अटलजींच्या प्रभावळीतील तेजपुंज तारा निखळला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |



सुषमाजींच्या जाण्याने प्रत्येकाला आपले जवळचे कुणीतरी गेल्यासारखे का वाटतंय, त्याचं उत्तर अनेक प्रसंगांमध्ये दडलंय. विलक्षण तेजस्वी डोळे आणि तसेच मनाला भिडणारे धारदार शब्द... लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदावर असतानाची त्यांची कामगिरी आणि योगदान कोण विसरेल? त्यांच्या जाण्याने अटलजींच्या प्रभावळीतील आणखी एक तेजपुंज तारा निखळला आहे...


सुषमाजी स्वराज यांच्या निधनाने अटलजींच्या प्रभावळीतील आणखी एक तेजपुंज तारा निखळला आहे. संसदीय लोकशाहीतील अनेक विक्रम नोंदवून सुषमाजींनी तशी लवकरच म्हणजे ६७व्या वर्षी घेतलेली 'एक्झिट' केवळ भारतीयांनाच नव्हे, तर भारताबाहेरील अनेकांना चटका लावून जाणारी ठरली. सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, राष्ट्रीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या, इंदिराजीनंतरच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री अशी विक्रमांची यादी मोठी आहे. देश-परदेशातील भारतीयांच्या मदतीसाठी २४ x ७ उपलब्ध असलेली परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणून त्यांनी मोदी सरकार (१) मध्ये संपादन केलेला लौकिक आणि आपत्तीत सापडलेल्यांना, भारतात उपचारासाठी येऊ इच्छिणाऱ्यांना केलेली मदत सर्वांच्या सदैव स्मरणात राहील. कर्तृत्वान आणि उत्तुंग असणारे नेतृत्व नेहमी जमिनीशी आणि जमिनीवर असणाऱ्यांशी घट्ट नाते जोडून ठेवणारे तसेच स्वभावाने साधेसरळ असते, असे सांगितले जाते. सुषमाजींच्या संपर्कात आलेल्यांना याची प्रचिती नेहमी येत राहिली. विदेश अभ्यास दौऱ्यावर जाणारे सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ अनेकदा दिल्लीहून मुंबईला येते व मुंबईमार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विदेशाकडे रवाना होते. अशा शिष्टमंडळाच्या मुंबईतील अल्पवास्तव्य काळात लोकसभा सचिवालय आणि विधानमंडळ सचिवालय यांच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभाग, राजशिष्टाचार विभागातर्फे यावेळी स्वागत, निरोप, वाहन आदी व्यवस्था बघितल्या जातात.

 

सुषमाजी सन २००७ साली खासदार असताना असेच एक शिष्टमंडळ त्यांच्यासह मुंबईमार्गे रवाना होत असतानाचा हा प्रसंग. आदल्या दिवशी वाहन व विमानतळानजीकच्या हॉटेल बुकिंगबाबतच्या व्यवस्थांचा आढावा घेत असताना काही कामासंदर्भात नाशिकहून माजी विधानपरिषद सदस्या डॉ. निशिगंधाताई मोगल यांचा फोन आला. मोगलकाकू आणि त्यांचे यजमान राजाभाऊंशी आई-वडिलांमुळे माझे पारिवारिक स्नेहसंबंध. त्यांना सुषमाजींच्या दौऱ्याविषयी सांगितले. "अरे वा, उद्या त्यांना दौऱ्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा सांगा. आम्ही महिला आघाडीत एकत्र काम केले आहे. शक्य झाले तर फोन जोडून दे." यावर मोगलकाकूंना मी नुसतं 'बरं' म्हटले. दुसऱ्या दिवशी दिल्लीहून शिष्टमंडळला घेऊन येणारे विमान वेळेत आले. जवळच्याच हॉटेलमध्ये भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेलबाहेर गाड्यांचा ताफा तयार होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या दहा मिनिटांवर होते. पुरेसा वेळ असल्याने मी त्यांच्याकडे जाऊन म्हणालो, "मॅडम, नाशिकसे निशिगंधाजी मोगल आपसे बात करना चाहती हैं, यदि आपकी इजाजत है तो बात करवा दूँ?" त्यावर त्या इतक्या सहजतेने म्हणाल्या की, ''अरे इजाजत क्यों नही होंगी । बात करवा दो..." मोगल काकूंशी माझ्या मोबाईलवर संपर्क साधत तो सुषमाजींकडे दिला. त्यांचे उत्स्फूर्तपणे पहिले वाक्य होते, ''अरे निशिगंधा आप कैसी हो..." त्यानंतर सुमारे पाच ते सात मिनिटे त्यांचे अगदी मनमोकळे बोलणे झाले. केंद्रीय मंत्रिपद भूषविलेली आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवित असलेली एक महिला नेता पक्षसंघटनेतल्या आपल्या सहकाऱ्याशी किती सहजसुंदर आणि तितकाच आत्मीयतेचा संवाद साधू शकते, याचे त्यावेळी सर्वांना प्रत्यंतर आले.

 

आणीबाणीविरोधी आंदोलनात गाजलेल्या 'बडोदा डायनामाईट' प्रकरणात जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह अटक झालेल्यांमध्ये नाशिकचे समाजवादीसाथी सुरेश वैद्य हेही होते. या अटकेमुळे ते पोलीस सेवेतून बडतर्फ झाले. त्यानंतर दै. 'देशदूत'मध्ये ते उपसंपादकाची नोकरी करीत असताना माझा त्यांच्याशी संपर्क झाला. जॉर्ज यांच्यासह 'बडोदा डायनामाईट' खटल्यातील सर्वांचे वकिलपत्र स्वराज कौशल आणि सुषमा स्वराज यांनी कोणतेही शुल्क न स्वीकारता घेतले. सर्वांची निर्दोष मुक्तता होईपर्यंत हा खटला नेटाने लढविला. नागरिकांच्या 'राइट टू रिबेल' हक्कासंदर्भातील स्वराज यांचा युक्तीवाद त्यानंतर सर्वांची झालेली निर्दोष मुक्तता यांना या 'दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्या'च्या इतिहासात अत्यंत महत्त्व आहे. सुरेश वैद्य, सुषमाजींचा विषय निघाल्यावर,ज्या त्वेषाने उभयतांनी ही केस आमच्यावतीने लढविली त्याबाबत अनेक आठवणी सांगत भरभरून बोलायचे. हा मजकूर लिहीत असताना भेट झालेल्या नगरविकास राज्यमंत्री योगेशजी सागर यांनीही सुषमाजींच्या वागण्यातील साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठेला उजाळा देणाऱ्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या मतदारसंघातील एक वयस्कर दाम्पत्य तुर्कस्तानच्या भेटीवर असताना त्यांचे पैसे, पासपोर्ट, बँकांचे कार्ड सर्व गहाळ झाले. अत्यंत असहाय अवस्थेत असताना त्यांना कोणीतरी सांगितले की, "तुम्ही सुषमाजींना ट्विट करून ही माहिती कळवा." त्यांनी तसे केले आणि तेथील भारतीय दूतावास गाठले. अवघ्या दीड-दोन तासांत सुषमाजींनी सर्व प्रशासकीय यंत्रणा हलवून त्यांना तातडीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. दाम्पत्याचे खाते असलेल्या भारतातील बँकेशी संपर्क साधून त्यांना तातडीने आवश्यक ते पैसे विनाविलंब उपलब्ध करून दिले. सुषमाजींच्या जाण्याने प्रत्येकाला आपले जवळचे कुणीतरी गेल्यासारखे का वाटतंय त्याचं उत्तर अशा अनेक प्रसंगांमध्ये दडलंय. अटलजींचे भाषण ऐकताना ते संपूच नये, असं वाटतं. सुषमाजींच्या बाबतीतही हे विधान लागू होतं. विलक्षण तेजस्वी डोळे आणि तसेच मनाला भिडणारे धारदार शब्द... लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदावर असतानाची त्यांची कामगिरी आणि योगदान कोण विसरेल? त्यांच्या जाण्याने अटलजींच्या प्रभावळीतील आणखी एक तेजपुंज तारा निखळला आहे. जनतेचे मत मिळेल अथवा न मिळेल, आपण जनतेचे मन जिंकले पाहिजे, हा अटलजींनी दिलेला विचार जगलेल्या सुषमा स्वराज यांना भावपूर्ण आदरांजली.


- निलेश मदाने

 
 
@@AUTHORINFO_V1@@