जबाबदारी सोपवत भाजपा व मित्रपक्षांवर विश्वास व्यक्त केला. प्रचंड मेहनत, सुयोग्य नियोजन, स्वच्छ कारभार, पारदर्शी शासन, विकासाचा ध्यास, हे राष्ट्र वैभवसंपन्न करण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्यांनी तो विश्वास सार्थ ठरवत घोडदौड आरंभली. त्याचा परिणाम हा की, जनतेनेही पुन्हा एकदा सत्ता अन् विश्वासाची दुरुक्ती केली. परिणामस्वरूप, सत्तेतली माणसं अधिक वेगाने, झापटल्यागत कामं करू लागली. त्याचे परिणाम स्थानिक, राष्ट्रीयच काय, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरही दिसू लागले. अर्थक्षेत्रापासून तर अंतराळक्षेत्रापर्यंत त्या ध्येयवेडेपणाची छाप उमटली. सार्या देशात सकारात्मक चित्र निर्माण होऊ लागले. जनमानसातला सरकारबद्दलचा विश्वास दुणावला. आता, पुढची काही वर्षे सत्तेची धुरा सांभाळणारे खांदे बदलणार नाहीत, हे दिवसागणिक स्पष्ट होऊ लागले. तशी खात्री पटू लागली तसतशी, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अस्वस्थता वाढू लागली. सत्तेविण कासावीस झालेली माणसं सैरभैर झाली. वाट मिळेल तशी सुसाट पळू लागली. कालपर्यंत विरोधकांना कमजोर म्हणून हिणवणार्या बड्याबड्या नेत्यांवर, स्वत:च्या ताकदीवर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांकडे हतबलपणे बघण्याची वेळ आली. कधीकाळी विरोधकांच्या अल्पशा संख्येवरून त्यांची खिल्ली उडवणार्यांना आज आपापले तंबू शाबूत ठेवणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. मुळात, ते विचारांसाठी जगलेच नव्हते कधी. नीतिमत्तेची चाड, हा तर त्यांच्यासाठी हसण्यावारी नेण्याचा विषय होता. जे नेत्यातच नाही, ते कार्यकर्त्यात कसे येणार? तेही आता कशाचीही पत्रास न बाळगता, सुसाट सुटले आहेत. ज्या पवारांनी स्वत:च कॉंग्रेस पक्षाची शकले करत स्वत:चा वेगळा राजकीय घरठाव मांडला, ते आता आपल्या सहकार्यांना कसे रोखणार? सत्तेची गणितं मांडण्यातच हयात खर्ची घातलेल्या कॉंग्रेसजनांना तरी स्वत:ची पडझड कशी रोखता येणार आहे?
 
एक काळ होता, भाजपाचे लोकसभेतले संख्याबळ केवळ दोन होते. भविष्यात कधी आपण ‘त्या’ बाजूने बसू, असा विचारही तत्कालीन नेत्यांच्या मनात भीत भीतच येत असावा. हीच स्थिती कम्युनिस्टांची. बोटावर मोजण्याइतकी संख्या असायची त्यांचीही संसदेतली. इंदिरा हत्येनंतर तर सारे विरोधक एका मुठीत मावावेत एवढेच उरले होते. पण, म्हणून लढण्याची ऊर्मी संपली नाही कुणाचीच. हे विचारांसाठी, तत्त्वांसाठी लढणं वगैरे फालतू असल्याचे वाटले नाही त्यांच्यापैकी कुणालाच कधी. की, यापेक्षा कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून सत्ता उपभोगण्याचा विचारही शिवला नाही कधी कुणाच्या मनाला. उलट, वाट्याला आलेला संघर्ष हेच प्राक्तन असल्याचे समजून, हाती असेल ते गोड मानून सत्ताधार्यांशी झगडत राहिलेत तत्कालीन नेते. लोकांनी खिल्ली उडवली तरी विचार सोडला नाही. पराभव समोर दिसत आहे म्हणून लढणं सोडलं नाही त्यांनी कधीच. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती आज उद्भवली आहे. इथे विरोधी पक्ष म्हणून कुणालाच काम करायचे नाहीय्. सर्वांना येनकेनप्रकारेण सत्तेत भागीदार व्हायचे आहे. सत्ता उपभोगायची आहे.
 
लोकशाहीव्यवस्थेत विरोधी पक्षाचेही स्वत:चे एक स्थान आहे. महत्त्व आहे. त्याचीही एक ताकद आहे. जबाबदारी आहे. संख्याबळाचे गणित ज्याच्या पारड्यात त्यानं कारभार करावा. उर्वरितांनी त्याला मदत करावी. त्याच्यावर नजर ठेवावी. चुका ध्यानात आणून द्याव्यात. प्रसंगी कडवा विरोधही करावा, हेच विरोधी पक्षाचे काम. पण, आज परिस्थिती अशी की, ते नकोय् कुणालाच! राजकारण सत्तेसाठी करायचे असते हे मान्य. पण, सत्ता हातात नसेल तरीही जनहितार्थ करण्याजोगी बरीच कामं असतात. विशेषत: जनतेच्या आवाजाला बळकटी देण्याची एक मोठी जबाबदारी विरोधी पक्षाची असते. आजच्या सत्ताधार्यांनी अगदी परवापरवापर्यंत ती जबाबदारी पार पाडली आहे. सध्या मात्र, नेमकी तीच जबाबदारी टाळण्याची धडपड चालली आहे इथे. विरोधी बाकांवरची थोडीथोडकी माणसं सोडली, तर सारीच सत्तेच्या दिशेने वाहवत सुटली आहेत. कृपाशंकर सिंह, 370 च्या मुद्यावर कॉंग्रेसने विरोध केला नाही म्हणून त्रागा करतात अन् ते हटविण्याचा निर्णय घेणार्या भाजपाच्या खेम्यात बसण्याची तयारीही दर्शवितात, ही नौटंकी तर राजकारणालाही न शोभणारी.
 
 
 
परवा कुणीतरी म्हणालं, या देशातला विरोधी पक्ष इतका कमजोर होणे ही हसण्यावारी नेण्याची नव्हे, तर चिंतेची बाब आहे. केवळ सत्तेसाठी इकडून तिकडे वा तिकडून इकडे भ्रमण करणारी राजकीय जमात सत्ता नसतानाच्या काळात साथीला उभी राहीलच, याची शाश्वती नाही. अशा स्थितीत सर्वांसाठीच कवाडं सताड उघडी करून बसलेल्या भाजपा अन् शिवसेनेनेही एकदा, दाराशी आलेल्या प्रत्येकाचेच स्वागत करायचे किंवा कसे, याचा निर्णय घेण्याची गरज आहे. कारण अशा संधिसाधूंमुळे संख्याबळ भलेही वाढेल. पक्ष‘बळ’ कधीच वाढणार नाही. एकतर, या दोन्ही राजकीय पक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या संघर्षातून ही ताकद कमावली आहे. सत्ता हाताशी नसतानाच्या काळातील त्यांची लढाई विसरणे योग्य ठरणार नाही... म्हणूनच, या रे या, सारे या! असे म्हणणे बंद झाले पाहिजे आता...
@@AUTHORINFO_V1@@