पराभूतांना आमदारकीची स्वप्ने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019   
Total Views |



राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांची धामधूम जोराने सुरू झाली आहे. आधीच इच्छुकांची गर्दी मोठी असताना आता त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभूतांची नव्याने भर पडणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची पुरती दाणादाण उडाल्याने त्यांच्या तंबूतील सगळ्या पराभूतांनी आता आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीकडे वळवल्यामुळे आधीपासून मोर्चेबांधणी केलेल्या इच्छुकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी खासदार नाना पटोले, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, बुलढाण्याचे नेते व माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे लोकसभेतील पराभूत विधानसभा निवडणुकीत आपले नशीब पुन्हा एकदा आजमावून बघणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. शिवसेनेचे औरंगाबादचे ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरेही यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रीय राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणात अधिक रस असल्याने अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढण्यास तयार नव्हते. मात्र, पक्षआदेशामुळे त्यांना अखेरीस मनाविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. म्हणूनच आता ते आपल्या पारंपरिक भोकर विधानसभा मतदारसंघातून तयारीला लागले आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून लढण्याची चिन्हे आहेत. सांगलीतील वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटीलही विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. शिर्डीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपूरमधून उमेदवारी मिळू शकते. त्याशिवाय धुळ्यातील कुणाल पाटील, नंदूरबारचे के. सी. पाडवी, गडचिरोलीतून डॉ. नामदेव उसेंडी आणि जालन्यातून सुभाष झांबड आदी पराभूत काँग्रेसीही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. याशिवाय भाजपमध्ये न आल्यास राष्ट्रवादीतर्फे संग्राम जगताप, राणा जगजितसिंह हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या पराभूतांना आता आमदारकीची स्वप्ने पडू लागली असून त्यांच्या पदरात जिंकण्याची आशा पडते की पराजयाची निराशा, हे सुज्ञ मतदारराजाच ठरवेल.

 

अगतिक काँग्रेस

 

काँग्रेस एकेकाळी छोट्या-मोठ्या पक्षांना निवडणुकांच्या खेळात चांगलीच खेळवत होती. पण, आता काळाची चक्रे उलट फिरली असून छोटे पक्षच काँग्रेसला वाकुल्या दाखवू लागले आहेत. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष काँग्रेसला वारंवार आव्हान देत आहे. मात्र, या आव्हानांना उत्तर देणे काँग्रेसने टाळले असून जाणीवपूर्वक चुप्पी साधली आहे. 'वंचित' आपल्याला फटकारणार, आपल्याबरोबर येणार नाही, हे माहीत असूनही काँग्रेस आघाडीसाठी 'वंचित'कडे डोळे लावून बसली आहे. काँग्रेसला आमच्याबरोबर आघाडीचा विचार करायचा असेल तर त्यांनी याआधीच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. आमचा पक्ष (वंचित बहुजन आघाडी) भाजपची 'बी टीम' आहे, असा बेछूट आरोप काँग्रेसने केला होता. त्याबाबतचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून आल्याशिवाय आघाडी-बिघाडी काहीच होऊ शकत नाही, असे 'वंचित'च्यावतीने सांगण्यात आले. पण यावर काँग्रेसने 'वंचित'ला काहीच उत्तर दिले नाही. भाजप, शिवसेना या मोठ्या पक्षांनीही काँग्रेसला जेवढे अपमानित केले नसेल तेवढा अपमान 'वंचित'सारखा छोटा पक्ष करत आहे. 'वंचित'ला काँग्रेसशी अजिबात आघाडी करायची नाही, हे पक्के माहीत असूनही काँग्रेस त्यांच्यामागे फरफटत जात आहे. मागासवर्गीय व दीनदलित वर्ग 'वंचित'चा मतदाता असल्याने काँग्रेस 'वंचित'बाबत 'ब्र' ही काढत नाही. मात्र, त्यामुळे काँग्रेसचा अगतिक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. ज्या काळात काँग्रेसचा दबदबा होता, त्यावेळीही काँग्रेसने कधी स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता काँग्रेस 'वंचित'बाबत शांत भूमिका घेणार, हे गृहीत धरूनच आंबेडकर काँग्रेसवर शाब्दिक हल्ले करत आहेत. 'वंचित'सारख्या छोट्या पक्षांना तोंड देण्याची क्षमता जर काँग्रेस हरवून बसली तर भाजप, शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षांसमोर काँग्रेस राजकीय लढाईला उभीच राहू शकत नाही, हे सांगायला आता कोणत्याही राजकीयतज्ज्ञांची आवश्यकता राहिलेली नाही. अशी परिस्थिती कायम राहिल्यास, काँग्रेसची हीच अगतिकता त्यांना आगामी निवडणुकीतही पराभवाच्या किनार्यावर आपटल्याशिवाय राहणार नाही.

 
 
@@AUTHORINFO_V1@@