भारतीय रसायनशास्त्राचा जनक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019   
Total Views |



देशातील सर्वात पहिली फार्मा कंपनी सुरू करणाऱ्या आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचा जन्मदिन गेल्या आठवड्यात साजरा करण्यात आला. भारतीय रसायनशास्त्रातील त्यांच्या योगदानाविषयी...


१९२२ साली बंगालच्या महापुरामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले. लाखो लोकांनी आपली घर, संपत्ती गमावली. भूकबळीमुळे अनेकजण मृत्यूच्या दाढेत लोटले गेले. मात्र, त्या बिकट परिस्थितीतून एका आशेच्या किरणाप्रमाणे या संकटातून बाहेर काढणारी व्यक्ती म्हणजे आचार्य प्रफुल्लचंद्र राय. त्यांनी 'बंगाल रिलिफ फंड'च्या माध्यमातून तब्बल २५ लाख रुपयांचा निधी गोळा करून दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे खाण्यापिण्याच्या वस्तू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचू शकल्या. भारतातील सर्वात पहिल्या रसायनशास्त्र संशोधन शाळेच्या स्थापनेचे श्रेयही प्रफुल्लचंद्र राय यांनाच जाते. त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना 'भारतीय रसायनशास्त्राचा जनक' म्हणून ओळखले जाते. दि. २ ऑगस्ट, १८६१ रोजी बंगालच्या खुलाना जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. राय कुटुंबातील प्रफुल्लचंद्र हे तिसरे दाम्पत्य. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातल्याच शाळेत झाले. गावातील ही शाळा त्यांच्या वडिलांच्या सहकार्यातूनच चालवली जात होती. अवघ्या दहाव्या वर्षी त्यांना शिक्षणासाठी कलकत्त्याला पाठवण्यात आले. मात्र, चौथीत असताना त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारीमुळे अर्ध्यातूनच त्यांना गावी परतावे लागले. बालपणात शिक्षणाची ओढ असणाऱ्या आचार्य यांच्या पदरी गावी परत येऊन निराशाच पडली. मग वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांनी प्रेरणात्मक आत्मकथा, विज्ञान, इतिहास, भूगोल, बंगाली साहित्य आदींसह ग्रीक, फ्रेंच, संस्कृत आदी भाषांचाही त्या वयात अभ्यास सुरू केला.

 

१८७६ मध्ये त्यांनी कलकत्त्याला परत येत पुढील शिक्षणासाठी अल्बर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यासागर महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षणास सुरुवात केली. मात्र, या महाविद्यालयात 'विज्ञान' विषय नसल्याने अभ्यासासाठी ते प्रेसिडन्सी महाविद्यालयात दाखल झाले. पूर्वी 'कला' विषयात आवड असणाऱ्या राय यांचा कल पुढे विज्ञानाकडे झुकला. प्रेसिडन्सी महाविद्यालयात त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवे वळण मिळाले. महाविद्यालयात त्यांची ओळख अ‍ॅलेक्झांडर पेडलर यांच्याशी झाली. त्यांचा प्रभाव राय यांच्यावर पडत गेला. पेडलर हे भारतातील प्रमुख संशोधकांपैकी एक मानले जात. राय यांनी वसतिगृहातील त्यांच्या खोलीत एक लहानशी प्रयोगशाळाही तयार केली होती. १८८२ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांना 'गिल्क्राईस्ट शिष्यवृत्ती' मिळाली. त्याद्वारे त्यांना एडिनबर्ग विद्यापीठात जाण्याची संधी मिळाली. त्यांनी तिथे बी.एस्सी आणि डी.एस्सीची पदवी मिळवली. ज्यावेळी सेंद्रीय रसायनशास्त्र संशोधनावर काम सुरू होते, त्याच दरम्यान अजैविक रसायनशास्त्रात त्यांना रस निर्माण झाला होता. याच विषयातील त्यांच्या संशोधन पत्रिकांमुळे ते जगविख्यात झाले. त्यामुळे त्यांना परदेशात नोकरी सहज मिळाली असती. परंतु, त्यांनी भारतात परत येऊन देशासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मित्र आचार्य जगदीशचंद्र बोस यांच्यासह संयुक्तपणे वर्षभर काम केले. १८८९ मध्ये ते कोलकता प्रेसिडन्सी महाविद्यालयात 'साहाय्यक प्राध्यापक' पदावर रुजू झाले. या काळात त्यांनी रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन सुरू केले. रसायनशास्त्रातील त्यांच्या या योगदानामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विषयात रस घेण्यास सुरुवात केली. त्याकाळी मेघनाद साहा आणि शांति स्वरुप भटनागर आदी वैज्ञानिकांनाही राय यांनी मार्गदर्शन केले.

 

एका छोट्याशा घरातून त्यांनी भारतातील पहिला रासायनिक कारखाना सुरु केला आणि भारतातील सर्वात पहिल्या फार्मा कंपनीचा पाया रोवला. कंपनीचे नाव होते, 'बंगाल केमिकल अ‍ॅण्ड फार्मासिटीकल वर्क्स लिमिटेड.' या कंपनीची सुरुवात एका लहानशा घरातून झाली. केवळ ७०० रुपयांच्या गुंतवणुकीसह त्यांनी कंपनीचा प्रारंभ केला. भारतीयांच्या मनात त्यांनी स्वयं-उद्यमी होण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. केवळ ब्रिटिशांच्या कंपन्यांमध्ये नोकरी शोधणे हा मुख्य उद्देश न ठेवता, भारतीयांनी उद्योजकतेकडे वळावे, ही संकल्पना व विचार भारतीय तरुणांच्या मनात त्यांनी रुजवला. कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःच नोकरी देणारे व्हा, हा आत्मविश्वासही त्यांनी जागृत केला आणि स्वदेशी कंपन्या स्थापित करण्यासाठी देशवासीयांना आवाहन केले. तंत्रज्ञान, कौशल्य, साहित्य पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असणारी राय यांची पहिली भारतीय कंपनी ठरली. याद्वारे रसायने, औषधे आणि घरगुती वापरासाठीचे साहित्य आदींची निर्मिती करण्यास सुरुवात केली. यात पावडर, टूथपेस्ट, ग्लिसरीन, साबण आदींचा समावेश होता. वयाच्या चक्क साठाव्या वर्षी त्यांनी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या विकासासाठी काम सुरू केले. त्याद्वारे त्यांनी या ठिकाणी संशोधन शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आणि संमेलनांतून भारताचे प्रतिनिधीत्व केले. १९२० मध्ये त्यांना विज्ञान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. १९३६ मध्ये वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ते प्राध्यापकपदावरून निवृत्त झाले. त्या दरम्यान त्यांनी रसायनशास्त्रातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. १६ जून, १९४४ रोजी वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०११ मध्ये त्यांना 'रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री'तर्फे (आरसीसी) 'केमिकल लॅण्डमार्क प्लाक' या मानांकनाने सन्मानितही करण्यात आले. पहिल्यांदाच युरोपबाहेरील व्यक्तीला हा सन्मान देण्यात आला होता. त्यांच्या या कार्याला दै.'मुंबई तरुण भारत'चा सलाम...!

@@AUTHORINFO_V1@@