कंपन्यांच्या कर्जरोख्यांत गुंतवणूक करणे कितपत फायदेशीर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019   
Total Views |




गुंतवणुकीच्या बर्‍याचशा उपलब्ध पर्यायांपैकी फार मर्यादित पर्यायांची आपल्याला माहिती असते. त्यातही आपण गुंतवणूक सल्लागारांवर अवलंबून असतोच. अशावेळी पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायांबरोबरच कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही, याबाबत अर्थवर्तुळातही मतमतांतरे दिसतात. तेव्हा, नेमके कंपनीचे कर्जरोखे म्हणजे काय? त्यामध्ये कशी आणि किती गुंतवणूक करावी? यांसारख्या विविध प्रश्नांची उकल करणारा हा लेख...

 

उद्योगांना जो निधी लागतो, तो प्रामुख्याने तीन प्रकारांनी उभारला जातो. कंपन्यांना खेळते भांडवल म्हणून, नवीन प्रकल्पांसाठी, विस्तारीकरणासाठी व अशा अन्य काही कारणांसाठी निधी लागतो. हा निधी एकतर बँकांकडून कर्जे घेऊन उभारता येतो, पण बँकांच्या नियमांत बसत असेल तरच कर्ज मिळते. पण, कर्जाचे हप्ते, व्याज हे नियमित भरावे लागते. जर सतत तीन तिमाहीअखेरीस व्याज भरले नाही तर खाते एनपीए (बुडित कर्जाचे खाते) होऊ शकते. सध्या तरी व्याजाचे दर कमी आहेत. पूर्वी ते इतके अधिक होते की, बँकांचे व्याज भरण्यामुळे कित्येक लघु उद्योग बंद पडले होते. निधी उभारायचा दुसरा मार्ग म्हणजे कंपनीचे भागभांडवल विक्रीस काढणे. यासाठी कंपनी 'पब्लिक लिमिटेड' असावी लागते.

 

खाजगी कंपन्या भागभांडवल विक्रीस काढू शकत नाही. कंपनीला फायदा झाल्यास कंपनीच्या भागभांडवलात गुंतवणूक केलेल्या भागधारकांना लाभांश द्यावा लागतो. लाभांश दिला नाही म्हणून कंपनीवर काही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. निधी उभारण्याचा तिसरा मार्ग म्हणजे कर्जरोखे विक्रीस काढण्याचा. कर्जरोखे दोन प्रकारे विक्रीस काढले जातात. एक परिवर्तनीय व दुसरे अपरिवर्तनीय. परिवर्तनीय कर्जरोख्यांचे मुदतीअंती भागभांडवलात रूपांतर होते, तर अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची मुदतीअंती गुंतविलेली रक्कम परत मिळते. सध्या अपरिवर्तनीय कर्जरोेखे कोणीही विक्रीस काढत नाही.

 

सध्या बाजारात इंडिया इन्फोलाईन फायनान्स लिमिटेड (आय आय एफ एल), या नॉनबँकिंग वित्तीय कंपनीने अपरिवर्तनीय कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. यात ३० ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. जे. एम. फायनान्शियल समूहाच्या 'जे. एम. फायनान्शियल प्रॉडक्ट्स' या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीने कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. यात गुंतवणूक करण्याची मुभा ४ सप्टेंबरपर्यंत आहे आयआयएफएल गुंतवणूकदारांना १०.५० टक्के दरांनी परतावा देणार आहे, तर जे. एम. फायनान्शियल १०.४० टक्के दराने परतावा देणार आहे. इतर गुंतवणुकींवर मिळणार्‍या परताव्यापेक्षा या गुंतवणुकीत जास्त परतावा मिळणार आहे. टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडनेही कर्जरोखे विक्रीस काढले आहेत.

 

सध्या 'डेट मार्केट' अडचणीत असताना यात गुंतवणूक करणे थोडेसे धोक्याचे वाटते. ज्यांना फार मोठी जोखीम घ्यायला आवडते, अशा व्यक्ती यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. ज्या कंपन्यांचे कर्जरोखे विक्रीचे रेटिंग 'एएए' पेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांच्या कर्जरोख्यांत गुंतवणूक टाळावी. जे कर्जरोखे पूर्वी विक्रीस काढले होते व ज्यांचे ट्रेडिंग सध्या शेअरबाजारात होत आहे, अशा कर्जरोख्यांत गुंतवणूक करणे हे नवीन कर्जरोख्यांत गुंतवणूक करण्यापेक्षा कधीही चांगले. जरी कर्जरोखे शेअर बाजारात 'लिस्ट' करण्यात येत असले तरी या गुंतवणुकीतून मुदतीपूर्वी बाहेर पडणे तितकेसे सोपे नसते.

 

गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे उभारणार्‍यांसाठी बँकांच्या ठेवी हा चांगला पर्याय ठरू शकतो. पण, आयकरात सवलत मिळण्यासाठी बँक ठेवींत जर गुंतवणूक केली असेल, तर याचा 'लॉक-इन-पिरियड' पाच वर्षे आहे. यातून मध्ये बाहेर पडता येत नाही. म्युच्युअल फंड सध्या नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांत गुंतवणूक करीत नसल्यामुळे, या कंपन्या सध्या अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीने कर्जरोखे विक्रीस काढले होते. त्यांना गुंतवणूकदारांचा हवा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता. यात मिळणारे व्याज करपात्र आहे. त्यामुळे गुंतवणूकदार जर ३० टक्के आयकर भरण्याच्या 'स्लॅब'मध्ये असेल तर, त्याच्या हातात सुमारे ७ टक्के दरानेच व्याज मिळणार. या गुंतवणुकीवर मिळणार्‍या व्याजावर आयकर मूलस्त्रोत कापला जात नाही.

 

'आयआयएफएल'ने विक्रीस काढलेल्या कर्जरोख्यांत किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १० हजार रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. कंपनीला यातून १०० कोटी रुपयांचा निधी उभारायचा आहे. जर, तडाखेबाज गुंतवणूक झाली, तर कंपनीला एक हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याची परवानगी आहे. यांची सहा 'सिरीज' मध्ये विक्री होत आहे. सिरीज १, ३ व ५ मध्ये गुंतवणूक करणार्‍यांना मध्ये मध्ये व्याज न मिळता मुदतपूर्तीनंतर मूळ रकमेत समाविष्ट करून व्याज देण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांसाठी १५ महिने, ३९ महिने व ६९ महिने असा गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे.

 

सिरीज-२ ची गुंतवणूक मुदत ३९ महिन्यांची असून गुंतवणूकदारांना दर तीन महिन्यांनी ९.५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. सिरीज-५चा कालावधीही ३९ महिने असून वार्षिक ९.८५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. सिरीज-४ ६९ महिन्यांची असून, मासिक व्याज १० टक्के दराने देण्यात येणार आहे. सिरीज-१ व ५ यांचे स्वरूप सुरक्षित असून ४ व ६ यांचे स्वरूप असुरक्षित आहे. यांना 'क्रिसिल' व 'इक्रा' यांनी 'एए' तर ब्रिकवर्क रेटिंग्जने 'एए+' रेटिंग दिले आहे. यांना 'ट्रिपल ए' हे रेटिंग नाही, ही बाब गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयास हवी.

 

जे. एम. फायनान्शियललाही या कर्जरोखे विक्रीतून १०० कोटी रुपये उभारायचे आहेत. या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाला, फार मोठ्या प्रमाणावर भरणा झाला तर कंपनीला एकूण ५०० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारण्याची परवानगी आहे. ३८ महिने, ६० महिने व ८४ महिने या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी किमान १० हजार रुपये गुंतवावे लागतील. याच्या ५ सिरीज आहेत. १ व २ सिरीजची मुदत ३८ महिन्यांची आहे. सिरीजमध्ये वार्षिक व्याज दिले जाणार आहे, तर सिरीज-२ मध्ये मुदतीअंती, मूळ रकमेबरोबर गुंतवणूक परत मिळणार.

 

सिरीज-३ मध्ये गुंतवणुकीचा कालावधी ६० वर्षे असून वार्षिक व्याज १०.३० टक्के दराने मिळणार. सिरीज-४चा कालावधी ६० महिन्यांचा असून गुंतवणूकदारांना मासिक ९.८५ टक्के दराने व्याज मिळणार. सिरीज- ३ व ५ मध्ये गुंतवणूक करणार्‍यांना ३६ महिन्यांनंतर गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. सिरीज-५ ८४ महिन्यांची असून यात सर्वाधिक म्हणजे १०.४० टक्के दराने परतावा दिला जाणार आहे. या कर्जरोखे विक्रीस 'क्रिसिल' व 'इक्रा' यांनी 'एए' रेटिंग दिले आहे. 'ट्रिपल ए' रेटिंग नाही, हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी. दोन्ही 'डिमॅट'नेच गुंतवणूक करता येणार.

@@AUTHORINFO_V1@@