चतुरंग

    09-Aug-2019
Total Views |


 


कमीत कमी रंग, सोप्यात सोपे आकार यांच्यासह भावविभोर चेहरे म्हणजे ज्ञानेश्वरांची पेंटिंग्ज होयया चतुरंगांची सर्क्युलर गॅलरीतील रंगजत्रा दि. ६ ते १२ ऑगस्ट पर्यंत अनुभवता येईल.

 

 
 


कलाकारांची पंढरी अर्थात जहांगिर कलादालन, मुंबई येथे 'सर्क्युलर गॅलरी'मध्ये मुंबई बाहेरच्या कलाकार समूहाचे प्रदर्शन सुरू आहे. हे चारही चित्रकार हे 'पेन्टिंग' क्षेत्रातील असून अर्थातच त्यांच्या कलाकृती या पेंटिंग्ज स्वरूपातील आहेत. ईशा बावीस्कर यांनी 'क्रिएटीव्ह पेन्टिंग्ज' मध्ये 'मास्टर ऑफ आर्ट' पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यांची कलाकृती ही एका विशिष्ट शैलीदार तंत्राने कॅनव्हासवर अवतरलेली असते. 'गोल्डन क्राऊन' या शीर्षकाची कलाकृती किंवा तशाच शैलीतील इतर कलाकृती पाहताना त्यांनी साधलेले 'क्रिएटीव्ह तंत्र' हेच त्यांच्या प्रत्येक कलाकृतींचे वैशिष्ट्य ठरावे. कॅनव्हासवर मिश्र रंगांचा उचित उपयोग करून त्यांनी कलाकृती चितारल्या आहेत. दुसरे चित्रकार चैतन्य इंगळे यांनी 'व्यक्तिचित्रणात''मास्टर्स डिग्री' प्राप्त केलेली असून नागपूर येथील शासकीय कला महाविद्यालयातून ते उत्तीर्ण झालेले आहेत. अत्यंत 'सिम्ल्पिफाईड' म्हणजे सुलभ आकारांमध्ये मानवाकृती आणि त्यांना दैनंदिन जीवनातील वस्तूंसह विषयबद्ध करून कलाकृती साकारल्या आहेत. 'चैतन्य' यांच्या कलाकृती या 'चैतन्यदायी' भासतात. सध्याच्या क्लीष्ट वा संवेदनाक्षम विषयांना त्यांनी फारच सोप्या आकारांमध्ये चित्रविषय रूपात मांडले आहे. 'एड' नावाची त्यांची एक कलाकृती फारच आशयगर्भ भासते. एका मुळी आवळलेल्या खाली डोके टेकवलेल्या व्यक्तीच्या पाठीवर मुकुट आणि गदा हातात घेतलेल्या पांढरे वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीने वजन देऊन विसावा घेतलेला आहे. पाहणार्‍याच्या विचारांतून हवा तसा अर्थ शोधता येईल, अशा त्यांच्या कलाकृती आहेत.

 

 
 

तिसरे कलाकार हे प्रफुल्ल पोटले. यांचेही कलाशिक्षण नागपूर विद्यापीठातच झालेले आहे. 'क्रिएटीव्ह पेन्टिंग' हा त्यांचा 'एमएफए'ला विषय होता. त्यांच्या कलाकृती 'क्रिएटीव्ह' असतीलही. परंतु, मला त्या अधिकाधिक कल्पनाविलासात रमलेल्या दिसतात. 'यु अ‍ॅण्ड मी' हे ऑईल ऑन कॅन्व्हासवरील पेंटिंग्ज फारच आशयपूर्ण वाटतात. अत्यंत 'सिम्प्लिफाईड' असलेल्या या पेंटिंग्जमध्ये घटक विषय, रंगलेपन पद्धती आणि यथायोग्य आकार यांच्या मिश्रणामुळे कलाकृती अधिक संवाद साधतात. चौथे कलाकार ज्ञानेश्वर बेंबाडे आहेत. मूळ लातूर येथील असलेल्या या चित्रकाराच्या कलाशिक्षणाची सुरुवात पुणे येथील 'अभिनव'ला झाली आणि शिक्षण हे मुंबईच्या सर जे. जे. स्कूलला झाले. त्यांच्या कलाकृतींमधील 'फिगरेटीव्ह' शैलीदेखील अलंकारिकतेने नटलेली असते. 'म्युझिकल फन' नावाचे शीर्षक असलेली एक कलाकृती पाहिल्यावर ध्यानात येईल की, भावनात्मकतेबरोबरच विशिष्ट लयीत, विशिष्ट म्युझिकल्स साहित्य हातात घेतलेल्या मानवाकृती अत्यंत उत्तम रीतीने त्यांनी चितारलेल्या आहेत. कमीत कमी रंग, सोप्यात सोपे आकार यांच्यासह भावविभोर चेहरे म्हणजे ज्ञानेश्वरांची पेंटिंग्ज होय. या चतुरंगांची सर्क्युलर गॅलरीतील रंगजत्रा दि. ६ ते १२ ऑगस्ट पर्यंत अनुभवता येईल.

- प्रा. गजानन शेपाळ