ओझ्याची फुकट गाढवं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



देशभक्तीचं आवाहन आणि दिवसाला नक्की मिळणारा ५० सेंट्सचा पगार यामुळे अनेक तरुण भरती झाले. अशा प्रकारे एकंदरीत सुमारे ५५ हजार लोक रबर सैनिक बनले.


१९४२ मधील एक दिवस. ब्राझीलच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारा आन्सिडिनो डोस सान्तोस हा जेमतेम विशीत पदार्पण केलेला तरुण सकाळी बाजारात चालला होता. सान्तोस हा एका गवंड्याच्या हाताखाली मदतनीस होता. घरात तो आणि त्याची आई दोघंच असत. त्यामुळे बाजारहाट करण्याचं काम सान्तोसच करायचा. बाजारात भाजी घेत असताना सान्तोसला एक लष्करी अधिकारी भेटला. तो सान्तोसला म्हणाला की, "आजपासून तू रबर सैनिक. ताबडतोब घरी जा. तुझा काय बोऱ्याबिस्तरा असेल तो बांध आणि अ‍ॅमेझॉनकडे जाण्यास तयार राहा." यावर सान्तोस कुरकुरला, "अ‍ॅमेझॉनकडे? म्हणजे तीन हजार मैल दूर? अहो, पण घरी माझी आई एकटीच आहे. तिच्याकडे कोण बघणार?" त्यावर तो अधिकारी उत्तरला, "हे बघ पोरा, हे तुझ्या मातृभूमीचं तुला आवाहन आहे. अर्थात, तुला पगार मिळेलच. दिवसाला ५० सेंट्स. ते तू घरी पाठवू शकशील आणि एकदा लढाई संपली की, घरी येण्याचा प्रवासखर्चही मिळेल. पण निघायला हवं आजच." झालं होतं असं की, जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केल्यामुळे अमेरिकेला होणारा रबर पुरवठा, जो पूर्णपणे आशियातल्या मलायामधून होत होता, तो साफच बंद पडला. युद्धसामग्रीच्या उत्पादनासाठी रबर तर हवाच होता. यावेळी ब्राझीलवर गेट्युलिओ वरगास या हुकूमशहाची सत्ता होती. अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन रुझवेल्ट यांनी वरगासबरोबर सौदा केला की, ब्राझीलने अमेरिकेला अखंडपणे रबर पुरवावा. त्या बदली अमेरिका पैसा, विविध साधनसामग्री आणि तंत्रज्ञान देईल.

 

पूर्वी संपूर्ण अमेरिका हे एकच खंड मानलं जात असे. आता उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे दोन वेगळे खंड मानले जातात. ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतला सगळ्यात मोठा देश आहे. या देशाच्या पश्चिमेला असलेल्या अ‍ॅण्डिज पर्वतातून 'अ‍ॅमेझॉन' ही जगातील सगळ्यात मोठी नदी उगम पावते आणि ब्राझीलचा उत्तर भाग सुजलाम् सुफलाम् करीत पूर्वेकडे थेट अटलांटिक महासागरापर्यंत धावते. जगातील सगळ्यात लांब नदी नाईल, पण सगळ्यात विस्तीर्ण नदी अ‍ॅमेझॉन. 'नदी' कसली 'नद'च तो! अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यात दाट जंगलं आहेत, तसाच अत्यंत सुपीक प्रदेश आहे. शेती उत्पादनातील अव्वल क्रमांकवाल्या जगभरातल्या आठ प्रमुख देशांपैकी ब्राझील हा एक आहे. कॉफी, सोयाबीन, ऊस यांची अफाट लागवड तिथे होते. अशा ब्राझीलकडून अमेरिकेला त्या कठीण काळात रबराचा अखंड पुरवठा हवा होता. रबराची लागवड करण्यास वेळ नव्हता आणि त्याची गरजही नव्हती. कारण, अ‍ॅण्डिज पर्वताच्या उतारावरच्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलांमध्ये वाटेल तितकी जंगली रबराची झाडं होती. आवश्यकता होती ती त्या झाडांपासून रबर गोळा करणाऱ्या मजुरांची. ब्राझीलने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेण्यासाठी सैन्यभरती सुरू केलेलीच होती. 'आता, रबर सैन्यात भरती व्हा आणि देशाला आर्थिक समृद्धी द्या,' अशा आशयाच्या सरकारी जाहिराती झळकू लागल्या. भरपूर पैसा मिळेल आणि लढाईत मरण्याचा धोका नाही, या आशेने अनेक जण खुषीने रबर सैनिक बनले. पण तरी संख्या कमीच भरली. मग सुरुवातीला दिलेल्या प्रसंगातल्या सान्तोसप्रमाणे अनेक तरुणांना भरती करण्यात आले. ही एक प्रकारची जबरदस्तीच होती. पण, देशभक्तीचं आवाहन आणि दिवसाला नक्की मिळणारा ५० सेंट्सचा पगार यामुळे अनेक तरुण भरती झाले. अशा प्रकारे एकंदरीत सुमारे ५५ हजार लोक रबर सैनिक बनले. या रबर सैनिकांचे पुढे काय झाले? आज ८५-८६ वर्षांचे असलेले सान्तोस, ल्युप्रेशियो माईया, नोस अरावनो ब्रागा इत्यादी रबर सैनिक सांगतात, "आम्हाला फसवण्यात आलं. आम्ही आमच्या गावाला कधीच परतू शकलो नाही. आम्हाला आमचा ठरलेला पगार आजतागायत मिळालेला नाही. अमेरिकेने ठरल्याप्रमाणे ब्राझीलला पैसे दिले. पण ते आमच्यापर्यंत आलेच नाहीत. सत्ताधाऱ्यांनी ते अन्यत्र वळवले."

 

ब्राझीलचे सैनिक १९४३ पासून पुढच्या काळात अमेरिकन सैन्याच्या बरोबरीने युरोपच्या रणभूमीवर जर्मन सैन्याशी लढले. तिथून ते विजेते म्हणून मायभूमीत परतले. त्यावेळची ब्राझीलची राजधानी रिओ-द-जानिरोमध्ये त्या विजयी सैन्याचे दिमाखदार संचलन झाले. त्यांना सर्व सुविधा, सवलती, निवृत्ती वेतन इ. सोयी मिळाल्या. रबर सैनिकांना मात्र काहीच मिळालं नाही. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सान्तोस सांगतो, "अ‍ॅमेझॉनच्या त्या जंगल प्रदेशात आमची राहाण्याची व्यवस्था अत्यंत वाईट होती. किंबहुना, काही व्यवस्थाच नव्हती. लष्करी थाटाच्या कॅनव्हासच्या तंबूत कसंबसं झोपायचं. रात्री दीड-दोन वाजता उठायचं. अंधारात चाचपडत रबराची झाडं शोधायची. त्यांना खाचा पडून रस गोळा करण्यासाठी भांडी अडकवून ठेवायची. मग दिवस उजाडल्यावर काही तासांनी पुन्हा जायचं. जमलेला रस आणायचा. मग तो पांढुरका रस आटवून त्याचे प्रत्येकी १३० पौंड एवढ्या वजनाचे घट्ट गोळे बनवायचे नि पॅक करायचे. जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचं असे. झोपेचे रोजचे खोबरे व्हायचे. असंख्य प्रकारच्या माशा, कीटक, डास यांच्या जोडीला साप आणि वाघही असायचे. आमच्या सुमारे ५५ हजार रबर सैनिकांपैकी किमान अर्धे लोक मलेरिया, पिवळा ताप, बेरीबेरी, हेपेटायटिस या रोगांना नि त्याचबरोबर सर्पदंशाला व वाघांच्या हल्ल्यांना बळी पडले. आम्हाला जिथे धड जेवण मिळण्याची मारामार, तिथे औषधपाणी कोण देणार? मेलेल्या माणसाला नीट पुरायलासुद्धा वेळ नसायचा. एखादा माणूस मेला की, त्याच्या राहुटीच्या जवळच त्याला गाडायचं नि मोकळं व्हायचं. रबराचा पांढुरका रस आटवताना इतका धूर व्हायचा की, त्या झोंबऱ्या धुराने अनेकजण आंधळे झाले किंवा त्यांचे डोळे कायमचे अधू झाले." हे असं १९४५ पर्यंत चालू होतं. त्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जपानने शरणागती पत्करली. त्याबरोबर अमेरिकेचा मलायातून होणारा रबर पुरवठा सुरळीत झाला. अमेरिकेची गरज संपली. पण, ब्राझीलचे सत्ताधारी महाखट. त्यांनी या रबर सैनिकांना युद्ध संपल्याचे सांगितलेच नाही. नोस ब्रागा हा आज ८२ वर्षांचा असलेला रबर सैनिक सांगतो, "मी खूप खटपट्या नि महत्त्वाकांक्षी होतो. खरंतर मी सैन्यात भरती व्हायला हवं होतं. म्हणजे, मला युरोपात जायला मिळालं असतं. पण, रबर सैनिक झाल्यास खूप पैसा मिळेल या आशेने मी रबर सैन्यात भरती झालो आणि साफ फसलो. मला माझा संपूर्ण पगार आजपावेतो मिळालेला नाही. एवढंच काय, युद्ध संपलं हे आम्हाला कळायला १९४६ साल उजाडलं. म्हणजे एक वर्षपर्यंत ही बातमी आमच्यापासून लपवून ठेवण्यात आली."

 

१९६० सालापासून ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया या नव्या, अत्याधुनिक शहरात हलविण्यात आली. हे शहर अत्याधुनिक नगररचना आणि वास्तुरचना यांचा आदर्श मानलं जायचं. जोस पाऊलिना डि कॉस्टा याच्या मते, "हे चकाचक शहर अमेरिकेने रबर सैन्यासाठी दिलेल्या पैशांतून उभारण्यात आलेलं आहे." डि कॉस्टा हा रबर सैनिकांच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. सुरुवातीच्या प्रसंगातला सान्तोस सांगतो, "मला कधीच ठरलेला पगार मिळाला नाही. युद्ध संपल्यावर मूळ गावी जाण्याचा प्रवासखर्चही मिळाला नाही. तीन हजार मैलांवरच्या माझ्या मूळ गावी परतण्याएवढे पैसे मला गेल्या ६०-६५ वर्षांत कधीच जमा करता आलेले नाहीत. मी इथेच अडकून पडलोय. माझ्या आईला मला कधीच भेटता आलं नाही." ल्युप्रेशियो माईया म्हणतो, "आम्हीही देशासाठीच हे काम केलं. मग त्या सैनिकांमध्ये आणि आम्हा रबर सैनिकांमध्ये एवढा भेदभाव का व्हावा? आम्हा रबर सैनिकांमुळेच अमेरिकेला रबर पुरवठा अखंडितपणे चालू राहिला नि त्यामुळेच युद्ध जिंकण्यास मदत झाली. हे तर सगळे जण मान्य करतात, पण आम्हाला आमची थकबाकी मिळावी, असं मात्र कुणालाच वाटत नाही." रबर सैनिकांच्या या हलाखीबद्दल खूप ओरड झाल्यावर ब्राझील सरकारने मध्यंतरी त्यांना निवृत्तीवेतन देण्याची घोषणा केली. पण, निवृत्ती वेतनासाठी लागणारे कागदपत्र आहेत कुणाकडे? अ‍ॅमेझॉन खोऱ्यातल्या भयंकर पावसामुळे ते केव्हाच नष्ट झाले किंवा त्यावेळेस रबर उत्पादन यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून घेतले आणि परत दिलेच नाहीत. बरं, जे रबर सैनिक अशा प्रकारे काहीना काही दस्तावेज सादर करू शकले, त्यांना सरकारने किती निवृत्ती वेतन दिलं, तर लढाऊ सैनिकांच्या एक दशांश म्हणजेच अत्यंत क्षुल्लक. दुसरं महायुद्ध संपले त्याला आता ७४ वर्षे उलटली आहेत. सुमारे ५५ हजारांच्या या रबर सैनिकांमधले निम्मे लोक तर त्याच वेळेस मलेरियाला किंवा सापा-वाघांच्या हल्ल्यांना बळी पडले. म्हणजे उरले साडेसत्तावीस हजार. आज ७४ वर्षांनंतर त्यातले किती जण जीवंत असतील? फारच थोडे. मग एवढ्या अन्य संख्येतल्या लोकांना लढाऊ सैनिकांप्रमाणेच निवृत्ती वेतन द्यायला काय हरकत आहे? खरं म्हणजे काहीच हरकत नाही. पण, द्यायची इच्छाच नाही. ज्यांनी आपल्या देशासाठी काही काम केलंय, त्यांना त्यांच्या श्रमांचा रास्त मोबदला मिळाला पाहिजे, हा साधा न्यायही ब्राझीलच्या आजच्या राज्यकर्त्यांना मान्य नाही. कुणालाही काही द्यायची वेळ आली की, लगेच त्यांना देशाची आर्थिक स्थिती बिकट असल्याची आठवण होते. पण, मग राजधानी ब्राझीलियातला झगमगाट, राजकारणी मंडळींचे दौरे यांच्यात काही काटकसर आहे का? तर अजिबात नाही. देश खरं म्हणजे समृद्ध, संपन्न आहे. पण, राज्यकर्त्यांची मनं मात्र गरीब आहेत. आर्थिक गरिबी दूर करता येते, मनाचं दारिद्य्र कसं घालवणार?

@@AUTHORINFO_V1@@