कुवार रानवाटांचा वाटाड्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019   
Total Views |


 

वन्यजीव संशोधन आणि निरीक्षणाच्या निमित्ताने जे जंगलात भटकंती करतात, त्यांना 'अरण्यविद्या' अवगत हवी. ही विद्या अवगत असलेला माणूस म्हणजे डॉ. जयंत सुधाकर वडतकर.


मुंबई ( अक्षय मांडवकर ) :  सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले मेळघाटाचे राकट जंगल कोळून अगदी प्यायलेला माणूस म्हणजे डॉ. जयंत वडतकर. निसर्ग भ्रमंतीच्या नादात ते वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाच्या कामात विसावले; इतके की, त्यांनी 'सातपुड्यातील फुलपाखरे' या विषयात 'आचार्य' पदवी संपादित केली. बालपणी जडलेली गिर्यारोहणाची आवड जोपासण्याबरोबरच ते पक्षी निरीक्षणामध्ये रमले, फुलपाखरांमध्ये गुंतले आणि घुबडांच्या मागे स्वार झाले. यासंबंधीच्या विपुल लिखाणाने त्यांना झपाटले. नुकत्याच जाहीर झालेल्या फुलपाखरांच्या मराठी नामकरणात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वडतकर बाहेरून मेळघाटच्या जंगलासारखे कठोर दिसत असले, तरी त्यांचा स्वभाव अगदी दुधावरच्या सायीसारखा...

 

 
 
 

अकोट तालुक्यामधील छोट्याशा खेडेगावात दि. ६ मार्च, १९७२ साली डॉ. वडतकरांचा जन्म झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचे बालपण गेले. गावापासून सात ते आठ किलोमीटरवर सातपुड्याच्या पर्वतरांगेच्या चरणाशी विस्तारलेले कुवार रानवट जंगल होते. त्यांना या जंगलामधील नरनाळा किल्ल्यावर सायकलवरून भटकंतीला जाण्याचा छंद जडला. या भटकण्याला पुढे 'अरण्यवाचना'ची सोबत मिळाली. या सोबतीमुळे त्यांना जंगल समजू लागले. शैक्षणिक पातळीवरदेखील ही आवड जोपासून त्यांनी 'जीवशास्त्र' विषयामधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर १९९३ मध्ये ते अमरावती विद्यापीठात 'प्रयोगशाळा तंत्रज्ञ' म्हणून रुजू झाले. या काळात निसर्गाच्या आवडीने ते मेळघाटात भ्रमंतीला जात. परंतु, गिर्यारोहण हाच या भ्रमंतीमागील उद्देश. भटकण्याची ही मालिका पुढे अमरावतीच्या 'युथ हॉस्टेल'सोबत तीन-चार वर्षे सुरू राहिली. मात्र, १९९७ मध्ये वडतकरांची पक्षितज्ज्ञ डॉ. राजू कसंबे यांची भेट घडल्यावर त्या भटकंतीला वन्यजीव निरीक्षणाचे वळण मिळाले. कसंबे व वडतकर यांच्यामधील 'पक्षी निरीक्षण' हा आवडीचा दुवा होता. वडतकरांना पक्षी निरीक्षणाला मार्गदर्शकाची गरज होती. कसंबे यांच्या भेटीने ती पूर्ण झाली. पुढे दोघांनी दीड-दोन वर्ष मेळघाट आणि पोहराचे जंगल पिंजून काढले. त्याठिकाणी आढळणाऱ्या पक्ष्यांची यादी तयार केली. २००२ मध्ये संयुक्तरित्या अमरावतीत 'वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन संस्थे'ची स्थापना केली. वडतकरांचा पक्षी निरीक्षणाबरोबरच फुलपाखरांकडेही ओढा होता. ही ओढ जाणून घेत त्यांनी पोहरा जंगलामध्ये भटकून त्या परिसरात दिसणारी फुलपाखरांची यादी तयार केली. निरीक्षणापुरतीच मर्यादित असलेली सीमा त्यांनी पुढे संशोधन पत्रिका लिखाणापर्यंत विस्तारीत केली. २००२ पासून वडतकरांनी पक्षी व फुलपाखरांवर शास्त्रीय संशोधनाच्या लिखाणाचे काम सुरू केले. याच जिद्दीने २००४ मध्ये 'पर्यावरणशास्त्र' या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २००५-०८ या कालावधीत 'सातपुड्यातील फुलपाखरांची जैविविधता आणि अधिवास' या विषयात पीएच.डी करून शिक्षणाचे उच्च शिखर सर केले.

 

 
 

या सर्व शैक्षणिक गोतावळ्यात वडतकरांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले वन्यजीव संशोधन आणि प्रबोधनाचे काम नेटाने सुरू ठेवले. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या आर्थिक पाठबळावर २०११ पासून मेळघाटात आढळलेल्या दुर्मीळ 'रानपिंगळा' पक्ष्यावर संशोधनाचे काम सुरू केले. या संशोधनात चार वर्षांचे सातत्य ठेवून 'रानपिंगळ्या'चा अधिवास, वावर, धोके या मुद्द्यांवर संशोधन अहवाल तयार केला. त्यानंतर घुबडांच्या प्रजातींवर अभ्यास सुरू ठेवला. हे सर्व काम त्यांनी अगदी झपाटल्यासारखे केले. त्यामुळे २०१२ मध्ये वन विभागाने त्यांची नियुक्ती अमरावती जिल्ह्याच्या 'मानद वन्यजीव रक्षक' पदावर केली. आजही ते या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या संस्थेने अमरावती जिल्ह्यात जणू पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचा वसाच उचलला आहे. महानगरपालिकेच्या मदतीने पर्यावरण संवर्धनासाठी नानाविध उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातातयातील सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे 'प्लास्टर'च्या गणेश मूर्तींएवजी पर्यावरण पूरक मातीच्या मूर्ती लोकांनी बसवाव्यात म्हणून अमरावतीत २००५ पासून सुरु केलेली चळवळ. वडतकर यांनी संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या प्रस्तावामुळेच 'ब्लू मोरमॉन' (निलवंत) या फुलपाखराला महाराष्ट्राच्या 'राज्य फुलपाखरा'चा दर्जा मिळाला.

 

 
 
 
 
 
मेळघाटाचे जंगल कोपरा अन् कोपरा जाणणारे वडतकर सांगतात की, ''मेळघाटचे जंगल आजही भारतामधील सर्वात 'शुद्ध' असे जंगल आहे. 'शुद्ध' या अर्थाने की, त्या ठिकाणी वन्यजीवांचे दर्शन सहजगत्या होत नाही. तरीही हे जंगल अनोखे व आकर्षक आहे.” वडतकरांनी जंगलात भटकून केलेले 'अरण्यवाचन' आपल्याजवळ जपून ठेवले नाही, तर अनुभवाच्या गाठोड्यातील हा शब्दरुपी ऐवज पुस्तकरुपाने वाचकांसमोर मांडला. आजही ते वृत्तपत्र आणि निरनिराळ्या मासिकांमधून पर्यावरणविषयक लेखन करतात. सातपुड्यातील किल्ले, सापांचे अद्भुत विश्व, सागरमाथ्याच्या पायथ्याशी, महाराष्ट्रातील महत्त्वाची पक्षीक्षेत्रे, अमरावतीमधील पक्षी अशी त्यांच्या पुस्तकांची यादी आहे. त्यांच्या ५० हून अधिक संशोधन पत्रिका प्रसिद्ध आहेत. सध्या ते 'विदर्भातील किल्ले' या विषयावर संशोधन आणि लिखाण करीत असून लवकरच त्यावरील पुस्तक येऊ घातले आहे. वडतकरांचे पक्षी निरीक्षणातील काम पाहता, २०१० मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या दहाव्या विदर्भ पक्षीनिरीक्षण संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. 'पक्षी मित्र' चळवळीत २००२ पासून सक्रीय असून सध्या ते 'महाराष्ट्र पक्षिमित्र' या राज्यभर कार्यरत असलेल्या संस्थेचे ते अध्यक्षपद भूषवित आहेत. शासनाच्या विविध पर्यावरणीय समित्यांवर आज ते कार्यरत आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सल्लागार समिती, अमरावती प्रदूषण नियंत्रण समिती अशा काही महत्त्वाच्या समित्यांचा समावेश आहे, तर पर्यावरण आणि वन्यजीव संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अशा या अवलियाला दै. 'मुंबई तरुण भारत'चा सलाम !
 
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@