हे 'महापौर' की 'महापोर'?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019   
Total Views |


 


लोकप्रतिनिधी म्हणून मतदारांनी सरकारी सभागृहांत निवडून दिल्यानंतर त्या व्यक्तीवर केवळ स्वत:चीच प्रतिमा नव्हे, तर त्या पदाची गरिमा जपण्याची नैतिक, अलिखित जबाबदारी आलीच! मग अगदी राष्ट्रपतीपदापासून ते नगरसेवकांपर्यंत कुणीही त्याला अपवाद नाहीच. पण, बरेचदा हे सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे पद सामाजिक कुचेष्टेलाही आमंत्रण देणारे ठरते. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा एका महिलेचे हात पिरगळतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्यानेहे महापौर की महा‘पोर’ असाच प्रश्न उपस्थित होतो. सांताक्रुझमध्ये पाणी तुंबल्यामुळे झालेल्या शॉटसर्किटने मृत्युमुखी पडलेल्या मायलेकाच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी महापौर स्थानिक नगरसेविकेसह दाखल झाले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापही होता. पश्चिम द्रुतगती मार्गावर ‘रास्ता रोको’ करून त्यांनी आपला रागही व्यक्त केला. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावरही निषेध मोर्चा काढला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, महापौरसाहेब या वस्तीत आले खरे. पण, नागरिकांचा रोष पाहता, शहराचे प्रथम जबाबदार नागरिक म्हणून नमते घेत, त्यांनी शांततापूर्वक लोकांशी चर्चा करणे अपेक्षित होते. पण, उलट एका जाब विचारणाऱ्या आणि संतापलेल्या महिलेचा हात पिरगळून महापौरांनीए दादागिरी करू नकोस, तुला माहिती नाही मी कोण आहे?” असे ‘महापोरकट’ प्रत्युत्तर दिले. यानंतर तणाव निवळण्याऐवजी, त्या आगीत तेल ओतले गेले. महापौरसाहेबांनी आरोप फेटाळून मनसेच्या कार्यकर्त्यांवर दोषारोपण केले असले तरी ही वर्तणूक अशोभनीयच. मग ती कुठल्याही राजकीय पक्षाची महिला कार्यकर्ती असो वा सामान्य नागरिक. एका शाळेचे मुख्याध्यापक राहिलेल्या माणसाला ही साधी गोष्ट समजू नये, याला काय म्हणावे? राहता राहिला प्रश्न महाडेश्वरांना ‘ओळखण्याचा’, तर यांच्या कामांपेक्षा, त्यांनी केलेल्या उलटसुलट विधानांमुळेच महापौरसाहेबसर्वाधिक चर्चेत असतात. तेव्हा, मुंबईसारख्या महानगराचे महापौरपद हे अत्यंत प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे आहे. ‘महापौर’ हा त्या शहराचा एक चेहरा आणि ओळख असते. त्यामुळे फक्त याच शहरात नाही, तर बाहेरही मुंबईची पतप्रतिष्ठा महापौरांच्या वागणुकीत प्रतिबिंबित व्हायला हवी. पण, इथे चित्र दुर्देवाने उलटेच. त्या पदावरील व्यक्तीच्या गैरवर्तणुकीमुळे मानाच्या महापौरपदाच्या प्रतिष्ठेची लक्तरे अशी वेशीवर टांगली जाणार नाही, एवढीच काय ती यापुढे अपेक्षा.

 

उद्योगाला ‘ह्यूमन टच’

 

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥१॥

 

जेवणापूर्वी बऱ्याच घरांत अजूनही म्हटली जाणारी ही प्रार्थना. पण, हल्ली संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवणाचा आनंद घेताना क्वचितच दिसते. कारण, प्रत्येकाच्या शाळा-कॉलेजच्या, कामाच्या वेळा वेगवेगळ्या, तर काहींना आपल्या खोलीतच बसून टीव्ही-मोबाईल बघत बघत जेवण फक्त घशाखाली ढकलण्याची लागलेली घाणेरडी सवय. पण, शिक्षणानिमित्त, कामानिमित्त, प्रवासानिमित्त बरेचदा हॉटेलमध्ये एकटेच बसून जेवण्याची वेळ येते. बरेचदा कोणाची सोबतही नसते. मग अशावेळी मोबाईल बघत पटापट जेवण उरकले जाते. खरं तर म्हणतात ना, जेवणादरम्यान जास्त बोलू नये. सगळं लक्ष अन्नावरच असावे. पण, हॉटेलमध्ये आपल्या समोरची खुर्ची बहुदा रिकामी पाहून थोडं चुकल्या-चुकल्यासारखं, एकटंही वाटतंच म्हणा... हॉटेलमध्ये अशाच एकट्यादुकट्या जेवणाऱ्यांना मुंबईतील एका हॉटेलने मात्र सुखद धक्का दिला. या हॉटेलने चक्क जेवणाच्या टेबलावर एक सुंदर नारंगी गोल्डफिश असलेला फिशबॉलच समोर ठेवला. का, तर हॉटेलमधील त्या ग्राहकांना जेवतानाही कुठल्याही प्रकारचा एकटेपणा वाटू नये, हा त्यामागचा उद्देश. ज्या कोणाच्या डोक्यात ही सुपीक कल्पना आली, त्याला सलाम! अतिशय कल्पक आणि ग्राहकांना आकर्षित करणारी अशी ही संकल्पना कौतुकास्पदच म्हणावी लागेल. हॉटेलमध्ये जेवणाऱ्या त्या ग्राहकासाठीही हा खरं तर पहिलावहिला आणि वेगळाच अनुभव होता. फिशबॉलसोबत आपल्या जेवणावर ताव मारतानाचा फोटो त्या ग्राहकाने ट्विटरवर शेअर केला आणि या हॉटेलवर एकच कौतुकाचा वर्षाव झाला. या थ्री-स्टार हॉटेलची ही परंपरा जुनीच असली, तरी सोशल मीडियामुळे ती प्रसिद्धीस आली. सांगायचा मुद्दा एवढाच की, ग्राहक हा बाजाराचा राजा आहे, असे नुसते न म्हणता, तुम्ही आपल्या ग्राहकांना कशा पद्धतीने एक आपलेपणाची वागणूक देता, त्यावरही तुमचा व्यवसाय आणि पर्यायाने नफ्याचे गणित अवलंबून आहे. तेव्हा, आपल्या व्यवसायालाही असाच ‘ह्यूमन टच’ दिल्यास, ग्राहकही नक्कीच प्रेमवर्षाव करतील, यात शंका नसावी.

 
@@AUTHORINFO_V1@@