भारतीय टेनिसचा नवा ‘बाजीगर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2019   
Total Views |


आज जाणून घेऊया टेनिसचा देव मानल्या जाणार्‍या रॉजर फेडररला ‘टफ फाईट’ देऊनजागतिक पातळीवर आपली वेगळी छाप पाडणार्‍या भारतीय टेनिसपटू सुमित नागलबद्दल...


'हार कर जितनेवाले को बाजीगर कहते है’ हा ‘बाजीगर’ चित्रपटातील संवाद खर्‍या आयुष्यात ऐकण्याची संधी फार कमी मिळते. परंतु, याची प्रचिती पूर्ण जगाला मंगळवारी आली. जेव्हा भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यामध्ये ‘टेनिसचा देव’ मानल्या जाणार्‍या रॉजर फेडररला ‘टफ फाईट’ देत टेनिस रसिकांची मने जिंकली. त्याने तो सामना जरी गमावला असला तरी त्याने भारतीयांसह जगभरातील टेनिसच्या चाहत्यांची कौतुकाची थाप मिळवली. २२ वर्षीय सुमितचा ‘अमेरिकन ओपन टेनिस’ स्पर्धेपर्यंचा पल्ला गाठण्याचा प्रवास तसा खडतर होता. परंतु, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर त्याने हा पल्ला गाठला. भारतीय टेनिस विश्वात सुमितच्या नावाने एक नवा तारा भारतीय टेनिसला गवसला आहे. यापूर्वी महेश भूपती, लिअ‍ॅण्डर पेस आणि रोहन बोपण्णासारख्या यशस्वी टेनिसपटूंनंतर आता सुमितचेदेखील नाव या यादीमध्ये आले आहे. जाणून घेऊया फेडररसारख्या टेनिसपटूला आंतरराष्ट्रीय पातळीवर तुल्यबळ लढत देणार्‍या सुमित नागलविषयी...



सुमित नागल याचा जन्म १६ ऑगस्ट, १९९७ रोजी हरियाणामधील झज्जरमधील एका सामान्य कुटुंबामध्ये झाला. त्याचे वडील दिल्लीतील नांगलोईमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर आई घर काम सांभाळत होती. सुमितने शालेय शिक्षण पश्चिम विहार, दिल्लीमधील राजकीय प्रतिभा विकास विद्यालयामध्ये पूर्ण केले. सुमितच्या टेनिसच्या प्रवासामध्ये त्याच्या वडिलांचा खारीचा वाटा होता. सुमितचे वडील टेनिसचे उत्तम चाहते आहेत.जेव्हा ते टीव्हीवर टेनिसचा सामना पाहायचे तेव्हा आपल्या मुलानेही टेनिस खेळावे,अशी इच्छा त्यांना होई. त्यामुळे शाळेत असताना त्याच्या वडिलांनी त्याला टेनिस अकादमीमध्ये दाखल केले. सुमितने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षांपासून टेनिसचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने भारताचा माजी टेनिसपटू महेश भूपतीने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या चाचणी शिबिरामध्ये भाग घेतला. येथून खर्‍या अर्थाने त्याचा टेनिसचा प्रवास सुरू झाला. भूपतीच्या शिबिरामध्ये भाग घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, शिबिरात उपस्थित असलेल्या प्रत्येक मुलाकडे भूपतीचे लक्ष जाणे शक्य नव्हते. सुमित भूपतीच्या जवळ गेला आणि त्याला स्वत:चा खेळ पाहण्याची विनंती केली. त्याचा खेळ पाहून भूपतीने स्वतः त्याच्या मार्गदर्शनाची जबाबदारी उचलली. गेली सुमारे १० वर्षे भूपती हा सुमितला मार्गदर्शन आणि आवश्यक ती सर्व मदत करतो आहे. भूपतीच्या सहकार्याने सुमितने बंगळुरू, कॅनडा, अमेरिका, जर्मनी, स्पेन आणि पुन्हा जर्मनी अशा विविध ठिकाणी उच्च दर्जाच्या टेनिसचे धडे गिरवले आहेत. सध्या महेश भूपतीच्या ’ग्लोबोस्पोर्ट’तर्फे सुमितचे व्यवस्थापन पाहिले जाते.



२०१५ साली विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील मुलांच्या गटातील दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने व्हिएतनामच्या ली होंग नाम याच्या साथीने अमेरिकेच्या रेली ओपल्का आणि जपानच्या अकिरा संतिलन या जोडीला हरवूनज्युनियर ग्रॅण्ड स्लॅम’वर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय टेनिसपटू ठरला. २०१६ मध्ये त्याने भारताकडून ‘डेव्हिस कप’मध्ये पदार्पण केले. याचदरम्यान त्याने स्पेन विरुद्ध वर्ल्ड ग्रुपतर्फे प्लेऑफमध्ये खेळाला. २०१५ या वर्षात ‘जुनिअर एकेरी’मध्ये खेळताना त्याने ‘युएस ओपन,’ ‘विम्बल्डन चॅम्पियनशिप,’ ‘फ्रेंच ओपन’ आणि ‘ऑस्ट्रेलिया ओपन’मध्ये प्रथम तीन क्रमांकामध्ये त्याचा समावेश होता. सुमितच्या या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परंतु, त्यानंतरचे वर्ष त्याच्यासाठी काहीसे चांगले ठरले नाही. २०१६ या वर्षात मिळालेल्या बर्‍याच अपयशानंतरही तो डगमगला नाही. २०१७ साली त्याला ‘डेव्हिस कप’ संघातून बाहेर ठेवण्यात आले होते. परंतु, निराश न होता सुमितने खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर २०१९ च्या सुरुवातीपासून त्याने चांगल्या कामगिरीच्या बळावर ‘अमेरिकन ओपन टेनिस’ स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला. सुमितने ‘अमेरिकन ओपन’च्या पात्रता फेरीमध्ये आत्मविश्वासाने खेळ करत नवी उमेद मिळवली. ‘चॅलेंजर्स सर्किट’मध्ये चांगली कामगिरी करत कारकिर्दीत पहिल्यांदा ‘टॉप २००’ मध्ये प्रवेश मिळवला. २०१९ ची सुरुवात केली तेव्हा त्याचा क्रमांक ३५०च्यादेखील बाहेर होता. परंतु, वर्षभराच्या चांगल्या कामगिरीने त्याने १९५ व्या क्रमांकावर झेप घेतली.



‘अमेरिकन ओपन टेनिस’ स्पर्धेच्या सिनियर श्रेणीमध्ये त्याचा पदार्पणाचा सामना आणि पहिलाच सामना तोही टेनिसचा देव रॉजर फेडररसमोर. यामुळे सार्‍यांचे लक्ष सुमितकडे लागले होते. फेडररच्या समोर यापूर्वी सोमदेव देववर्मन आणि रोहन बोपन्ना हे दोन भारतीय टेनिसपटू खेळले होते. परंतु, फेडररविरुद्ध एकही सेट जिंकण्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र, सुमितने पहिल्या सेटमध्ये धमाकेदार खेळी करत फेडररला ६-४ असे पराभूत केले. त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने जरी सामना जिंकला असला तरीही या सामन्यात सुमितने त्याला चारही सेटमध्ये चांगलीच टक्कर दिली. यामुळे जगभरामध्ये त्याच्या लढाऊवृत्तीचे कौतुक करण्यात आले आणि सामना गमावूनही त्याने सर्वांची मने जिंकली. विशेष म्हणजे ‘सुमितचे भविष्य उज्ज्वल आहे,’ अशी शाबासकी खुद्द फेडररने दिली. त्यामुळे येत्या काळामध्ये सुमित नागल हे नाव अशी अनेक शिखरे सर करताना दिसेल यात शंका नाही. त्याच्या या पुढच्या लढाऊ कारकिर्दीला हार्दिक शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@