'नागला' वनपरिक्षेत्रातील अवैध दारुभट्टीवर वनविभागाचा छापा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |


 

आरोपीकडून २० लीटर गावठी दारू जप्त

 

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) : 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या 'नागला' वनपरिक्षेत्रामध्ये अवैध्यरित्या दारुभट्टी लावणाऱ्या इसमास वनविभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. ही कारवाई येऊर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. राष्ट्रीय उद्यानामध्ये विनापरवानगी प्रवेश करुन कोणत्याही प्रकारचे अवैध काम करणे गुन्ह्यास पात्र आहे.
 
 

बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या अखत्यारीत वसईतील 'नागला' वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. या परिक्षेत्रातील ईंदाळीचा नाला परिसरात एक वनवासी इसमाने अवैध्यरित्या प्रवेश करुन दारुभट्टी लावल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. जंगलांमध्ये अशा पद्धतीने दारुभट्टी लावून गावठी दारू तयार करण्याचे काम केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार वनाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता ईंदळीचा नाला परिसरात धाड मारली. या ठिकाणी आरोपी गावठी दारू एका पिशवीत भरुन त्याची वाहतूक करत असल्याचे दिसून आले. वनाधिकाऱ्यांनी चपळाईने त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे २० लीटर गावठी दारू हस्तगत करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव कमलाकर अनंत माळी (४१) असून तो वसईतील खोलांडे परिसरातील वनवासी आहे.

 
 

 

राष्ट्रीय उद्यानात विनापरवाना प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असताना आरोपीने संरक्षित वनक्षेत्रामध्ये आग पेटवत रासायनिक पदार्थाचा वापर करुन दारू तयार केली. त्यामुळे त्याच्या विरोधात 'वन्यजीव संरक्षण कायदा' आणि 'मुंबई दारुबंदी अधिनियमा'अंतर्गत वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यासंबंधीचा तपास येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार 'नागला'चे वनपरिमंडळ अधिकारी रमाकांत मोरे करत आहेत. या तपासात वनरक्षक मदन गाडेकर, मेघराज जागले, चंद्रकांत बोर्डे, कुमार पवार, मनमुर हेमंत ठाकूर, नंदकुमार वैती, अनंता सरावणे, हितेश भोईर यांचा समावेश आहे.
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@