जिहाद आणि देवबंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 


माजी केंद्रीय मंत्री आणि तलाकच्या संदर्भात राजीव गांधी मंत्रिमंडळातून बाणेदारपणे राजीनामा देणारे अरिफ म. खान यांच्या मुलाखतीचे वृत्त दै. 'मुंबई तरुण भारत'च्या दि २६ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यांनी 'देवबंद' या इस्लामी जगात नावाजलेल्या 'दारूल उलूम देवबंद' या संस्थेत अभ्यासले जाणारे 'अश्रफ अल हिदाया' हे पुस्तक, त्यातून कशाप्रकारे 'जिहाद'विषयक शिकवणूक तेथे शिकणाऱ्या व पुढे जाऊन मौलवी होऊन धार्मिक प्रवचने देणाऱ्या विद्यार्थ्यांवर ठसविली जाते, याची माहिती दिली होती. त्या 'देवबंद' संस्थेत पसरविल्या जाणाऱ्या काही अतिरेकी विचारांबाबत माझे स्वतःचे अनुभव नमूद करण्यासारखे आहेत.


 

माझ्या 'देवबंद'ला भेटी

 

इस्लाम धर्म आणि संस्कृतीच्या प्रचार, प्रसारासाठी प्रसिद्ध असलेल्या 'दारुल उलूम देवबंद' या संस्थेला मी दोन वेळा स्वतः भेट दिली आहे. एका भेटी दरम्यान माझी पत्नीही माझ्यासोबत होती. तेथे भारताचा इतिहास आणि अनेक घटना या एकतर्फी शिकविल्या जातात. अनेक किस्से या दोन भेटींदरम्यान घडले. त्यापैकी केवळ एक देतो. आमच्या बोलण्यात १८५७च्या स्वातंत्र्यसमराचा विषय विद्यार्थ्यांबरोबर निघाला. त्यांनी सांगितले की, ती लढाई-जंग तर मुसलमान इंग्रजांविरोधात लढले होते. मी त्यांना नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी इ. बाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, तसे काही नव्हते. नंतर मी त्यांच्या संपर्क अधिकाऱ्याकडे तोच विषय काढला, तेव्हा त्याने फक्त बहादुरशहा जफर हाच लढला, बाकी कोणीच नव्हते, असे ठोकून दिले. मी त्यांच्या पुढे वरील तिन्ही नावे घेतली. तेव्हा अधिकारी महाशयांनीही ते कोणी यात नव्हते, असे छातीठोकपणे सांगितले. एवढेच नव्हे, तर 'तुम्हालाच काही माहिती नाही' असा शेरा मारला. मी त्याला सुनावले की, "इस मरहट्टे को ये जानकारी नहीं ये आप कैसे कह सकते हों?" एकंदर पाहता, भारताचा इतिहास आणि महापुरुषांच्या संदर्भात तेथील विद्यार्थ्यांना काय आणि कसे शिकविले जात असेल, याची कल्पना यावी.

 

मुखपत्र 'इस्टर्न क्रिसेंट'

 

'दारुल उलूम'तर्फे चालविले जाणारे आणि प्रामुख्याने आसाममधील AIUAFचा सर्वेसर्वा असलेल्या मौ. बद्रुद्दीन अजमलच्या आर्थिक मदतीवर चालणारे 'इस्टर्न क्रिसेंट' (Eastern Crescent) हे इंग्रजी मासिक 'दारुल उलूम'चे मुखपत्र आहे. तेथे कोणते विचार प्रवाह आहेत हे जाणण्यासाठी मी काही वर्षे 'इस्टर्न क्रिसेंट' आणि 'मिल्ली गॅझेट' अशी दोन्ही मासिके लावली होती. त्याचप्रमाणे 'दारूल उलूम'मधील काही मौलवी-शिक्षकांच्या बरोबर पत्रव्यवहार आणि दूरभाष संपर्कात मी होतो. 'इस्टर्न क्रिसेंट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांवर मी माझ्या प्रतिक्रिया पाठवित असे. त्यातील काही त्यांनी त्या पत्रव्यवहाराच्या जागेत सामावत नाहीत, हे कारण देऊन छापल्या नाहीत. दोन-तीन वेळा संक्षिप्त करून छापल्यावर खाली संपादकाचे टिपण छापले. त्या चार-पाच वर्षांत पत्रव्यवहार छापला जाणारा मी एकुलता एक (गैरसुन्नी) हिंदू होतो. 'इस्टर्न क्रिसेंट'मध्ये इस्लाम धर्म आणि समाज या संदर्भात इंग्रजीतून लेख आणि लेखमाला असतात. त्यापैकी एक लेखमाला 'स्प्रेड ऑफ इस्लाम' अनेक वर्ष चालू होती. मी बंद केल्यानंतर कदाचित आताही चालू असावी. ती लेखमाला म्हणजे इतिहास आणि धर्म यांची सांगड घातलेल्या प्रचारकी लिखाणाचा नमुना असे. अर्थात, इस्लाममध्ये धर्म-इतिहास आणि राजकारण यांच्याशिवाय पर्याय नाही.

 

नव्या धर्मश्रद्धा

 

याच मासिकाच्या नोव्हेंबर २०१५च्या अंकात पृष्ठ क्र. ३१-३६ असा मोठा लेख 'The War on Islam and Islamophoia' छापून आला. लेखकाचे नाव डॉ. फिरोज महबूब कमाल होते. त्यात नेहमीप्रमाणेच मुस्लिमांवर पाश्चात्य देश कसा अन्याय करतात, तसेच ज्या मुस्लीम राज्यकर्त्यांना नैतिकता (विरोधी) रोग झाला आहे, (Moral disease) त्यांची यादी दिली आहे. इजिप्तचा सर्वेसर्वा अब्दुल फताह सिसी, जॉर्डनचा राजा अब्दुल्ला आणि आखाती देशातील छोटे-मोठे हुकूमशाहा यांचा समावेश होता. कारण, ते सुन्नी मुस्लीम आणि इस्लामी ब्रदरहूडला दडपून टाकत होते. तो एक वेगळा विषय आहे. त्या लेखात डॉ. फिरोज याने दोन बॉम्ब गोळे टाकले होते. पहिला बॉम्ब गोळा म्हणजे 'कुराण शरीफ'मधील यहुदी लोकांच्या संदर्भात आलेल्या काही आयतांच्या भाषांतरात (सुरा अल माइदा, ४४-४५ व ४७) शरियाचा उल्लेख करून ते न पाळणारे काफीर आहेत, असे चुकीचे भाषांतर दिले होते. पै. महंमदांच्यानंतर कितीतरी दशकांनी मुस्लीम न्याय व्यवस्था 'शरिया' अस्तित्वात आली. या भाषांतराप्रमाणे 'शरिया' यहुदी प्रेषितांच्या काळातच अंमलात येत होती, असा गैरसमज वाचणाऱ्याचा होऊ शकत होता. दुसरे विधान प्रक्षोभकच होते. इस्लामचे श्रद्धा, नमाज, जकात, रोझा आणि हज हे पाच मूलभूत आधारस्तंभ आहेत. येथे नमूद केले पाहिजे की, त्यात जिहाद-धर्मयुद्धाचा समावेश नाही. या पाच गोष्टींचा मुसलमानांनी त्याग करून गैर मुस्लिमांविरोधात उभे राहण्यासाठी नवे पाच धर्माधार अंगीकारले पाहिजेत, असे डॉ. फिरोज याने लेखात दिले होते. ते पाच आधार- शरिया (इस्लामी कायदा), हुदूद (शिक्षा-दंड पद्धती), खलिफा, शूरा (सर्व टोळी प्रमुखांची बैठक) आणि जिहाद होते. इस्लाममध्ये मूलभूत गोष्टीत, कुराण शरीफ मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल सुचविणे, करणे धर्मनिंदा (Blasphemy) ठरते. तिथे उलट-सुलट भाषांतर देऊन, मूलभूत आधारस्तंभ असलेल्या गोष्टी बदलणे यासाठी देहदंड-शिरच्छेदाचीच शिक्षा दिली जाणे इस्लामनुसार योग्य ठरले असते. असे धर्मबाह्य कृत्य असणारा लेख 'इस्टर्न क्रिसेंट'ने छापला कसा, तर त्यात जिहादला पहिल्या पाचांमध्ये समाविष्ट केले होते, जे परंपरागत धर्मसंमत नव्हते. त्याला पार्श्वभूमी २०१४ ते २०१७च्या दरम्यान, 'इसिस'च्या बगदादीने खिलाफत स्थापून जे क्रौर्य आणि जिहादींचा धुमाकूळ घातला होता त्याची होती. त्यावेळी बगदादीनेजगाला व्यापणारी, शरियावर चालणारी 'खिलाफत' स्थापन करण्याचे आवाहन सर्व जगातील मुस्लिमांना दिले होते. त्याच्या जिहादच्या आवाहनाला प्रतिसाददेत अनेक देशातील भारलेले (radicalized) तरुण त्याच्या बाजूने अतिरेकी हिंसाचार करत लढत होते. भारतातूनही तुरळत तरुण 'इसिस'च्या 'खिलाफती'ला जाऊन मिळाले होते.

 

माझे पत्र छापले

 

मी डॉ. फिरोज याच्या लेखातील भाषांतराची चूक लक्षात आणून देऊन नवे सुचविलेले आधारस्तंभ हे इस्लाम विरोधी आहेत, असे सविस्तरपणे विवेचन करणारे पत्र 'इस्टर्न क्रिसेंट'ला ई-मेल केले. त्याची प्रत 'दारुल उलूम देवबंद'मधील काही मौलानांना पाठविली. त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना विचारले की, "इस्लामच्या मूलतत्त्वांना बाजूला सारून नवी, जिहादी तयार करणारी शिकवण तुम्ही देणार आहातका?" मला वाटले होते की, माझ्या या ई-मेल पत्राला ते लांब असल्याचे फुसके कारण देऊन केराची टोपली दाखविणार. पण, डिसेंबर २०१५च्या अंकात पृष्ठ क्र. ४९ वर माझ्या पत्रात काटछाट करून ते छापले. त्यात दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या कुराण शरीफमधील भाषांतर आणि पाच नवे आधारस्तंभ यांचा निर्देश होता आणि शेवटची ओळ Now comes forth grooming for violence, radicalization and the holy war हीसुद्धा छापली होती. त्या पत्राच्या खाली संपादकांनी पूर्वी प्रमाणेच टीप दिली होती की, 'तुमचा लेख बराच लांब असल्याने संपादित करून छापला आहे. आमचे धोरण आहे की, संपादक लेखकांच्या मतांशी सहमत असतीलच असे नाही. आम्ही डॉ. फिरोज यांच्या लिखाणाशी सहमत नाही. तसेच तुमच्याही काही मतांशी सहमत नाही. पण वाचकांना मतमतांतरे कळावी यासाठी आम्ही लेख छापत आहोत.' ज्या तरुण मुस्लीम वाचकांना, विशेषतः जिहादी शिकवणीने भारले गेले असतील, त्यांना जिहादचा पाच मूलभूत आधारांमध्ये समावेश करून घेण्याची कल्पना पटली नव्हे आवडली असणार. त्यांच्या डोक्यात दृढमूल झाली असणार. 'दारुल उलूम'च्या पठडीतील विद्यार्थ्यांची मानसिकता कशी तयार होते याची ही झलक आहे. हिंदूंनी खरेतर अशा ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन ती जाणून घेतली, तरच ती जिहादी मानसिकता कशी बदलता येईल याचा विचार करता येईल. माझे स्वतःचे मत आहे की, २०४७ पर्यंत इस्लाममध्ये बदल घडवून आणण्यासाठी सखोल विचारमंथन व्हायला पाहिजे.

- डॉ. प्रमोद पाठक

 
 
@@AUTHORINFO_V1@@