काश्मीरकडे वाकडी नजर केल्यास गंभीर परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |


 


 

पंतप्रधानांचा फुटीरतावादी, दहशतवाद्यांना इशारा

 

नवी दिल्ली : दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून जम्मू-काश्मीर आता मुक्त झाले आहे. त्यामुळे काश्मीरकडे कुणीही वाकडी नजर करून बघितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खरमरीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावादी व दहशतवाद्यांना उद्देशून दिला.

 

जम्मू-काश्मीरचे वादग्रस्त कलम ३७० हटवल्यानंतर व राज्याचे विभाजन केल्यानंतर पंतप्रधानांनी गुरूवारी प्रथमच देशास संबोधित केले. यावेळी त्यांनी सुमारे ४० मिनिटे संवाद साधत जम्मू-काश्मिर आणि लडाखच्या विकासाचा रोडमॅप सादर केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलम ३७० संपुष्टात आल्यामुळे आता जम्मू-काश्मीर आणि लडाखचा अनेक दशकांपासून खुंटलेला विकास आता गतीमान होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासात आता कोणीही अडथळा आणू शकत नाही आणि अडथळे आणणाऱ्यांचा आणि प्रदेशात दहशतवाद पसरवणाऱ्यांचा समाचार आता तेथील जनताच घेईल, असाही विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच, दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून जम्मू - काश्मीर आता मुक्त झाले असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.

 

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला असून तेथे आता नव्या युगाची सुरूवात झाली आहे. यामुळे काश्मिरी आणि लडाखच्या जनतेला देशातील अन्य प्रदेशांप्रमाणेच विकासाची मोठी संधी निर्माण झाली आहे. जम्मू - काश्मीर आणि लडाख या दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाले आहेत, त्यामुळे त्यांचा विकास साधणे आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घेणे याची जबाबदारी सर्वस्वी केंद्र सरकारसह १३० कोटी भारतीयांची आहे, याची मी ग्वाही देत असल्याचेही मोदी यांनी सांगितले. पाकिस्तानच्या कुरघोड्यांचा समाचार घेताना मोदी म्हणाले की, कलम ३७० चा फायदा घेत पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये भारतविरोधी प्रचार, प्रसार आणि जनतेच्या भावना भडकविण्याचे काम करण्यात येत होते. जम्मू-काश्मीरला कलम ३७० ने दशकानुदशके दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार याशिवाय काहीही दिले नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

 

कलम ३७० मुळे भारतीय संसदेने निर्माण केलेले अनेक कायदे काश्मीरमध्ये लागू नव्हते. शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, सफाई कर्मचारी कायदा, किमान वेतन कायदा, मुलींना समान अधिकार, दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा, अल्पसंख्यांक कायदा, राजकीय आरक्षण असे अनेक लोकहिताचे कायदे काश्मीरमध्ये लागू नव्हते. मात्र, आता कलम ३७० आणि ३५-अ सोबत हा अऩ्यायही इतिहासजमा झाला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह हजारो लोकांचे कलम ३७० संपुष्टात यावे, हे स्वप्न होते. अखेर सत्तर वर्षांनी ते स्वप्न सत्यात उतरले असल्याची भावनाही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

 

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका

 

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका घेतल्या जातील, असे मोदी यांनी स्पष्ट केले. जम्मू - काश्मीर हा सध्या काही काळापुरता केंद्रशासीत प्रदेश असला तरी येथे आधीप्रमाणेच मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानसभा, आमदार अशी व्यवस्था कायम राहणार आहे. लवकरच होणाऱ्या निवडणुकांमध्ये काश्मीरी नागरिकांमधूनच नव्या दमाचे, विकासाची आस असणारे लोकप्रतिनिधी निवडले जातील दहशतवाद, फुटीरतावाद याचा पराभव करून नवे नेतृत्व विकासाची वेगळीच उंची गाठेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@