'प्लास्टिक वॉरिअर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |


 


महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असली तरी प्लास्टिकमुक्ती मात्र झालेली नाही. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी प्लास्टिकमुक्तीचा विडा उचलणार्‍या मुलुंडच्या अस्मिता गोखले यांच्या कार्याविषयी जाणून घेऊया...

 

प्लास्टिकचा भस्मासूर हा आज भारतातच नाही, तर संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठा प्रश्न. कारण, या प्लास्टिकची सहजासहजी विल्हेवाटही लावता येत नाही आणि पर्यायाने सर्वच प्रकारच्या प्रदूषणांना हे प्लास्टिक पोषक ठरते. प्लास्टिकच्या याच प्रश्नावर मुलुंडच्या 'प्लास्टिक वॉरिअर' संस्थेच्या प्रमुख अस्मिता गोखले यांनी एक जालीम उपाय शोधून काढला आहे.

 

अस्मिता यांचे लहानपण कोकणातले असल्याने निसर्गाशी त्यांचा खूप जवळचा संबंध. मात्र, लग्नानंतर मुलुंडमध्ये दाखल होताच त्यांना दर्शन झाले ते डम्पिंग ग्राऊंडमधील प्लास्टिकच्या दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या डोंगराचे. त्यामुळे या प्लास्टिकच्या समस्येवर आपण काही करू शकतो का, असा विचार अस्मिता यांच्या मनात सदैव येत असे. सुरुवातीला मुलुंडमध्ये अस्मिता गोखले आणि त्यांच्या पाच मैत्रिणींचा सांस्कृतिक ग्रुप होता. हळूहळू ही संख्या अडीचशेपेक्षा जास्त झाली. तेव्हा या महिलांच्या समूहशक्तीचा योग्य वापर व्हावा, यासाठी अस्मिता यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. मुलुंडमध्ये चैनस्नॅचिंगसारखे प्रकार खूप घडत होते. त्याचा सामना करण्यासाठी मग महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. इतर उपक्रमांबरोबरच प्लास्टिकच्या प्रश्नावर काम करणे खूप गरजेचे असल्याचा विचार अस्मिता यांच्या मनात कायम होताच.

 

अखेर 2016 मध्ये त्यांनी यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुण्याच्या 'पी.जी. इन्व्हायर्नमेंटल लिमिटेड'चे मालक गाडगीळ आणि दातार यांची भेट घेतली. गाडगीळ- दातार यांच्या कंपनीत प्लास्टिकपासून प्राथमिक दर्जाचे डिझेल बनविले जाते, याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर अस्मिता आणि त्यांच्या ग्रुपने मुलुंडमधील सोसायटी, घरांमधून प्लास्टिक गोळा करण्यास सुरुवात केली. प्रथम या गोष्टीला काही लोकांकडून खूप विरोधही करण्यात आला. नसत्या उठाठेवी कोणी सांगितल्यात तुम्हाला? आम्ही का प्लास्टिक देऊ? तुम्हाला यात आर्थिक फायदा मिळत असेल, अशा अनेक प्रश्न व शंकाकुशंकांचा भडिमार त्यांच्यावर करण्यात आला. मात्र, तरीही हार न मानता, या सगळ्यांवर मात करत त्यांनी आपले काम सुरूच ठेवले.

 

सुरुवातीला कंपनीला फक्त शंभर ते दीडशे किलोचे प्लास्टिक देण्यास त्यांनी सुरुवात केली. मग हळूहळू मुलुंडमधील सर्व शाळा, सोसायट्यांना यात सहभागी करून घेतले. प्लास्टिकपासून कसे डिझेल बनविले जाते, याविषयी सगळ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. थर्माकोलचे विघटन होणे अत्यंत अवघड असल्याने ते वितळवून त्यापासून तेल बनविण्यात येते, जे गाड्यांच्या इंजिनासाठी वापरण्यात येते. त्यामुळे या थर्माकोलला प्रथम कचर्‍यातून वेगळे करण्याचे काम सुरू केले. स्वतः अस्मिता गोखले हे सर्व प्लास्टिक गोळा करून, त्याचे वर्गीकरण करत.

 

अशाप्रकारे आपल्या पर्यावरणासाठी, आपल्या परिसरासाठी सामाजिक काम करण्याची ओढ अस्मिता यांना शांत बसू देत नव्हती. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी या प्लास्टिक मोहिमेला सुरुवात केली. आज फक्त मुलुंडच नाही, तर भांडुप, चेंबूर, घाटकोपरसारख्या अनेक भागांतूनही या उपक्रमासाठी प्लास्टिक पाठविण्यात येते. आज त्यांच्या कामाचा विस्तार खूप वाढला आहे. या प्लास्टिकपासून डिझेल बनविण्याविषयी अस्मिता सांगतात की,"प्लास्टिक आणि थर्माकोलचे कधीच नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. त्यामुळे प्लास्टिकपासून डिझेल बनविल्यामुळे प्लास्टिकचे प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होते. त्यातही जमा केलेल्या सगळ्याच प्लास्टिकमधून डिझेलनिर्मिती होत नाही.

 

मग उरलेल्या प्लास्टिकपासून वीजनिर्मितीही केले जाते. तसेच सिमेंटमध्ये मिसळून बांधकामासाठीही त्याचा वापर करता येतो. अस्मिता गोखले यांचा हा प्रकल्प खूप छोट्या स्वरूपात सुरू आहे आणि याला विस्ताराची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या पर्यावरणाची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपल्या आजूबाजूचे प्लस्टिक, थर्माकोल गोळा करून त्यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन त्या करतात.

 

विशेष म्हणजे, त्यांच्या या प्लास्टिक मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभागही उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही दर आठवड्याला अस्मिता प्लास्टिक गोळा करतात. यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा प्लास्टिकमुक्त शहराचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटले आहे. या सगळ्या मोहिमेत अस्मिता यांनी स्वखर्चाने अनेक गाड्या पुण्याला पाठविल्या आहेत. या कामातून त्यांना कोणतेही उत्पन्न मिळत नाही. फक्त समाजासाठी आणि निसर्ग संरक्षणासाठी त्यांनी स्वत:ला या कामात झोकून दिले आहे.

 

मुंबईतील हजारो टन प्लास्टिक मुलुंडच्या डम्पिंगवर आणून टाकले जाते. या प्लास्टिकपासून महापालिका डिझेल बनवून मुंबईला प्लास्टिकच्या विळख्यातूनही काढू शकते. या प्रकल्पाविषयी अस्मिता गोखले यांनी मुलुंडच्या 'टी' वॉर्डला प्रकल्पाची माहिती दिली आहे. 'झिरो प्लास्टिक मुलुंड' हे अस्मिता गोखले यांचे ध्येय असून 'झिरो प्लास्टिक मुंबई' व्हावी यासाठी त्यांचे काम जोमाने सुरू आहे. "आपल्या देशाचे, समाजाचे ऋण फेडणं आपले कर्तव्य आहे. या सामाजिक कामातून मी तेच ऋण फेडण्याचा प्रयत्न करतेय," असं म्हणून त्यावर प्रत्यक्ष कृती करणार्‍या अस्मिता गोखले यांचे कौतुक करावे तेवढे कमीच!

 
- कविता भोसले
 
 
@@AUTHORINFO_V1@@