अटी नको; शेपट्या हलवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2019
Total Views |



आज तर पाकिस्तानची वाटचाल दिवाळखोरीकडे वेगाने होत असून तिथल्या सरकारकडे वीज देयके भरण्याइतकेही पैसे नसल्याचे समोर आले. अशा द्वेषाच्या पायावर आधारलेल्या आणि स्वतःच्या कर्माने उद्ध्वस्त होण्याच्या कडेलोटावर उभ्या ठाकलेल्या देशाने अटी घालायच्या नसतात, तर शेपट्या हलवून समोरचा देश जसे म्हणेल तसे वागायचे असते, हे पाकिस्तानने लक्षात घ्यायला हवे.


गझनवी
, अब्दाली, घोरी आणि बाबर नामक चिरकुटांच्या जोरावर शेपट्या फुलारून युद्धाच्या धमक्या देणार्‍या पाकिस्तानचे अवसान गळाले व नुकताच त्याने भारतासमोर सशर्त चर्चेचा प्रस्ताव ठेवला. तत्पूर्वी भारताने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्दीत फेकून दिल्याने आणि राज्याचे विभाजन केल्याने पाकिस्तान चांगलाच चवताळल्याचे दिसले. त्या देशाच्या पंतप्रधानापासून ते रेल्वेमंत्री आणि इतरही चिल्ले-पिल्ले भारताला युद्धाच्या, अण्वस्त्र हल्ल्याच्या पोकळ धमक्या देऊ लागले. दरम्यानच्या काळात चीनच्या कडेवर बसून पाकिस्तानने हा विषय संयुक्त राष्ट्रांत नेला, तसेच जगातल्या बलाढ्य राष्ट्रांसमोरही उपस्थित केला. इस्लामी देशांच्या परिषदेकडे आणि मानवाधिकार संघटनांपुढेही त्या देशाने जम्मू-काश्मीरच्या नावावर खोट्यानाट्या कथा ऐकवल्या. परंतु, सर्वत्रच तोंडावर आपटल्याने आणि अपयशाचे धनी व्हावे लागल्याने पाकिस्तानला आपली जागतिक पत समजली व तो देश नरम पडला. जम्मू-काश्मीरवरून पाकिस्तान चिरक्या आवाजात आरडाओरडा करत असतानाच भारतातल्या भाडोत्री विचारवंत, बुद्धीमंतांनीही पाकिस्तानशी युद्ध झाल्यास ते आपल्याला परवडणारे नाही, कलम ३७० ला कलम करणे हिताचे नाही, अशी भीती घालून पाहिली. सोबतच काश्मिरींच्या कथित मानवाधिकार उल्लंघनाच्या, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचारांच्या खोट्या कंड्या पिकवण्याचे कामही इथल्या उपद्रवींनी केले. सीमेपलीकडच्यांना आपले इमान विकलेल्या काही लोकांनी तर थेट पाकिस्तानला भारतात पुलवामासारखा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचे जाहीर निमंत्रणही दिले. अर्थात इतके सगळे होऊनही भारत बधला नाही, ना माघार घेतली. उलट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थिती पाहून भारत आपल्या अण्वस्त्र वापर धोरणावर निर्णय घेईल, असे सांगितले. सोबतच “काश्मीर तुमचा होताच कधी म्हणून इतके गळे काढता?,” असा सवालही विचारला. भारताच्या या पवित्र्याने धडकी भरलेल्या पाकिस्तानला अखेर चर्चेचा विषय काढावा लागला.



शाह मेहमूद कुरेशी यांनी चर्चेची गोष्ट केली
, ती पंतप्रधान इमरान खान यांच्याकडून सातत्याने केल्या जाणार्‍या दर्पोक्तीच्या पार्श्वभूमीवर. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे, पाकिस्तानला खरेच चर्चेची बुद्धी झाली की, असे बोलून पुन्हा काहीतरी घातपात करण्याची त्याची योजना आहे? कारण विश्वासघाताचा, खंजीर खुपसण्याचाच त्या देशाचा इतिहास आणि वर्तमानही आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या चर्चेच्या बडबडीवर पुरता विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. दुसरीकडे इमरान खान यांनी भारताने उचललेल्या पावलानंतर देशात दर शुक्रवारी ‘काश्मीर अवर’ पाळण्याचा आदेश दिला. भारताकडून काश्मिरींवर होत असलेल्या कथित दडपशाहीच्या विरोधासाठी हे गरजेचे असल्याचे त्यांनी ठरवले. परंतु, इमरान खान यांनी पुकारलेल्या पहिल्याच ‘काश्मीर अवर’चा पाकिस्तान्यांनीच फज्जा उडवला. विविध शहरांत जिथे जिथे चक्का जाम वा धरणे धरण्याचा उद्योग चालू होता, तिथे खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या निवडक टाळक्यांव्यतिरिक्त कोणीही फिरकले नाही. उलट महागाईने बेजार झालेल्या पाकिस्तान्यांनी ‘काश्मीर अवरच्या उठाठेवीमुळे होणार्‍या त्रासावरून इमरान खाननाच सुनावले व त्यांची खिल्लीही उडवली. म्हणजेच तिथले लोक आपल्या पंतप्रधानाच्या आवाहनाकडेही गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरही ‘काश्मीर अवर’चा जोश दिसला नाही पण, इमरान खानवर ‘काश्मीर अवर’ जाहीर करण्याची वेळ का यावी? तर म्हणतात ना, घाबरलेला माणूस नेहमीच सैरभैर, बेभान होतो-काय करू आणि काय नको, हेही त्याला समजत नाही. इमरान खान यांची अवस्था सध्या अशीच झाली आहे. अमित शाह यांच्या “आम्ही पाकव्याप्त काश्मीरसाठी प्रसंगी बलिदानही देऊ,” या वक्तव्याचा धसका घेतलेल्या इमरानसमोर आता पाकव्याप्त काश्मीर कसा वाचवायचा, हा प्रश्न आहे. तिथल्या बिलावल भुत्तो या विरोधकानेही श्रीनगर तर सोडाच पण पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबादही हातचे जाईल, असे भाकीत केले. जनतेला भुलवण्यासाठी, तिला भारताविरोधात चिथावण्यासाठी व स्वतःची खुर्ची शाबूत राखण्यासाठीचे इमरान खान यांचे ‘काश्मीर अवर’ चे सोंग यातूनच उद्भवले. अर्थातच कोणतेही तात्त्विक व तार्किक अधिष्ठान नसलेला इमरान खान यांचा हा ‘काश्मीर अवर’चा प्रयोग निष्फळच ठरला. त्यातून ना पाकिस्तान्यांची राष्ट्रवादाची ठिणगी पेटली ना कोणी त्याकडे ढुंकून पाहिले. हो, बलुची, पख्तुनी, सिंधी मुहाजिरांनी मात्र पाकिस्तानपासून आझादीची मागणी केलीच!



हे एका बाजूला होत असतानाच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आपण काही अटींसह भारताशी चर्चेला तयार असल्याचे म्हटले
. कुरेशी यांच्या मते भारत, पाकिस्तान व काश्मिरी नेतृत्व अशा तीन पक्षांत चर्चा झाली पाहिजे आणि हीच त्यांची अटही आहे. इतकेच नव्हे तर तिसर्‍या देशाने या प्रश्नात हस्तक्षेप केला तर ते आम्हाला हवेच असल्याचेही त्यांनी सांगितले तर भारताची भूमिका प्रथमपासूनच हा दोन्ही देशांतील मुद्दा असून तो द्विपक्षीय पातळीवरच सोडवला जाईल, अशी आहे. मुळात पाकिस्तान आपल्या पैदाशीपासून केवळ भारताचा द्वेष आणि द्वेषच करत आला. तिथल्या जनतेला लष्करासह राज्यकर्त्यांकडून पाजल्या जाणार्‍या भारतद्वेषाच्या बाळकडूवरच त्या देशाचे अस्तित्व टिकून राहिले. परंतु, भारतद्वेषाव्यतिरिक्त अन्य कोणताही विधायक कार्यक्रम हाती नसलेल्या पाकिस्तानची अवस्था अधिकाधिक विदारक होत गेली. आज तर त्या देशाची वाटचाल दिवाळखोरीकडे वेगाने होत असून तिथल्या सरकारकडे वीज देयके भरण्याइतकेही पैसे नसल्याचे नुकतेच समोर आले. म्हणूनच अशा द्वेषाच्या पायावर आधारलेल्या आणि स्वतःच्या कर्माने उद्ध्वस्त होण्याच्या कडेलोटावर उभ्या ठाकलेल्या देशाने अटी घालायच्या नसतात, तर शेपट्या हलवून समोरचा देश जसे म्हणेल तसे वागायचे असते, हे पाकिस्तानने लक्षात घ्यायला हवे. इतकी वर्षे काही ना काही कारणांमुळे भारतातल्या सरकारांनी पाकिस्तानच्या संभावित हल्ल्यांमुळे म्हणा किंवा त्या देशाच्या इथल्या हस्तकांच्या सल्ल्यांसमोर माना डोलावून म्हणा, कधी कणखर भूमिका घेतली नाही. म्हणून त्याकाळी पाकिस्तानला अशा अटी-शर्ती घालणे व त्यानंतर भारताने चर्चेसाठी तयार होणे, सहज सोपे होते. आता मात्र परिस्थिती पुरती बदलली असून इथे ठोशाला ठोसा लगावणारे नव्हे तर ठोसा देणार्‍यालाच धुळीस मिळवणारे नेतृत्व सत्तेवर आहे. भारताने आपल्या म्हणण्यानुसार वागावे, ही पाकिस्तानी अपेक्षा त्यामुळेच पूर्ण होणारी नाही. उलट भारताच्या इच्छेनुसार पाकिस्तान चर्चेसाठी बर्‍या बोलाने तयार झाला तर ठीक; अन्यथा कोणाला कसे सरळ करायचे, हे देशाला चांगलेच कळते.

@@AUTHORINFO_V1@@