फूल भी थी, चिंगारी भी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 


भाजयुमोच्या अध्यक्ष खा. पूनम महाजन यांच्यासाठी घरात त्यांचे वडील प्रमोद महाजन आदर्शस्थानी होतेच, पण एक महिला म्हणून सुषमाजींचा आदर्श सदैव डोळ्यासमोर होता. तेव्हा, प्रमोदजींच्या समकालीन असलेल्या सुषमाजींनाही अगदी जवळून पाहिलेल्या पूनम महाजन यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या या भावना...

 
 

सुषमाजी आज आपल्यात नाहीत. स्त्रीने तिचे स्त्रीत्व जपत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करून दाखवण्याचे कसब बाळगावे, याचा आग्रह धरणारी एक विद्युल्लता आज कायमची लोपली. संस्कृतसहित विविध भाषांतून अस्खलित भाषणे करत भारतीय भाषांचा अभिमान जगासमोर ठेवणारा एक आवाज मूक झाला. भारतातील प्रत्येक महिला राजकारणी राजकारणात प्रवेश करताना दोन महिलांपैकी एकीचा आदर्श ठेवते. एक इंदिरा गांधी बनण्याचा अथवा सुषमा स्वराज यांचा. घरातून कोणीही राजकारणात नसताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात करून हरियाणामध्ये सर्वात तरुण मंत्री बनण्याचा मान मिळवत दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ते देशाच्या सर्वात यशस्वी परराष्ट्रमंत्रिपदापर्यंतचा सुषमाजींचा प्रवास कोणालाही भुरळ घालेल असाच होता. सुस्पष्ट विचार, विचारसरणीप्रति निष्ठा, विशिष्ट पेहराव, विलक्षण स्वकर्तृत्व, स्वतःची वेगळी भाषाशैली, सगळ्याच पक्षांतील लोकांशी राजकारणापलीकडचे सौहार्दपूर्ण संबंध, असलेली जबाबदारी अविरतपणे काम करत निष्ठेने पार पाडण्याची सवय, पक्षातील कार्यकर्ते आणि पुढे येऊ पाहत असलेले युवा नेतृत्व यांच्याप्रति असलेली मातृत्वाची माया... सारेच कसे आदर्शवत. माझ्यासाठी जरी घरातून माझे बाबा आदर्श आहेतच, तरी एक महिला म्हणून माझ्यासमोर बाबांबरोबरच सुषमाजींचादेखील आदर्श आहे. सुषमाजींची शारीरिक उंची कमी असल्याने त्या भाषणाला उभ्या राहण्यापूर्वी त्यांना उभे राहण्यासाठी एक स्टूल ठेवले जात असे. त्या स्टूलवर उभ्या राहून सुषमाजी भाषणाची उंची गाठत. माझी उंचीही कमी आहे. माझ्यासाठीही बऱ्याच वेळा स्टूल ठेवले जाते. भाषण करण्यापूर्वी मला बाबांचे स्मरण करण्याची सवय आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याचा विश्वास मला असतोच. आता स्टूल पाहिल्यावर आपोआपच सुषमाजींचे स्मरण होईल आणि त्यांचा आशीर्वादही नक्कीच मिळेल.

 

भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात आमचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीजी यांनी देशभरातून काही तरुण कार्यकर्त्यांना आपल्या छत्रछायेत घेऊन दुसऱ्या फळीतील नेते म्हणून पुढे आणले. बाबांबरोबरच सुषमाजी या तरुणांमध्ये होत्या. समवयस्क समकालीन असल्याने त्यांच्यात स्पर्धा स्वाभाविक होती. लहान असताना मी पाहिले, या समवयस्क नेत्यांमध्ये स्पर्धा होती, कदाचित थोडाबहुत मत्सरही होता. पण, एकमेकांचा द्वेष नव्हता. एकमेकांविषयी वैरभाव नव्हता. आपापल्या मार्गाने एकाच ध्येयप्राप्तीसाठी झपाटलेले हे सगळे नेते होते. एक छोटे उदाहरण सांगायचे तर अटलजींच्या रालोआ सरकारच्या काळात बाबांना पक्षातील जबादारी सांभाळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याकडे असलेले दूरसंचार खाते सुषमाजींना दिले जात होते. पण, सुषमाजींनी असे केल्यास प्रमोदजींना वाईट वाटेल, या कारणाने ते खाते स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. काही काळाने बाबांना जेव्हा हे समजले, त्यावेळी ते जाहीरपणे म्हणाले होते की, "अनेकांना दूरसंचार खाते हवे असते, पण सुषमाजींनी मला वाईट वाटेल म्हणून ते नाकारले." त्यांनी ते खाते स्वीकारले असते तर मला वाईट वाटले नसते. २००४च्या रालोआ पराभवाची जबाबदारी बाबांनी स्वीकारली, त्यावेळी सर्वांनीच ‘इंडिया शायनिंग’ प्रचार मोहिमेसाठी बाबांना जबाबदार धरले. या कॅम्पेनशी प्रमोदजींचा कोणताही संबंध नाही, हे स्पष्टपणे बोलणाऱ्या सुषमाजीच!

 

भाजपची ही दुसरी फळी अटलजींचा कित्ता गिरवत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभा गाजवे. संसदेमध्येही आपला ठसा उमटवत असे. प्रत्येक जण आपले वेगळेपण जपून आपापली छाप भारतीय राजकारणावर पाडत होते. सुषमाजींनी बेल्लारी येथे सोनिया गांधींविरुद्ध उभे असताना समोर कोणताही कागद न ठेवता केलेली कन्नड भाषेतील भाषणे कोणीही विसरणार नाहीत. संस्कृत भाषेचे महत्त्व पटवून देणारे भाषण असो किंवा संसदेमधील विविध विषयांना वाचा फोडणारी त्यांची भाषणे असोत, आजही युट्युबवर मोठ्या संख्येने पाहिली जातात. २००९ ते २०१४ या काळात लोकसभा विरोधी पक्ष नेता या नात्याने त्यांनी केलेल्या कामगिरीचा काँग्रेसचे खच्चीकरण करण्यात मोठा वाटा होता. २०१४च्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालय सुषमाजींनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ट्विटरसारख्या समाजमाध्यमावरून केलेल्या अर्जाचीही दाखल घेत परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना त्यांनी यशस्वीपणे भारतात परत आणले. तेही शांतपणे. कोणताही गाजावाजा न करता. ‘इसिस’च्या तडाख्यात सापडलेल्या कुवेत, येमेनसारख्या आखाती देशांतून अडकलेले भारतीय नागरिक यशस्वीपणे भारतात आणतेवेळी त्यांनी वापरलेले कौशल्य कोणीही विसरणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालय कधीच लोकांशी जोडलेले नसायचे. सुषमाजींनी केलेल्या अथक कामामुळे पहिल्यांदाच हे मंत्रालय ही लोकांचे मंत्रालय आहे, हे त्यांनी दाखवून दिले. लोकांच्या परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचे नाव कायम घेतले जाईल. आज त्यांच्या जाण्याने भाजपमधील असंख्य कार्यकर्त्यांनी आपली प्रेमळ, पण शिस्तप्रिय माता गमावली आहे. एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दुसऱ्या सुषमाजी होणे नाही...

 

- खा. पूनम महाजन

(लेखिका भाजयुमोच्या अध्यक्ष आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@