मसूद अजहरची सुटका, पाकची नापाक कृती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2019
Total Views |

 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय भारताने घेतला आणि पाकिस्तान बिथरला. मुळात यात पाकिस्तानने बिथरण्याचे काही कारण नव्हते. कारण भारताने जम्मू-काश्मीरबाबत जो काही निर्णय घेतला तो त्याच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रातील आणि घटनेला धरून होता, पाकिस्तानातील कोणत्या प्रांताबाबत नव्हता. मात्र, पाकिस्तानची गेल्या काही दिवसांतील वागणूक ही पिसाळल्यासारखी आहे. पाकिस्तान आधीही भारतात घातपाती कारवाया घडवून आणत होता, आता तर त्याची वागणूक चेकाळल्यासारखी झाली आहे. भारताचे काय करू आणि काय नको, असे त्याला झाले आहे. प्रत्यक्षात पाकिस्तान भारताचे काहीच वाकडे करू शकत नाही. मनात आणले तर भारतच जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे अस्तित्व पूर्णपणे मिटवू शकतो. पण भारत तसे करणार नाही, कारण भारताची तशी वृत्ती आणि संस्कृती नाही.
 
 
जगा आणि जगू द्या, या सिद्धांतावर भारताचा विश्वास आहे, मात्र पाकिस्तानचा नाही. पाकिस्तान स्वत:ही नीट जगत नाही आणि भारतालाही सुखासमाधानाने जगू देत नाही. पाकिस्तानचा जीव आणि ताकद भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. मनात आणले तर भारत एकाच दिवसात पाकिस्तानला चिरडू शकतो. आपला जीव केवढा आणि आपण करतो काय, याचे भान पाकिस्तानने ठेवणे आवश्यक आहे.
 
अनेक वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तान सुधरत नाही, त्याला अक्कल येत नाही, याचे आश्चर्य वाटते. भारतात घातपाती कारवाया घडवून आणणे आणि अतिरेक्यांना आश्रय देणे पाकिस्तानने थांबवले नाही. पुलवामा येथील केरापोच्या वाहन ताफ्यावर आत्मघातकी हल्ला चढवणार्या जैश-ए-मोहम्मदचा सूत्रधार मसूद अजहरची पाकिस्तानने नुकतीच तुरुंगातून गुपचूप सुटका केल्याचे वृत्त आहे. मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय अतिरेकी आहे. याच वर्षीच्या मे महिन्यात मसूद अजहरला संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले होते. भारतानेही आपल्या दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली त्याला अतिरेकी घोषित केले आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळेच मसूदला पाकिस्तानने अटक केली होती. मसूदची अटक ही जगाच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी आहे, असे त्या वेळी म्हटले जात होते, त्याचे प्रत्यंतर आले आहे. भारतात घातपाती कारवाया घडवून आणण्याच्या बदल्यात मसूद अजहरची सुटका झाली आहे. राजस्थान आणि जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानला मसूद अजहरच्या मदतीने घातपाती कारवाया घडवायच्या आहेत. यासाठी या दोन्ही राज्यांच्या सीमांवर पाकिस्तानने आपले लष्कर आणल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे.
 
 
पण, असे करत पाकिस्तान स्वत:च्या पायावर दगड पाडून घेत आहे. भारतात आता घातपाती कारवाया घडवून आणणे पाकिस्तानसाठी सोपे नाही. कारण भारतात आता डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार नाही, तर नरेंद्र मोदी यांचे आहे! मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत, असे म्हटले जात होते. तसेच आता भ्रष्टाचारी, देशद्रोही आणि अतिरेक्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मोदी आणि शाह यांची जोडी दिसत आहे! त्यामुळे मसूद अजहर येवो की त्याचा बाप! भारतात आता कोणत्याही घातपाती कारवाया करणे म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालणे आहे.
पण, पाकिस्तानला आणि मसूद अजहरसारख्या त्याच्या बगलबच्च्यांच्या हे लक्षात येत नाही. आईसलॅण्डच्या दौर्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानाला पाकिस्तानने आपली हवाई हद्द नाकारली आहे. असे करून पाकिस्तानने भारताबद्दलचा आपला द्वेष दाखवून दिला आहे. मुळात भारताचा द्वेष हाच पाकिस्तानच्या जगण्याचा प्राणवायू आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. भारताशी दोन दिवसांचे युद्ध करण्याचीही पाकिस्तानची क्षमता नाही. मात्र, पाकिस्तान उसना आव खूप आणत आहे. पाकिस्तान भारतात घातपाती कारवाया घडवून आणत आहे, हे भारतातील लहान मुलालाही माहिती आहे. जगालाही याची जाणीव आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या न्यायाने भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. भारत, पाकिस्तानात घातपाती कारवाया घडवून आणत आहे, या आशयाचे डोजियर पाकिस्तानने भारतीय अधिकार्यांना सादर केले आहे.
 
 
या डोजियरचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार करत भारताला बदनाम करण्याचे हे पाकिस्तानचे षडयंत्र आहे. पण, यातून फारकाही साध्य होणार नाही. जगातील एकही असा देश नसेल, जो या डोजियरच्या निमित्ताने पाकिस्तानवर विश्वास ठेवेल. या आधी करतारपूर कॉरिडॉरच्या निमित्ताने भारतातील खलिस्तानवादी शीख समर्थकांना भडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करून पाहिला, पण तो पूर्णपणे अपयशी ठरला.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत काश्मीरमधील मानवाधिकाराच्या हननाचा मुद्दा उपस्थित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. जम्मू-काश्मिरातील मानवाधिकाराच्या हननाची चिंता करण्यापेक्षा पाकिस्तानने आपल्या देशात काय सुरू आहे, ते पाहावे. पाकिस्तान भारताला अडचणीत आणण्याचा जेवढा प्रयत्न करेल, तेवढा तो त्याच्यावरच उलटणार आहे. पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार तेथील लष्कराच्या हातचे बाहुले झाले आहे. त्यामुळे लष्कर सांगेल त्याप्रमाणे इम्रान खान यांना वागावे लागते. पाकिस्तानी लष्करावर इम्रान खान सरकारची पकड नाही, तर इम्रान खान सरकारवर पाकिस्तानी लष्कराची पकड आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या मुदतवाढ प्रकरणात याचा अनुभव संपूर्ण जगाने घेतला आहे.
 
 
भारतात ही स्थिती नाही. भारतात मोदी सरकार सांगेल तसे लष्कर वागत असते. सरकारच्या आदेशाचे पालन करत असते. याचा फायदा देशाला होत असतो. पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानात लोकनिर्वाचित सरकारचे कमी आणि लष्कराचे शासन जास्त काळ राहिले आहे. पाकिस्तानच्या सद्य:स्थितीचे हे खरे कारण आहे.
पाकिस्तानला आपले हित कशात आहे, ते समजत नाही. पाकिस्तानला आपले हित समजले असते, तर त्याने भारतासोबत कायम शत्रुत्वाची भावना कायम जोपासली नसती, वाढवली नसती. पाकिस्तानने भारताशी मैत्रिपूर्ण धोरण ठेवले, तर त्याचा भारतापेक्षा पाकिस्तानला जास्त फायदा होऊ शकतो. पण, भारताशी शत्रुत्व ठेवण्यातच आपले भले आहे, हे कुणी पाकिस्तानच्या गळी उतरवले हे समजत नाही.
शेजारी देशांशी तसेही मैत्रिपूर्ण धोरण ठेवण्याची भारताची भूमिका आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनेही जुने सर्व विसरून पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात केला होता. भारत स्वत:हून कुणाच्या वाटी जात नाही, मात्र कुणी भारताच्या वाटी गेला, तर त्याला जन्माची अद्दल घडेल, असा धडा शिकवल्याशिवाय राहात नाही! त्यामुळे मसूद अजहरची तुरुंगातून सुटका करत भारतात उपद्रव घडवून आणण्याचा आपला डाव यशस्वी होईल, या भ्रमात पाकिस्तानने राहू नये. भारताने काही हातात बांगड्या भरल्या नाहीत. यावेळी भारताने फक्त जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द केले, पाकिस्तानने आपल्या वागणुकीत सुधारणा केली नाही, तर पुढच्या वेळी पाकव्याप्त काश्मीर भारताचा हिस्सा झाल्याचे त्याला पाहावे लागेल! कारण, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी काहीही करू शकते, याचे भान पाकिस्तानने ठेवले पाहिजे...
@@AUTHORINFO_V1@@