नानाजी देशमुख यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |


 

प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिकांनाही 'भारतरत्न'

 

नवी दिल्ली : जनसंघाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व रा. स्व. संघाचे प्रचारक नानाजी देशमुख (मरणोत्तर), प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका व माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात, 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात नानाजी देशमुख यांच्या वतीने दीनदयाळ शोध संस्थानचे अध्यक्ष विरेंद्रजीत सिंग यांनी 'भारतरत्न' सन्मान स्वीकारला.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. २५ जानेवारी रोजी नानाजी देशमुख, भूपेन हजारिका व डॉ. प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' पुरस्कार घोषित केले होते. या पुरस्कारांचा प्रदान सोहळा गुुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश रंजन गोगोई, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, रविशंकर प्रसाद, भाजप कार्याध्यक्ष खा. जगतप्रकाश नड्डा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी सर्वप्रथम नानाजी देशमुख (मरणोत्तर) यांना 'भारतरत्न' प्रदान केला. नानाजी देशमुख यांच्या वतीने दीनदयाळ शोध संस्थानचे अध्यक्ष विरेंद्रजीत सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर प्रसिद्ध गायक डॉ. भूपेंद्रकुमार हजारिका (मरणोत्तर) यांना 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला. हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर अखेरीस माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या राजकारणात दीर्घकाळ मोलाची भूमिका बजावली आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघाचे नेते राहिलेल्या नानाजी देशमुख यांनी ग्रामविकास क्षेत्रात मोलाचे योगदान देत चित्रकुट प्रकल्पाद्वारे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तसेच, गायन, संगीत क्षेत्रांत भरीव योगदान देणारे आणि ईशान्य भारतातील एक महनीय व्यक्तिमत्व म्हणून भूपेन हजारिका यांची ओळख आहे.

@@AUTHORINFO_V1@@