'मिसेस' मुख्यमंत्र्यांना ट्रोल करणाऱ्यांची खैर नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2019
Total Views |

 


मुंबई : गड-किल्ल्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना समाजमाध्यमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर पसरविणाऱ्यांविरोधात राज्य महिला आयोगाकडे बुधवारी अखेर तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार सोमेश कोलगे यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनंतर अमृता फडणवीस यांच्याबाबत समाजमाध्यमांवर तक्रार दाखल करणाऱ्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

पर्यटन विकासाला चालना देण्याच्या हेतूने राज्य सरकारने 'वर्ग-२'मधील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता. याबाबत गैरसमजुतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले सरकार विकायला निघाले, असा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर सरकारवर टीका करताना काही जणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही टीका केली. समाजमाध्यमांवर टीका करताना अनेकांनी भान न राखता खालच्या पातळीवर आणि अर्वाच्य भाषेत संदेश प्रसारित केले. अनेकांनी स्त्री च्या प्रतिष्ठेचे भान न राखल्याने याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

 
 

शिक्षेची मागणी

 

आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांनी यावेळी स्वतःच्या नावासह जातीचे नाव जोडण्याचेही दुःसाहस केले. हा प्रकार म्हणजे माहिती-तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंडविधान संहितेनुसार गुन्हा ठरत असून तशा मजकुरामुळे अप्रत्यक्षरित्या मानवी तस्करीस प्रोत्साहन दिले जाऊ शकते. त्यामुळे याविरोधात बुधवारी राज्य महिला आयोगात सोमेश कोलगे यांनी तक्रार दाखल केली. अमृता फडणवीस या महिला असून, त्यांच्या प्रतिष्ठेविरोधात सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या मजकुराची चौकशी करून संबंधितांना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य महिला आयोग अधिनियमानुसार कलम १० अंतर्गत स्वतःहून दखल घेत चौकशी केली पाहिजे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

 
 

याआधीही टीका

 

"अमृता फडणवीसांवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मराठा क्रांती मोर्चे सुरू असताना समाजमाध्यमातून अमृता फडणवीसांवर अश्लाघ्य भाषेचा प्रयोग झाला होता. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन स्त्रीची प्रतिष्ठा राखण्याची सवय समाजमाध्यमात असली पाहिजे. कारवाई झाल्यास असे प्रकार पुन्हा होणार नाहीत," असे तक्रारदार कोलगे यांचे म्हणणे आहे.

 

राज्य महिला आयोगाच्या कार्यवाहीकडे लक्ष

 

याबाबत रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या कार्यवाहीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. समाजमाध्यमांवर महिलांच्या प्रतिष्ठेचा मान न राखणाऱ्यांविरोधात राज्य महिला आयोग नेमकी काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा सन्मान न करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा अधिकार राज्य महिला आयोगाकडे आहे. याचा ते वापर करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

@@AUTHORINFO_V1@@