सर्वात लोकप्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019   
Total Views |



सध्याच्या सरकारमध्येही मंत्रिपद स्वीकारणे सुषमाजींना शक्य होते. पण, परराष्ट्र विभागाचे २४ x ७ काम करण्यासाठी शरीर साथ देत नाही, हे ओळखून त्यांनी सन्मानपूर्वक वाट मोकळी करून दिली. त्यामुळे सुषमाजींना शपथविधी सोहळ्याला पाहुण्यांमध्ये बसलेले पाहून अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांची तब्येत लवकरच सुधारेल आणि त्यांना पुन्हा संसदेत भाषण करताना पाहता येईल, असे वाटत होते. पण ती फोल ठरली.


भारताच्या सर्वात लोकप्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे परराष्ट्र विभागाला मानवी चेहरा देणाऱ्या मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांना लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील. १९७७ सालापासून सक्रिय राजकारणात असलेल्या सुषमाजी त्यांच्या तेजस्वी रूप आणि ओजस्वी भाषेमुळे कोणावरही छाप पाडायच्या. आघाडीवर राहून नेतृत्व करायची सवय त्यांच्यात तरुण वयापासून होती. असे करताना आलेले अपयश पचवून नव्याने पुन्हा उभे राहण्याची जिद्दही त्यांच्याकडे होती. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी हरियाणा सरकारमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर आपल्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत सुषमाजींनी अनेक विक्रम तोडले. २०१४ साली परराष्ट्र व्यवहार मंत्रिपदाने मात्र त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली. अटल बिहारी वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या काळापासून परराष्ट्र संबंधांची सूत्रं पंतप्रधान कार्यालयाकडे येऊ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान देशाच्या परराष्ट्र संबंधांचा चेहरा बनले. त्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांच्या कामाला मिळणारी प्रसिद्धी कमी होत असली तरी या पदाचे महत्त्व वाढले होते. त्यासाठीच मोदींनी सुषमाजींची या पदावर नेमणूक केली. त्यांच्या मंत्रिपदी बसण्यानेच खरंतर इतिहास घडला. कारण, स्वातंत्र्यानंतर सात दशकांच्या इतिहासात आजवर कधीही परराष्ट्र खाते एका महिलेने स्वतंत्रपणे हाताळले नव्हते.

 

१३० कोटींहून जास्त लोकसंख्या असलेल्या भारताचे परराष्ट्र मंत्रालय आकाराने खूप लहान आहे. सुमारे ६०० राजनयिक अधिकारी असलेले हे मंत्रालय जगभरातील १६२ हून अधिक भारतीय दूतावास, वाणिज्य दूतावास, सांस्कृतिक केंद्रे आणि दिल्लीतील साऊथ ब्लॉकचा गाडा हाकतात. त्यात दरवर्षी १०-१५ अधिकाऱ्यांची भर पडते. या कमतरतेवर मात करण्यासाठी मोदी सरकारने भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुमारे ३ कोटी प्रवासी भारतीयांना आणि भारतीय वंशाच्या लोकांना, काम आणि पर्यटनाच्या निमित्ताने देशाबाहेर प्रवास करणाऱ्या ५ कोटींहून अधिक भारतीयांना, दरवर्षी परदेशात शिकायला जाणाऱ्या ७.५ लाख विद्यार्थ्यांना आणि ‘डिजिटल डिप्लोमसी’ म्हणजेच इंटरनेट आणि समाजमाध्यमांना खूप महत्त्व दिले. नरेंद्र मोदींचे मॅरेथॉन परदेश दौरे सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाले. पण, त्यांची पूर्वतयारी करण्याची जबाबदारी सुषमाजींवर होती. नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत पुनरावृत्ती धरून ९३ देशांना भेटी दिल्या. त्या तुलनेत सुषमा स्वराज यांनी कमी, म्हणजे ७९ देशांना भेटी दिल्या असल्या तरी त्यांनी पंतप्रधानांच्या भेटींचा पाया रचला. मग ती २७-२८ एप्रिल, २०१८ दरम्यान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक भेटीची तयारी करण्यासाठी आठवडाभर आधी चीनला दिलेली भेट असो वा मोदींच्या २५ डिसेंबर, २०१५ रोजी पाकिस्तान भेटीच्या पूर्वी इस्लामाबादला दिलेली भेट... मोदींच्या बैठकींतील चर्चेचा अजेंडा निश्चित करण्यात सुषमाजींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळात प्रवासी भारतीय मंत्रालयाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात विलीन करून टाकले. या दोन मंत्रिविभागांचा खाक्या एकमेकांच्या विरुद्ध असतो. जगभरात सर्वत्र ‘परराष्ट्र मंत्रालय’ हे त्याच्या सनातनी दृष्टिकोनाबद्दल ओळखले जाते. राजशिष्टाचाराला अवास्तव महत्त्व दिल्याने परराष्ट्र विभागाच्या कामात सामान्य लोकांबाबत एका प्रकारची असंवेदनशीलता दिसून येते. याउलट प्रवासी भारतीय मंत्रालयाचे कामच म्हणजे परदेशात स्थित भारतीयांशी जोडले जाऊन, भारताची सौम्य शक्ती (सॉफ्ट पॉवर) विकसित करणे. या भिन्न प्रकृतीच्या, पण एकत्रिकरण केलेल्या मंत्रालयांना सुषमाजींनी कौशल्याने हाताळले. परदेशातील भारतीय दूतावास हा तेथील भारतीय लोकांना घराप्रमाणे वाटला पाहिजे, आपल्या कोणत्याही अडचणी घेऊन ते तिथे आल्यास किमान त्या ऐकून घेणारा कोणीतरी तिथे पाहिजे, हे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी ‘डिप्लोमसी’ला ‘ट्विप्लोमसी’ची जोड दिली. ट्विटरद्वारे येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंधित दूतावासांना किंवा अधिकाऱ्यांना कामाला लावण्याचा प्रघात पाडला. अनेकदा रात्री दोन किंवा तीन वाजता सुषमाजींनी आलेल्या ट्विटला उत्तर देऊन लोकांना भारतीय दूतावासांतील संबंधित अधिकाऱ्यांशी जोडले. कोणाचा पासपोर्ट हरवलेला, त्याला तातडीने पासपोर्ट मिळाला. कोणी फसवणूक झाल्याने परदेशात अडकून पडला होता, त्याला परराष्ट्र मंत्रालयाने पुढाकार घेऊन सोडवण्यात आले. व्हिसासंबंधित प्रश्न असो वा नैसर्गिक संकटं, सुषमा स्वराज यांच्या नेतृत्त्वाखाली परराष्ट्र विभाग तत्परतेने धावून जाताना दिसला. त्यात वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या, पण राजकीय तणावांचा फटका बसलेल्या पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश होता. त्यांना तत्परतेने व्हिसा देण्याच्या सुषमाजींच्या निर्णयावर टीकाही झाली. त्यांना शेलकेपणाने ‘व्हिसामाता’ म्हणूनही संबोधले गेले. पण, भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावग्रस्त असतानाही भारत जबाबदारीने आणि मानवतेच्या भावनेने वागतो, हे त्यांनी दाखवून दिले. हे चित्र, पहिल्या आखाती युद्धातील सत्यघटनेवर आधारित ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात परराष्ट्र विभागाच्या दिसलेल्या चित्रापेक्षा फार वेगळे होते. सुषमा स्वराज एका मुलाखतीदरम्यान गमतीने म्हणाल्या होत्या की, “मी झोपत नाही आणि इतरांना झोपू देत नाही.” हे खरे आहे की, गेल्या पाच वर्षांत देशोदेशींच्या भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांना फोन उशाशी ठेवून झोपावे लागले. साहजिकच सुषमा स्वराज अल्पावधीत ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय परराष्ट्र मंत्री झाल्या.


सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अस्खलित हिंदीमध्ये भाषण करून भारताची बाजू मांडतानाच पाकिस्तानला पूर्णपणे उघडे पाडले. काश्मीरमधील तथाकथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाची एवढी चाड असेल तर बलुचिस्तानमधील मानवाधिकारांच्या पायमल्लीचे काय? असा सवाल करून पहिल्यांदाच बलुचिस्तानचा विषय संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांपुढे मांडला. दुसरीकडे भारत पाकिस्तानकडून दहशतवादाचा त्रास सहन करत असला तरी मानवी विकासाच्या विविध निर्देशांकांत आणि चिरस्थायी विकासाच्या दृष्टीने भारत आणि पंतप्रधान मोदींचे सरकार कशाप्रकारे वाटचाल करत आहे, याची जंत्रीच सादर केली. नवाझ शरीफ यांच्या भाषणाला मिळालेला सुमार प्रतिसाद आणि सुषमा स्वराज यांच्या भाषणादरम्यान झालेला टाळ्यांचा कडकडाट जग कोणाला गांभीर्याने घेत आहे, हे स्पष्ट करून गेले. या वर्षी बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईकनंतर अवघ्या दोन दिवसांनी संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे सुषमाजींनी इस्लामिक सहकार्य परिषदेच्या बैठकीत विशेष अतिथी म्हणून सहभागी होत असलेल्या भारताचे प्रतिनिधित्व केले. संस्थेच्या ५० वर्षांच्या इतिहासात भारताला पहिल्यांदाच मान मिळत होता. सर्जिकल स्ट्राईकमुळे जळफळाट होत असलेल्या पाकिस्तानने सुषमाजींना बोलावले जाऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. पण, ते फोल ठरले. मध्यरात्री अबुधाबीला पोहोचल्यानंतर सुषमाजींनी परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आपल्या भाषणाच्या मसुद्यावर चर्चा केली. परिषदेत भारताचे इस्लामशी असलेले नाते सांगताना दहशतवादावर प्रहार केला आणि सर्वांची वाहव्वा मिळवली.

 

सुषमाजींच्या परराष्ट्र मंत्री म्हणून कारकिर्दीत येमेन, लिबिया, इराक, सीरिया आणि युक्रेनमध्ये राजकीय संकटात अडकलेले भारतीय असो, अथवा सौदी अरेबियात आर्थिक संकटामुळे बेरोजगार झालेले भारतीय किंवा मग अमेरिकेत ‘इर्मा’ वादळाचा तडाखा बसलेले प्रवासी भारतीय, सर्वांना तत्परतेने मदत पोहोचविण्यात आली. भारताच्या राजनयिक अधिकाऱ्यांचे वार्षिक प्रशिक्षण, त्यात राज्यांना भेटी देऊन तेथील विकास प्रकल्प, परदेशी गुंतवणूक इ. मुद्द्यांचा समावेश, प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने भारताच्या सांस्कृतिक विविधतेची परदेशस्थित तरुण पिढीला ओळख करून देणे असो, सुषमा स्वराज यांची छाप परराष्ट्र मंत्रालयावर पडली. या सरकारमध्येही मंत्रिपद स्वीकारणे सुषमाजींना शक्य होते. पण, परराष्ट्र विभागाचे २४ x ७ काम करण्यासाठी शरीर साथ देत नाही, हे ओळखून त्यांनी सन्मानपूर्वक वाट मोकळी करून दिली. त्यामुळे सुषमाजींना शपथविधी सोहळ्याला पाहुण्यांमध्ये बसलेले पाहून अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांची तब्येत लवकरच सुधारेल आणि त्यांना पुन्हा संसदेत भाषण करताना पाहता येईल, असे वाटत होते. पण ती फोल ठरली. सुषमाजींच्या रूपाने देशासाठी आयुष्य वेचलेली, झुंजार पण तितक्याच विशाल हृदयाची भारतमातेची तेजस्वी कन्या आपल्याला सोडून गेली आहे. सुषमाजींना माझी विनम्र श्रद्धांजली!

@@AUTHORINFO_V1@@