पाकिस्तान बावचळला : समझोता सीमेवरच रोखली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |




असा शेजारी कोणालाही न मिळो : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

 

नवी दिल्ली : भारतमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद पाकिस्तानमध्ये दिसून आले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता पाकिस्तानने आता समझौता एक्सप्रेस रद्द केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून समझोता एक्सप्रेस भारताकडे येण्यास रवाना झाली होती. परंतु, वाघा सीमेवर ही ट्रेन आल्यानंतर पाकिस्तानने ती थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक प्रवासी सीमेवरच अडकल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. भारताकडून अजूनही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही मात्र पाकिस्तानी माध्यमांमध्ये याची चर्चा आहे.

 

अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे अधीक्षक अरविंदकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून समझौता एक्सप्रेस भारतात येणे अपेक्षित होते. परंतु, भारतीय रेल्वेने आपला चालक आणि कर्मचाऱ्यांना पाठवून समझौता एक्सप्रेस सीमेवरून घेऊन जावी, असा संदेश पाकिस्तानकडून देण्यात आला. पाकिस्तानने रेल्वेसुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय घेतला असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, भारताने आपले गार्ड आणि ड्रायव्हर पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.

 

असा शेजारी कोणालाही न मिळो : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

 

भारताने कलम ३७० रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आणि राज्याचा दर्जाही काढून घेतला. यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी शक्य त्या पद्धतींनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भारताशी असलेले राजनैतिक आणि व्यापारी संबंध नुकतेच संपुष्टात आणले आहेत. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो,' असे म्हणत पाकला टोला लगावला आहे. "आमचा शेजारी कधी काय करेल, याची आम्हाला सतत चिंता लागून राहिलेली असते. आमची समस्या ही आहे की, आम्ही मित्र बदलू शकतो. मात्र, शेजारी बदलू शकत नाही. एकीकडे शेजाऱ्याची निवड करणे आमच्या हातात नाही आणि दुसरीकडे असा काही शेजारी आमच्या बाजूला आहे की, देव करो आणि 'असा शेजारी' कोणालाही न मिळो असे म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे," असे राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.

 

भारतीय चित्रपटांवरही बंदी

 

पाकिस्तानने भारताशी व्यापारविषयक संबंध तोडल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहम्मूद कुरेशी यांनी टीव्हीवरून जाहीर केले. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट दाखवण्यावरही इम्रान खान यांच्या सरकारने बंदी घातली आहे. पाकिस्तानने काश्मीरबद्दलच्या निर्णयावर टोकाच्या प्रतिक्रिया देऊ नयेत, अशा सूचना संयुक्त राष्ट्रांनी दिल्या आहेत.

 
@@AUTHORINFO_V1@@