आरेवरून आदित्य ठाकरे ट्रोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2019
Total Views |



मुंबई : पत्रकार परिषद घेऊन आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेडला विरोध करणारे शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे समाज माध्यमांवर चांगलेच ट्रोल झाले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्या विरोधी भूमिकेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे आरेतील कारशेडमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम सांगण्यासाठी मुंबईभर आपल्या जास्त पेट्रोल खाणाऱ्या गाडीतून प्रवास करत असल्याची खोचक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरेतील कारशेडला विरोध दर्शवत असतानाच प्राणिसंग्रहालयाच्या प्रश्वावर मात्र सारवासारव केली.

 

एकीकडे आरेमध्ये नियोजित असणाऱ्या कारशेडला विरोध करायचा आणि दुसरीकडे महापालिकेअंतर्गत याचठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या प्राणिसंग्रहालयाच्या प्रश्नाबाबत टाळटाळ करण्याचा आदित्य ठाकरे यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. मंगळवारी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरेमधील नियोजित मेट्रो-3 च्या कारशेडला विरोध दर्शविला. मेट्रोला विरोध नसून आरेतील कारशेडला आमचा विरोध असल्याचे त्यांचे म्हणणे. त्यासाठी जैवविविधतेचे कारण देत ठाकरे यांनी आपला विरोध दर्शविला. मात्र, यावेळी एका पत्रकाराने आरेतील नियोजित प्राणिसंग्रहालयाबाबत प्रश्न विचाराताच त्यांची तारांबळ उडाली. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सारवासारव करत, याठिकाणी कॉन्झर्वेशन व रेस्क्यू सेंटर उभे राहणार असल्याचे सांगितल. शिवाय आता मुद्दा कारशेडचा असून प्राधान्य त्याला असल्याचे म्हणत प्रश्नाला बगल दिली. एकूणच यावेळी आदित्य यांचा दुटप्पीपणा सपशेल दिसल्यामुळे नेटकऱ्यांनी आज त्यांना विविध माध्यमांवर ट्रोल करायला सुरुवात केली.

 

आदित्य ठाकरे आरेतील कारशेडमुळे पर्यावरणावर होणार परिणाम सांगण्यासाठी मुंबईभर आपल्या पेट्रोल खाणाऱ्या एसयूव्ही मधून प्रवास करत असल्याची खिल्ली एका नेटकऱ्याने ट्विटरद्वारे उडवली. या ट्विटवर नेटिझन्सने बोचक प्रतिक्रिया दिल्या. केवळ एका गाडीचा नाही तर त्यांच्या ताफ्यात असणाऱ्या सर्व गाड्यांचा उल्लेख करा, अशी खोचक टिप्पणी एका नेटकऱ्यांनी केली. एकूणच सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसायचे आणि शहरासाठी आवश्यक असणाऱ्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका दिसल्याने नेटकऱ्यांनी आदित्य यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

@@AUTHORINFO_V1@@