कठीण समय येतां, संघ कामास येतो...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |


 


सांगली/कोल्हापूर : देशभरात कुठेही, कोणतीही आपत्ती ओढवताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एकजूट होवून तातडीने मदतकार्यासाठी धाव घेतात व मदत-पुनर्वसनात स्वतःला झोकून घेताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत सध्या महापुराने हाहाःकार माजवला आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अर्थातच, मदतकार्य व पुनर्वसनात गेले अनेक दिवसांपासून अथक परिश्रम घेतले असून या भागात शेकडो स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांची सुटका, आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण आदी कार्यात सक्रीय सहभाग घेतला आहे.

 

 
 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या दोन आठवड्यांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. विशेषतः, या जिल्ह्यांतील नद्यांच्या उगम क्षेत्रांत व त्यांवर बांधलेल्या धरणांच्या क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. यातून कोल्हापूर, सांगली-मिरज आदी शहरांसह कित्येक तालुक्याची ठिकाणे, गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. गेले चार-पाच दिवस ही पूरस्थिती कायम असल्याने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. रस्ते, रेल्वे आदी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून परिणामी पेट्रोल-डीझेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच, लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

 

 
 

अशा सर्व स्थितीत प्रशासकीय यंत्रणांच्या जोडीने रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी बचाव, मदत व पुनर्वसन कार्यात पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रा. स्व. संघ व संघाच्या जनकल्याण समिती, सेवा भारतीतर्फे विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची पाकीटं, कपडे, नाश्ता-जेवण, पिण्याचे पाणी आदींचे वितरण करण्यात आले. तसेच, साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता विविध ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली व औषधांचे वाटपही करण्यात आले.

 

कोल्हापुरातील मदतकार्य

 

कोल्हापूर शहर व इचलकरंजी, वारणा, कोडोली येथे पुरात अडकलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढून झाल्यावर पूरग्रस्तांच्या सर्व केंद्रांचे रा. स्व. संघातर्फे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. कोल्हापुरातील ६ तर इचलकरंजीमधील ४ केंद्रांचे संपूर्ण पालकत्व रा. स्व. संघ, जनकल्याण समिती, राष्ट्र सेविका समिती यांच्यावतीने घेण्यात आले आहे. या केंद्रांवर नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी, औषधे आदींचे वितरण व मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच, शहरातील एकूण २३ केंद्रांवर ३२ डॉक्टर्स व त्यांच्या सहाय्यकांचे पथकही अविरतपणे कार्यरत आहे. रा. स्व. संघाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तसेच, संघाच्या प्रचार विभागाने कोल्हापुरातील प्रमुख सामाजिक संस्था व प्रशासन यांच्यासोबत समन्वय साधून मदतकार्यात एकसूत्रता आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

 
 

इचलकरंजी येथेही पूरग्रस्तांच्या केंद्रांवर संघ व सेवा भारतीच्या वतीने फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. या सेवाकार्यात संघाच्या पुढाकारातून शहरातील विविध लहानमोठ्या सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, युवक संस्था-संघटना हिरीरीने उतरल्या आहेत. संघ व अन्य संस्था-संघटनांचे सुमारे २०० हून अधिक कार्यकर्ते या भागात अविरतपणे कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर काही केंद्रांवर विस्थापितांच्या लहान मुलांमध्ये शाखा भारावून खेळ व बौद्धिक असेही कार्यक्रम सुरू करण्यात आले असून यालाही नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

 

सांगलीतही अविरत..

 
सांगली जिल्ह्यातही सांगली-मिरज शहर व लगतच्या पूरग्रस्त क्षेत्रात सुमारे ५०० हून अधिक स्वयंसेवक व कार्यकर्ते मदतकार्यात अविरतपणे सक्रीय आहेत. विश्रामबाग, सांगली येथे एक मध्यवर्ती भोजनव्यवस्था केंद्र उभारण्यात आले आहे. येथून अन्नपदार्थ बनवून ते पूरग्रस्तांच्या केंद्रांवर वितरीत करण्यात येत आहेत. या व्यवस्थेत सुमारे ३०० कार्यकर्ते काम करत आहेत. संघाकडून गेल्या तीन दिवसांपासून शहर-जिल्ह्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटना-संस्थांकडून अन्न-धान्य, जीवनावश्यक वस्तू आदींचे संकलन करण्यात येत असून ते पूरग्रस्तांना वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये औषधे, डाळ, तांदूळ, टूथपेस्ट-ब्रश, साबण, टॉवेल, अंथरूण-पांघरूण, कपडे इ. सह अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या चार केंद्रांवर सुमारे तीन हजारांहून अधिक नागरिकांना रोज जेवण, नाश्ता तसेच लहान मुलांना दुध इ. देण्यात येत आहे. तसेच, त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून त्यांना उपचार व औषधेही वितरीत करण्यात येत आहेत. रा. स्व. संघ जनकल्याण समिती, सेवा भारती, आरोग्य भारती, राष्ट्र सेविका समिती आदी संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@