सुषमा स्वराज यांचे निधन, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |




नवी दिल्ली : देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे अकाली जाण्याने अवघा देश दुःखात बुडाला आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी कळताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.


सुषमा स्वराज यांच्या निधनाने प्रचंड दु:ख झाले. देशाने आपली लाडकी लेक गमावली आहे. धाडस आणि निष्ठेचे त्या मूर्तीमंत उदाहरण होत्या. लोकांच्या मदतीसाठी त्या नेहमीच तत्पर असायच्या. त्यांची सेवा आणि योगदान देश कदापी विसरणार नाही, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरांजली अर्पण केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातले एक तेजोमय पर्व हरपले असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने फार मोठे नुकसान झाले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी देशासाठी जे केले ते नेहमीच लक्षात राहील. दुःखाच्या या क्षणात मी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर असल्याचेही ते म्हणाले.


सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनाने मी अत्यंत दुखी झालो आहे. एक प्रखर वक्ता, आदर्श कार्यकर्ता, लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि एक कर्मठ मंत्री अशी विविध रूपे देशाने पहिले आहेत. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट केली. सुषमा स्वराज यांच्याकडून मला मोठ्या बहिणीचे प्रेम मिळाले अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सुषमा स्वराज या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील लोकप्रिय राष्ट्रीय महिला नेत्यांपैकी एक होत्या. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत धारण केलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या प्रतिभेची मोहर उठवली. त्या कुशल संघटक होत्या व अनेक राजकीय आंदोलनांमध्ये माझ्या पाठीशी कणखरपणे उभ्या राहिल्या. सुषमाजी उत्तम वक्त्या होत्या.त्यांच्या निधंनामुळे देशाने करिश्मा लाभलेल्या राष्ट्रीय नेत्या तसेच उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली. त्यांची भाषणे पाहून मी मोठा होत गेलो आणि त्या आजही आमच्यासाठी प्रेरणादायीच होत्या. माझ्या प्रत्येक इलेक्शन कॅम्पेनला त्या जातीने लक्ष घालायच्या. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@