कृष्णा, कोयना, पंचगंगेचा कोप कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



२७ मृत्यू, २ लाख नागरिकांचे स्थलांतर; केंद्राकडूनही मदतीचा हात


कोल्हापूर : गेल्या दोन आठवड्यांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा, कोयना, पंचगंगा आदी नद्यांचा कोप अद्यापही कायम आहे. याचा प्रचंड मोठा फटका सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना बसला असून कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे या जिल्ह्यांतील अनेक भागांत अद्यापही भीषण पूरपरिस्थिती कायम आहे. दोन्ही जिल्ह्यांत प्रशासकीय यंत्रणेकडून मदतकार्य वेगाने सुरू असून केंद्र सरकारनेही मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच, कर्नाटक राज्य सरकारनेही आलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक वेगाने विसर्ग करण्याच्या महाराष्ट्राच्या विनंतीला मान्यता दर्शवल्याने पुढील एक-दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विदर्भात सुरू असलेली आपली ‘महाजनादेश यात्रा’ काही काळासाठी स्थगित करत बुधवारी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी सांगली, कोल्हापुरातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. तसेच, कोल्हापूर येथे दाखल होत मदतकार्याचा आढावा घेतला. यानंतर कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात आहे. तसेच, या प्रयत्नांना केंद्र सरकारकडूनही तत्परतेने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दूरध्वनीद्वारे आपल्याला आश्वस्त केले असून केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली. तसेच पूरग्रस्तांच्या निवारा शिबिरामध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. पूरस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांना गती देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी संबंधित स्थानिक यंत्रणांना निर्देश दिले. कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूक प्रचंड प्रमाणात विस्कळीत झाली असून या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी आपल्याला कळविले असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

 

कर्नाटकचे सहकार्य, आलमट्टीतून विसर्ग

 

कर्नाटकातील आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेली पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी आलमट्टीधरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी केली. त्यानुसार आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे येडीयुरप्पा यांनी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्नाटकच्या या सहकार्यामुळे सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणात येण्याची आशा आहे. आलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकातील विजापूर व बागलकोट जिल्ह्यांच्या सीमांवर कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे.

 

एनडीआरएफ, लष्कर, नौदलाची ३३ पथके

 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण २२ मदत पथके कार्यरत सांगलीमध्ये एकूण११ पथके कार्यरत आहेत. मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ पथकेमागविण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

जनजीवन विस्कळीत

 

पुणे प्रशासकीय विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये सुमारे आतापर्यंत २ लाख ५ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये अर्थातच, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. सांगलीमध्ये अद्यापही ३० ते ३५ हजार तर कोल्हापुरात १७ ते १८ हजार नागरिक अडकले असण्याची शक्यता असून त्यांच्या मदतकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

 

शुक्रवारची महाजनादेश यात्रा स्थगित

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे शुक्रवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मूळ नियोजनानुसार महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होता व त्या दिवशी धुळे व नंदूरबार जिल्ह्यात कार्यक्रम नियोजित होते. तथापि, पूरस्थिती ध्यानात घेऊन मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारीच मुख्यमंत्र्यांनी अकोला येथून मुंबईकडे प्रयाण केले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असून त्यामुळे त्यांनी महाजनादेश यात्रेतील शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@