वैचारिक योद्धयाचे अभिष्टचिंतन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019   
Total Views |



आज दि. ९ ऑगस्ट. क्रांतिदिन. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांचाही आज वाढदिवस. पतंगे सरांनीही स्वतःच्या प्रतिभेने, जिज्ञासेने पारंपरिक धोपट विचारांमध्ये क्रांती केली. प्रतिकूल परिस्थितीमध्येही ध्येयवाद न सोडणारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना आयुष्याचे मंत्र मानणाऱ्या रमेश पतंगेसरांना दै. 'मुंबई तरूण भारत'तर्फे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!


विक्रोळीतील मुस्लीम समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता. कार्यक्रमाला पुरुषांपेक्षाही मुस्लीम आयाबायांनी चांगलीच हजेरी लावली होती. रमेश पतंगे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. या कार्यक्रमाचा परिसर असा की, तिथे रा. स्व. संघ तर सोडाच, भाजप-शिवसेना वगैरेंचा शिरकाव होणेही अवघड. रा. स्व. संघाचे मान्यवर विचारवंत येणार म्हणून मदनमोहन कुशवाहा, सुरेश यादव, आसिफ कुरेशी वगैरे या कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रमामध्ये कोणतीच कसूर ठेवली नव्हती. कार्यक्रमामध्ये पतंगे काय बोलतील आणि समोर बसलेल्या अर्धशिक्षित बुरख्यावाल्या महिलांना ते समजेल का? असा विचार माझ्यासह आयोजकांच्याही मनात होताच. पण, पतंगे आपल्या साध्या पण हिंदी लहेजातून बोलू लागले. बालकांचे भविष्य, समाजातील संधी आणि आई म्हणून आपले कर्तव्य, यावर त्यांनी कुराण ते सध्याच्या सामाजिक परिस्थितीपर्यंत विस्तृत चर्चा केली. समोरच्या महिला अत्यंत तल्लीन होऊन हे सगळ ऐकत होत्या. एका बापाने आपल्या सासरच्या पोरींना चार हिताच्या गोष्टी सांगाव्यात, असेच काहीसे ते दृश्य होते. कार्यक्रमानंतर चहा-नाश्ताचा कार्यक्रम हॉलमध्येच आयोजित केला होता. उत्तम किटलीतून चहा आणला होता. पण, नाष्ता यायला जरा उशीर लागणार होता. नाही म्हणायला त्या कार्यक्रमामध्ये केळी विकणारा एक माणूसही उपस्थित होता. पतंगेसरांचे भाषण एकून तो खुश झाला होता. चार-पाच डझन केळी घेऊनच तो हॉलमध्ये आला होता. पतंगेसरांनी केळी खावी, अशी त्याची इच्छा होती. पण ते खातील का? असा विचार करत तो एका कोपऱ्यात बसलेला. आता इथे हॉलची वेळ संपत आलेली. कार्यकर्ते चुळबुळ करू लागले. इतका मोठा माणूस चहा कशात द्यायचा? हॉलमध्ये प्लास्टिकचे कप होते. त्यात कसा चहा द्यायचा आणि नाश्त्यासाठी त्यांना बसवून ठेवायचे? इतक्यात पतंगेसरांनी आयोजकांना बोलावले, म्हणाले, ''त्या प्लास्टिकच्या कपमध्ये थोडा चहा द्या. फार भरून नको, नाहीतर सांडतो.” कार्यकर्त्यांचं अर्ध टेन्शन कमी झालं. चहा पिता पिता कार्यकर्त्यांशी गप्पा मारतानाच तो केळीवालाही आला. त्याने केळ्यांचा घड सरांसमोर ठेवला. सर एक केळं घेत म्हणाले, “अरे वा, छान आहेत. केळी वाटण्याची कल्पना छान.” हुश्श! कार्यकर्त्यांचं मोठं टेन्शन गेलं होतं. शिस्त आणि सगळ्या गोष्टीत व्यवस्थितपणाची आवड असणारे पतंगेसर केवळ कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ नये, त्यांना अपमानास्पद वाटू नये म्हणून सारे करत होते. हे कळत होते. ही आठवण यासाठी की, 'रमेश पतंगे' नावाच्या माणसाचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्यांच्यातले संवेदनशील माणूसपण त्याहून मोठे आहे.

 

काही वर्षांपूर्वी 'सा. विवेक'सोबत मी एक संशोधन करत होते. पारंपरिक कारागीर समाजाची स्थिती. त्यावेळी मी संशोधनामध्ये सर्वेक्षण करून निष्कर्ष लिहिले होते. एके दिवशी सरांचा फोन आला, म्हणाले, “तुझी लेखनशैली चांगली आहे. तू लिहित जा.” मला लिहायलाही आवडायचे. पण, नोकरीच्या धकाधकीत आयुष्य यांत्रिक झाले होते आणि लिहिण्याची आवडपण मागे राहिली होती. सरांच्या प्रोत्साहनामुळे माझी हरवलेली आवड पुन्हा मनात पिंगा घालू लागली. मग दै. 'मुंबई तरुण भारत'च्या चेंबूर कार्यालयात जाऊन संपादक किरण शेलारांना भेटून आले. त्यांनीही मला दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये काम करायचे असेल, तर जरूर ये, असे सांगितले. पण वर्तमानपत्रातल्या कामाचा अनुभव नाही, नवीन क्षेत्र, नवीन लोक, त्यामुळे मी तो विषय माझ्यापुरता संपवला. त्यानंतर लातूरचे समरसता साहित्य संमेलनाहून परतताना मुंबईला जाणाारी गाडी उशिरा येणार होती. बरीच रात्र झाली होती. इतक्यात पतंगेसरांचं लक्ष माझ्याकडे गेलं. ते म्हणाले, “तू दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये रुजू झालीस का? हे बघ, तू माझ्या मुलीसारखी आहेस. तुझे भलेबुरे पाहणे माझे कर्तव्य आहे. तुझ्यातल्या लेखनगुणांना तिथे वाव मिळेल. तिथे 'स्काय हॅस नो लिमिट.' स्वतःचे 'युएसपी' ओळख. कळलं का?” सुरुवातीला करडा असलेला आवाज अतिशय मृदू झाला होता. आजूबाजूचे शेकडो कार्यकर्ते स्तब्ध होऊन ऐकत होते. माझे डोळे भरून आले, कारण माझे वडील जाऊन दोन वर्ष झाली होती. त्यांच्या जाण्यानंतर इतक्या अधिकारवाणीने माझ्या भल्याबुऱ्याचा विचार करणारे कोणी नव्हतेच. सरांनी सांगितल्याप्रमाणे दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये काम करताना दररोज हाच अनुभव येतो, 'स्काय हॅस नो लिमिट!'

 

त्यानंतरही अनेक व्यासपीठांवर वक्ता म्हणून जाताना, सर आजही मला विचारतात, “काय मांडणार आहेस? उद्या घरी ये. या विषयाची काही पुस्तक आहेत. ती घेऊन जा आणि वाच.” दुसऱ्या दिवशी घरी गेले की, त्या विषयाची पाच-सहा महत्त्वाची पुस्तके सरांनी काढून ठेवलेली असतात. पतंगे सर त्या विषयाची चर्चा करताना माझ्यासमोर विविध पैलू उलगडत असतात. मी मध्येच सरांचा काही मुद्दा खोडण्याचा प्रयत्न करते. मात्र, सर त्या मुद्द्याचे समर्थन करताना आणखी १०-१५ मुद्दे उपस्थित करतात. एक वैचारिक मेजवानीच असते. कितीतरी आठवणी, औरंगाबादमध्ये कामानिमित्त गेले असता, तिथे 'सा. विवेक' कार्यालयात नेमके पतंगे सर आणि काकू. सकाळी सकाळी दोघांची चर्चा चाललेली. विषय होता, योगिता आली आहे. औरंगाबादला पारंपरिक आणि सगळ्यात जुने उत्तम उपाहारगृह कुठले? आज तिथे आपण जेवायला जायचे. या चर्चेत सर म्हणाले, “अग ते तिकडे धपाटे मिळतात विसरलीस का?” मग दोघांचे ठरले की, दुपारी त्या सर्वोत्तम उपाहारगृहात जायचे आणि संध्याकाळी काकू मला धपाटे खायला नेणार. दोघांचाही उत्साह जणू त्यांची लेक माहेराला आली असा. सरांचे वागणे असे स्नेहपूर्ण. पण, मी हेही पाहिले आहे, की एखादी महत्त्वाची बैठक असावी, कार्यक्रम असावा आणि कोणातरी मोठा मंत्री किंवा मोठी असामी यावी. व्यासपीठावर असलेले भलेभले लोक त्या नेत्याच्या किंवा असामीच्या पाया पडायला, हात मिळवायला किंवा कटाक्ष झेलायला धावून जातात. मात्र, पतंगे सर आपल्या आसनावर शांतपणे बसलेले. हे असे दृश्य नेहमीचेच. कारण, सरांनी आपल्या पदाचा किंवा आपल्या ओळखीचा उपयोग कधीही स्वतःच्या कुटुंबाची झोळी भरण्यासाठी केला नाही.

 

पुढे २०१७ साली नगरसेवक निवडणुकीसाठी माझे मन चलबिचल होत होते. काय करावे? तिकीट घ्यावे की घेऊ नये, यावर पतंगे सरांशी चर्चा केली. ते म्हणाले, “माणसाला स्वतःची प्रज्ञा असावी. तुला काय करायचे आहे, ते तूच ठरवणार.” मी म्हटले, “सर मला तुम्ही शिफारस पत्र द्याल का?” मला वाटले, दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये मी नोकरी करावी म्हणून सांगणारे सर, मला तिकीट मिळावे म्हणून कशाला लेटर देतील? पण, क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी शिफारस पत्र दिले. मला आश्चर्य वाटले, कारण सरांनी शिफारस करावी, म्हणून अक्षरशः घोळक्यांनी येणाऱ्या राजकारण्यांना सर सरळ सांगतात, ''तो माझा प्रांत नाही.” पण, मला शिफारस पत्र दिले. का? सर म्हणाले, “राजकारणात तुला कारकीर्द करायची आहे ना? आपल्याला काय वाटते ते महत्त्वाचे, आपण कोण आहोत हे आपल्याशिवाय दुसरे कोण चांगले ओळखेल?” त्याक्षणी वाटले की, खरेच मी कोण आहे? नगरसेवक म्हणून गटार मीटर वगैरे वगैरेंची कामं करणं हे माझं ध्येय असू शकतं का? ते शिफारस पत्र तसेच्या तसे सरांना परत दिले. आजही सरांचे वाक्य मार्गदर्शक तत्त्व आहे. आपल्याला काय वाटते ते महत्त्वाचे. आपल्याशिवाय आपल्याला दुसरे कोण चांगले ओळखते? 1असो, सर्वसमावेशक हिंदुत्वाची व्याख्या करताना आपण येशू आणि अल्लाच्या संस्कृतीलाही पचवायची ताकद ठेवली पाहिजे, असे सांगणारे पतंगे सर जितके आक्रमक होताना पाहिले आहेत, तितकेच पाकिस्तानी सुफी संगीत ऐकताना डोळ्यातून अश्रूधारा वाहतानाही पाहिले आहेत. असे का? विचारल्यावर त्यांचे उत्तर होते की,''धर्माच्या नावावर पाकिस्तान वेगळा झाला. पण, पाकिस्तानने कितीही नाकारले तरी भारतीय संस्कृती, भारतीय संगीत आणि त्यातले अध्यात्म आजही तिथे जिवंत आहे. आपले संत करूणेची, मानवतेची शिकवण देतात तीच शिकवण पाकिस्तानमध्येही सुफी संत देतात. ही सांस्कृतिक अखंडता आहे.” अखंड भारताच्या कल्पनेने मन भरून आले.

 

सरांची संवेनशीलता काही नवीन नाही. किंबहुना, एखादी नवीन कल्पना, नवीन विषय असला की सरांचा उत्साह लहान मुलापेक्षाही जास्त असतो. तो विषय समजून घेताना सरांच्या नजरेत बालसुलभ कुतूहल उतरते, एक चमक डोळ्यात आणि चेहऱ्यावरही उतरते. त्या विषयाचे पूर्ण आकलन केल्याशिवाय सर शांत बसूच शकत नाहीत. आपल्याला जो विषय कळला, तो त्या त्या विषयातील लोकांनाही कळावा, यासाठी मग सरांची तयारी सुरू होते. परिसंवाद, अभ्यासवर्ग यातून मग या विषयाचा सहभाग होतो. हे सगळे विषय भविष्यातले ज्वलंत विषय होतात, हे विशेष. कोरेगाव-भीमा घटना घडण्याच्या कितीतरी आधी, 'संविधान हटाव, संविधान बचाव' वगैरेचे वातावरण होण्याच्या अनेक वर्ष आधी, पतंगे सरांनी संविधानावर अभ्यासवर्गच आयोजित केला होता. पुस्तकही लिहिले. याबाबत सर म्हणतात,“आपण समाजाचे अंग आहोत, समाजाचा कल कोणत्या अंगाने जाणार आहे, हे समरसतेच्या कार्यकर्त्याने समजून घ्यायला हवे.” तीच गोष्ट त्यांनी मांडलेल्या बाबासाहेबांच्या विचारांच्या अन्वयार्थाबाबत. पतंगे सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'राष्ट्रपुरुष' म्हणून मांडणे, हे समरस समाजासाठीचे अमृतच आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाबाबतही त्यांचे विचार समाजाला स्वतंत्रपणे विचार करायला लावतच आहेत. प्रत्येक सकारात्मक नवीन गोष्ट, तंत्रज्ञान आत्मसात करून पतंगे सर नेहमी अपडेट असतात. सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात नवी पिढी तयार व्हावी म्हणून ते प्रयत्नशील असतात. त्यामुळेच की काय, कित्येकांना ते या ना त्या व्यासपीठावर संधीही देतात. पतंगे सरांना विचारले की, “सर तुमचे गुरू कोण?” तर ते म्हणतात, “सत्या असत्या मन केले ग्वाही, नाही जुमानले बहुमता' हे तुकाराम महाराजांचे वचन आहे. ते वचनच माझे दिशादर्शक आहे. तुकाराम महाराजांच्या वचनाचा आदर्श जागवताना ते वैचारिकदृष्ट्या सक्षम होऊ पाहणाऱ्या आजच्या आणि उद्याच्या नेतृत्वाचे, कर्तृत्वाचे पालकच आहेत.

@@AUTHORINFO_V1@@