चिपळूण शहराला मगरींचा वेढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019   
Total Views |


 


 वनविभागाकडून महिन्याभरात नऊ अजस्त्र मगरींचा बचाव


मुंबई ( अक्षय मांडवकर ) : मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शीव नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शहरात अजस्त्र मगरींनी शिरकाव केला आहे. चिपळूण रेल्वेस्थानकापासून व्यापारी संकुले आणि मानवी वस्त्यांमध्ये मगरींचा वावर आढळून येत आहे. या मगरींची सुखरूप सुटका करण्यासाठी वनविभाग तत्परतेने काम करत असून गेल्या महिन्याभरात शहरातील विविध भागांमधून नऊ मगरींचा बचाव करण्यात आला आहे.

 

कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण शहरातून वाहत जाणाऱ्या वाशिष्ठी व शीव नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र, यामुळे चिपळूण शहरात राहणाऱ्या नागरिकांना एका निराळ्या समस्येला समोरे जावे लागत आहे. चिपळूण शहरातील विविध भागांत सध्या मगरींचा वावर सुरू आहे. खासकरून वाशिष्ठी आणि शीव नदीलगत वसलेल्या मनुष्य वस्त्यांमध्ये मगरी शिरकाव करत आहेत. दोन्हीं नद्यांमध्ये मगरींचा अधिवास फार पूर्वीपासून आहे. या मगरी 'मार्श' या प्रजातीच्या असून त्यांचे मुख्य अन्न मासे व इतर छोटे जलचर प्राणी आहेत. साधारणपणे नदीच्या मुख्य प्रवाहात आढळणाऱ्या मगरी पावसाळी हंगामात विशेषत: पूरसदृश परिस्थितीत उपनद्या किंवा छोट्या ओहोळांमध्ये स्थलांतर करत असल्याची माहिती 'सिस्केप' या संस्थेचे सदस्य गणेश मेहेंदळे यांनी दिली. हे स्थलांतर नैसर्गिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सावित्री नदीत आढळणाऱ्या मगरींवर मेहेंदळे संशोधनाचे काम करत आहेत. मगरींनी स्थलांतर केलेल्या भागांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास त्या स्वरक्षणाकरिता मानवी वसाहतीत शिरकाव करत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, पावसाळ्यानंतर मगरी पु्न्हा प्रवाहात परतत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 
 
 

 

चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मगरींनी शीव नदीत स्थलांतर केल्याची शक्यता आहे. त्यामुळे शीव नदीलगत वसलेल्या वस्त्यांमध्ये मगरींचा वावर आढळून येत आहे. या मगरी सात ते आठ फुटांच्या आहेत. सुदैवाने आजवर मगरीने कोणत्याही व्यक्तींवर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही.  काही दिवसांपूर्वी शहरातील दादर मोहल्ल्यामधील नाल्यामध्ये मगर आढळून आली होती. तर मंगळवारी चिपळूण रेल्वेस्थानकामध्ये सात फुटाच्या मगरीने शिरकाव केला होता. वाशिष्ठीचे पाणी वाढल्याने मगर रेल्वे रुळावर येऊन बसली होती. वनविभागाला यासंबंधीची माहिती मिळताच तातडीने वनरक्षक आर. आर. शिंदे , डी. आर. सुर्वे व रामदास खोत यांनी मगरी पकडून तिची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. विशेष म्हणजे ज्या रुळावर मगर बसली होती. त्या रुळावरून मगरीच्या बचावानंतर अवघ्या पाच मिनिटांत रेल्वे गेल्याची घटना घडली. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मगरीचे प्राण वाचले. शिवाय, बुधवारी चिपळूण बाजारपेठेतील धवल व्यापारी संकुलातही आठ फुटांची मगर आढळून आली होती. तिलाही पकडून सोडण्यात आले. गेल्या महिन्याभरात शहरातील विविध भागांमधून नऊ मगरींचा सुखरूप बचाव केल्याची माहिती चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन निलख यांनी दिली. मगरींना बचावाकरिता 'प्रमाणभूत कार्यपद्धती' (एसओपी) तयार केली असून मगरींना पकडण्यासाठी खास लोखंडी पिंजरा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@